Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

प्रसिद्ध वास्तूंची माहिती देणाऱ्या फलकांचे काम सहा महिने रखडलेलेच!
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

 

राष्ट्रकुल स्पर्धाच्या निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध वास्तूंची माहिती देणाऱ्या फलकांचे काम गेले सहा महिने रखडले असून अर्धवट अवस्थेतील या फलकांचा आता गैरवापर सुरू असल्याचे जागोजागी पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बालेवाडी इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या निमित्ताने शहरात जी विविध कामे करण्यात आली त्यात मोठय़ा प्रमाणावर सुशोभीकरणाचीही कामे करण्यात आली होती. वाहनचालकांना दिशादर्शन करणारे व विविध ठिकाणांची माहिती देणारे फलक त्यावेळी शहरात मोठय़ा प्रमाणावर उभारण्यात आले, तसेच वाहतूकविषयक सूचना देणारे फलक व कमानीही शहरात उभारण्यात आल्या.
या कामातील एक भाग म्हणून शहरातील ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध वास्तू, प्रेक्षणीय वास्तू आदींची माहिती होण्याच्या दृष्टीने वेगळ्या आकार-प्रकारातील सुमारे सात फूट उंचीच्या फलकांचे ‘स्ट्रक्चर’ शहरात या स्थळांच्या दारात उभारण्यात आले. राष्ट्रकुल स्पर्धा समितीच्या वतीने तशी सूचना महापालिकेला करण्यात आली होती. या फलकांमुळे पुण्यातील प्रसिद्ध वास्तूंची माहिती पर्यटकांना होईल, तसेच त्या परिसराचा नकाशाही त्यांना समजेल, हा या योजनेमागील हेतू होता.
शनिवारवाडा, केसरीवाडा, राजा केळकर वस्तुसंग्रहालय, बालगंधर्व रंगमंदिर, कसबा पेठ यासह अनेक ठिकाणी अशा फलकांचे ‘स्ट्रक्चर’ उभारण्यात आले असले, तरी हे काम पुढे महापालिकेने अर्धवट अवस्थेतच सोडून दिले आहे. प्रसिद्ध वास्तूंची माहिती देण्यासाठी अनेक ठिकाणी अशा वास्तूंच्या दारातच हे ‘स्ट्रक्चर’ उभारण्यात आले खरे; पण गेल्या सहा महिन्यांत त्याचे पुढील काम करण्यासाठी महापालिका प्रशासनाला सवड झालेली नाही.
अर्धवट अवस्थेतील या फलकांच्या जागांवर आता खासगी, तसेच चित्रपटांच्या जाहिराती लावण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी उद्योग-व्यवसायांची भित्तिपत्रकेही या फलकांवर लावली जात आहेत. अनेक ठिकाणचे फलक पादचाऱ्यांना, तसेच रहदारीलाही अडथळा ठरत असले, तरी त्याबाबतचा कोणताही विचार ते बसवताना झालेला दिसत नाही. मुळात हे फलक उभारताना ते वाहतुकीला व मुख्य म्हणजे पादचाऱ्यांना अडथळा ठरणार नाहीत, अशा जागी उभे करायला हवे होते. प्रत्यक्षात ते भर रस्त्यातच उभारण्यात आले आहेत.
‘काम तातडीने पूर्ण करा’
‘केसरीवाडा’ या वास्तूच्या प्रवेश दारात उभारण्यात आलेल्या फलकावर आवश्यक असलेली माहिती नगरसेविका मुक्ता टिळक यांच्याकडून प्रशासनाने लिखित स्वरूपात चार महिन्यांपूर्वी घेतली. ‘मी दिलेल्या माहितीचे पुढे काय झाले ते माहिती नाही,’ असे टिळक यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या फलकांचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.