Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

चिंचवडच्या तालेरा रुग्णालयात सुसज्ज प्रसूतिगृह
पिंपरी, १९ मे / प्रतिनिधी

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटी ६० लाख रुपये खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. या सुसज्ज रुग्णालयात स्वतंत्र प्रसूतिगृह सुरू करण्यात येणार आहे.
चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा निर्णय होऊन बराच कालावधी लोटला तरी प्रत्यक्षात त्या कामासाठी पालिकेला मुहूर्त सापडत नव्हता. महापौर अपर्णा डोके यांच्यासह चिंचवडकरांनी सतत पाठपुरावा केल्याने अखेर एकदाचा त्यास मुहूर्त मिळाला. त्यासाठी जवळपास साडेचार कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जवळपास ४० हजार चौरस फूट जागेत नवीन चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे, त्यात अत्याधुनिक बाह्य़ रुग्ण विभागाबरोबरच महिला प्रसूतिगृह उभारण्यात येणार आहे.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने रुग्णालयीन कामकाजावर ताण पडू लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या विभागीय रुग्णालयांचे विस्तारीकरण करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार, आकुर्डी, िपपरी, चिंचवड, भोसरी येथील रुग्णालयांचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी चिंचवडकर लोकप्रतिनिधींनी एकजुटीने पाठपुरावाही केला. प्रत्यक्षात, याबाबतची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. तथापि, हे काम १८ महिन्यात पूर्ण करण्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.