Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

आठवलेंना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी
नारायणगाव, १९ मे / वार्ताहर

 

आरपीआयचे राष्ट्रीय नेते व शिर्डी मतदारसंघातून पराभूत झालेले लोकसभेचे उमेदवार रामदास आठवले यांना काँग्रेसने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी आरपीआय प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा संघमित्रा गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकात केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की नुकत्याच झालेल्या १५व्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी मतदारसंघातून पराभूत झालेले आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना उमेदवारी देताना विलंब झाला, तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असलेले चिन्ह शेवटच्या काही दिवसांमध्ये मिळाले. आठवले यांना महाराष्ट्रभर प्रचारसभांसाठी विविध ठिकाणी निमंत्रित करून केवळ मागासवर्गीय समाजाच्या मतांसाठी त्यांचा वापर करून घेतला, मात्र आठवले यांच्या प्रचारासाठी शिर्डी मतदारसंघामध्ये कोणत्याही राष्ट्रीय नेत्याची सभा झाली नाही. आठवले यांना स्वत:च्या प्रचारासाठी वेळही खूप कमी मिळाला.
देशात स्थिर सरकार यावे व ते कायमस्वरूपी टिकावे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय यांची (मागासवर्गीय समाजाची) मते ही प्रत्येक निवडणुकीमध्ये निर्णायक ठरली आहेत.
लोकसभा निवडणुकीतून जनतेपर्यंत जर एक चांगला संदेश द्यायचा असेल तर आगामी निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचा काँग्रेसने विचार करावा. रामदास आठवले यांचा पराभव काँग्रेसकडून झालेल्या दिरंगाईमुळे झाला असल्याचा आरोप करून जर आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नाही तर भविष्यकाळातील सर्व निवडणुकांसाठी आरपीआय पक्षाची भूमिका व ध्येयधोरणे वेगळा विचार करून ठरवावी लागतील. आठवले यांचा झालेला पराभव हा केवळ त्यांचा स्वत:चाच नसून बहुजन समाजाचा आहे. त्यामुळे भविष्यकाळात फुले, शाहू, आंबेडकर विचारांची जनता शांत बसणार नाही, असा इशाराही संघमित्रा गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकात दिला आहे.