Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

खगोलशास्त्र कार्यशाळेस भारतातर्फे लीना दामले
पुणे, १९ मे / प्रतिनिधी

 

जपानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र कार्यशाळेत भारताचे प्रतिनिधित्व पुण्याच्या लीना दामले यांनी केले होते. २००९ हे वर्ष खगोलशास्त्रीय वर्ष म्हणून गणले जात असून या निमित्ताने जपानच्या अंतरीक्ष प्रयोगशाळेने आशियाई देशांची ही कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेत आशियाई राष्ट्रांत खगोलशास्त्रासंबंधी प्रचलित असलेल्या पुराण कथांचे संकलन करून त्याचे दोन भागात पुस्तक रुपाने प्रकाशन करण्याचा संकल्प करण्यात आला.
खगोलशास्त्रासंबंधी पुराण कथा म्हणजे फक्त ग्रीक किंवा रोमन पुराणकथा असे एक समीकरण जगभर प्रचलित आहे परंतु आशियाई राष्ट्रांमध्ये अतिशय समृद्ध असा पुराणकथांचा खजिना आहे. तो जगासमोर खुला करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या शिफारशीवरून लीना दामले यांना आमंत्रित केले होते. पुस्तकाच्या प्रकाशनासाठी स्थापन करण्यात आलेल्या संपादकीय मंडळातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
११ ते १३ मे २००९ या दरम्यान ‘नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झव्र्हेटरी ऑफ जपान’ या संस्थेच्या मुख्य सेमिनार हॉलमध्ये कार्यशाळा भरविण्यात आली होती.
या कार्यशाळेत भारताकडे असलेल्या पुराणकथांच्या समृद्ध अशा वारशामुळे भारताला विशेष महत्त्व देण्यात आले.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘युनिव्हर्स ऑफ एंशंट इंडिया’ असा स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे. वर्षभराच्या काळातच पुस्तकाच्या दोन्ही भागांचे प्रकाशन करण्याचा संकल्प कार्यशाळेत करण्यात आला.
सर्व आशियाई राष्ट्रांच्या पुराणकथांचा समावेश असलेल्या सामायिक इंग्रजी आवृत्तीचे दोन भागात ठअडख प्रकाशन करणार आहे. त्यानंतर स्थानिक भाषांत पुस्तकाचे प्रकाशन करण्याची जबाबदारी त्या त्या राष्ट्रातील संपादकीय मंडळाच्या सदस्यांवर सोपविण्यात आली आहे. भारतातर्फे पुण्याच्या लीना दामले ही जबाबदारी पार पाडतील.