Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने मजुराचा मृत्यू
पुणे, १९ मे / प्रतिनिधी

 

ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने मार्केट यार्ड येथे केळीबाजाराच्या गाळ्याजवळ झोपलेल्या मजुराचा मृत्यू झाला. मंगळवारी (आज) पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.
संजय महादेव धिरे (वय २२, रा. आनंदनगर झोपडपट्टी, बिबवेवाडी) असे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून स्वारगेट पोलिसांनी रहीमतुल्ला रहीमखान (वय ३६, रा. आंध्र प्रदेश) या ट्रकचालकाला अटक केली. संजय यांचे भाऊ चंद्रकांत महादेव धिरे (वय २८) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय धिरे हा मार्केट यार्ड येथील केळीबाजाराच्या ३९ क्रमांकाच्या गाळ्याजवळ काल रात्री झोपला होता. खान हा त्याच्या ताब्यातील ट्रक मागे घेत असताना, ट्रकचे चाक धिरे याच्या डोक्यावरून गेले. या अपघातामध्ये धिरे गंभीर जखमी झाल्याने मृत्युमुखी पडला. त्यानंतर खान याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक पी.बी. जावळे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
पादचारी मृत्युमुखी
नगर रस्त्यावर ईडन गार्डनसमोर भरधाव टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.बाबू मलप्पा बाजी (वय २५, रा. सिम्बायोसिस महाविद्यालयासमोरील झोपडपट्टी, विमाननगर) असे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. विमाननगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक एस.आर. घोरपडे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.