Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

जेजुरीच्या पोस्टात एकच कर्मचारी असल्याने नागरिकांची गैरसोय
जेजुरी, १९ मे/वार्ताहर

 

जेजुरी येथील पोस्ट कार्यालयाचा कारभार पाहण्यासाठी सध्या फक्त एकच कर्मचारी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
येथील पोस्टमास्तर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी आलेल्या पोस्ट मास्तरांची लगेचच सासवडला बदली झाली. त्यानंतर नवीन पोस्ट मास्तर अद्यापपर्यंत रुजू न झाल्याने पुणे येथील कार्यालयातून आलेल्या एका अधिकाऱ्याने तात्पुरता कार्यभार स्वीकारला आहे. पोस्ट मास्तरांची प्रतीक्षा असतानाच येथील कार्यालयातील इतर दोन्ही लेखनिक रजेवर गेलेले आहेत. त्यामुळे तीन जणांचे काम करताना सध्याच्या पोस्ट मास्तरांना घाम फुटत आहे.
जेजुरी व येथील औद्योगिक वसाहत याशिवाय या परिसरातील बेलसर, जवळार्जुन, कोळविहिरे, कोथळे, मावडी, नाझरे, पांडेश्वर, पिंपरी, रानमळा, साकुर्डे, वाळुंज आदी सर्व भागांचा कारभार याच पोस्टातून चालतो. अल्पबचत योजना, रिकरिंग ठेव योजना, मासिक प्राप्ती योजना यांच्या खात्यांचे व्यवहार तिकिट विक्री, रजिस्टर, मनिऑर्डर, दूरध्वनी बिले व इतर व्यवहार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर नागरिक दररोज पोस्ट कार्यालयात येतात. परंतु कार्यालयीन कामकाज पाहण्यासाठी फक्त एकच अधिकारी असल्याने नागरिकांना रांगेत तिष्ठत उभे रहावे लागते. नागरिकांना रोषाला सामोरे जात दिवस पार पाडण्याची मोठा कसरत हे पोस्ट मास्तर करताना दिसतात.
पोस्ट खात्याने ताबडतोब येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी व जनतेचे हाल थांबवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
एकाच कर्मचाऱ्याच्या जीवावर येथील पोस्टाचा कारभार चालणे कठीण आहे, पोस्टातही आता कामकाजास वेळ लागत असल्याने नाराजी वाढली आहे.