Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

रिपब्लिकन मातंग आघाडीची विखेंवर टीका
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. या पराभवास जबाबदार असणाऱ्या बाळासाहेब विखे पाटील यांना आघाडीचा धर्म म्हणून हाकलून द्यावे. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मातंग समाजाच्या वतीने काँग्रेस राष्ट्रवादीला संघर्षांला सामोरे जावे लागेल, असे उद्गार रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी आज काढले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा येथे आयोजित बोंबाबोंब निदर्शन कार्यक्रमात साठे बोलत होते. यावेळी मातंग आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे, साहेबराव कणगरे, महादेव मकडवाड, शहाजी अडागळे तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये ज्या पद्धतीने रामदास आठवले यांचा पराभव झाला. याच्या निषेधार्थ शहरात विविध ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते व कार्यकर्ते अंदोलने करत आहेत.
रामदास आठवले यांच्या पराभवाला कारणीभूत असलेले बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांचे संयुक्त कटकारस्थान कारणीभूत आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजकारण व समाजकारणातून यांनी निवृत्त झाले पाहिजे असे आज रिपब्लिकन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दलित मतांच्या जोरावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे पंचवीस खासदार निवडून आले आहेत. त्यांच्यासारखी आम्ही बेईमानी केली असती तर दलित मतांमध्ये इतकी ताकद आहे की आम्ही एकही खासदार निवडून येऊ दिला नसता. या बेईमानांनी मात्र ‘वरुन कीर्तन आतून तमाशा’ असे केले आहे. याचा आंबेडकरी जनता निषेध करीत आहे, असे डॉ. ज्योती लाजेवार यांनी व्य्कत केले.एकीकडे पराभवाच्या निषेध रिपब्लिकन पार्टी करीत असताना पक्षाच्या इतर गटामधून वेगळाच सूर बाहेर पडत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या विरोधात आंबेडकरी जनता ओरडत आहे. यात सुरातसूर मिसळण्याचे एवढेच नव्हे तर दोन पाऊले पुढे जाऊन ओरडण्याचे काम आठवले व गवई कार्यकर्ते करीत आहेत. ही जनतेच्या डोळ्यात शुद्ध धूळफेक करण्याचा प्रकार आहे. हेच कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसतील त्यामुळे त्यांच्यावर भरवसा किती ठेवायचा हा प्रश्न आहे.खालच्या स्तरावर विखे पाटलांचे पुतळे जाळायचे वरच्या स्तरावर मात्र राज्यसभेच्या खासदारकीसाठी हालचाल करावयाची ही भूमिका दुटप्पी आहे. असे इंडियन नॅशनल रिपब्लिकन पार्टीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये जाहीर करण्यात आले आहे.