Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४३४ कोटींचा निधी - वळसे
मंचर, १९ मे/वार्ताहर

 

राज्यातील देहू, आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखडय़ासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला असल्याची घोषणा राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील श्री मुक्तादेवी सामुदायिक विवाह मंडळाच्या वतीने सत्तावीस जोडप्यांचे विवाह झाले. या वेळी वधू - वरांना शुभाशीर्वाद देताना अर्थमंत्री वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे संचालक शिवाजीराव ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे, पंचायत समिती सभापती आनंदराव शिंदे, ज्येष्ठ नेते बाबूराव बांगर, उद्योगपती रमेश लबडे, किरणताई वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, राजाराम बाणखेले आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, की तीर्थक्षेत्रांचा विकास करणे हाच मंत्रिमंडळासमोर महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी देहू, आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४३४ कोटी रुपयांची तरतूद राज्यमंत्रिमंडळाने केली आहे असे सांगून वळसे पाटील म्हणाले, की गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला - मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी राज्यशासन दरवर्षी १२०० कोटी रुपयांची तरतूद करीत आहे. शेतकऱ्यांनी मुलींनाही उच्च दर्जाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलीचे वय १८ वर्षांनंतरच करावे. लहान वयात मुलीला मातृत्व प्राप्त झाले तर मूल आणि माता कुपोषित होते, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविक शिवाजीराव ढोबळे यांनी केले. सूत्रसंचालन उपसरपंच बबनराव ढोबळे यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी कोंडिभाऊ पुंडे, मरतड शेवाळे, राजू ढोबळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.