Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

अफरा-तफरप्रकरणी पोस्टमास्तरला कोठडी
सोमेश्वरनगर, १९ मे/वार्ताहर

 

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील टपाल कार्यालयात गोरगरिब खातेदारांचे १९ लाख रुपयांच्या अफरा-तफर केल्या प्रकरणी संबंधित पोस्टमास्तर वसंत कृष्णाजी निकम याला बारामती न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील टपाल कार्यालयात ३१ मार्च रोजी १९ लाख रुपयांची अफरा-तफर केल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला होता. सामान्य शेतकरी, शेतमजूर महिला वर्ग यांनी घामाचा पैसा पोष्टात गुंतवला होता मात्र दीड महिना उलटल्यावर पोष्टमास्तर विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकात १५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.पोष्टातील अधिकाऱ्यांनी केवळ ३८ खात्यांत अफरा-तफर झाल्याची तक्रार केली आहे. मात्र, प्रत्यक्षात १५० खातेदारांची फसवणूक झाल्याची ग्रामस्थांचे व खातेदारांचे म्हणणे आहे. या खातेदारांचे पैसे परत मिळावेत म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली कृती समिती स्थापन झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी निकम यांच्या घरी जाऊन घराची झडती घेऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
फसवणूक झालेल्या लोकांचे जाबजबाब घेण्याचे काम सुरू झाले आहे. टपाल खात्यातील या गैरप्रकारास टपालखात्याचे वरिष्ठ अधिकारीही जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरवर्षी होणारे वार्षिक तपासणीमध्ये ही बाब का उघडकीस आली नाही असा ग्रामस्थांचा सवाल आहे. असाच प्रकार तालुक्यातील मुरुम गावात झाला होता. याच पाश्र्वभूमीवर जर खबरदारी घेतली असती तर कोऱ्हाळे येथील प्रकार घडला नसता. या प्रकारामुळे सरकारी खाते असलेल्या टपाल खात्यावरील लोकांचा विश्वास उडू लागला आहे. याप्रकरणी टपाल खात्याने कणखर भूमिका घेऊन संबंधित आरोपीकडून पैसे वसूल करून खातेदारांना द्यावेत अशी मागणी स्वामी समर्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्ता गावडे यांनी केली आहे.