Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

रस्त्याच्या रुंदीकरणापूर्वीच टोल वसुली
खंबाटकी घाटाजवळील टोल वसुलीचा उफराटा प्रकार
सुनील कडूसकर
पुणे, १९ मे

सातारा रस्त्याच्या रुंदीकरणापूर्वीच त्यासाठीची टोल वसुली सुरू करण्याचा उफराटा प्रकार खंबाटकी घाटाजवळील टोल वसुलीच्या निर्णयामुळे घडला आहे. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यात येत असून त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने खंबाटकीजवळील टोल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत.

कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्पच कचऱ्यात !
पुणे, १९ मे / प्रतिनिधी

दहा वर्षांपूर्वी उभारलेला बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प आर्थिकदृष्टया तोटय़ाचा ठरत असल्याने पूर्वीच्या हवेली आणि सध्याच्या पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला तो बंद करावा लागला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने वा प्रशासकांनी त्याकडे लक्ष न देता डोळेझाक केल्याने हा प्रकल्प अद्यापही धूळखात पडल्याचे पाहायला मिळत आहे.

‘शिवाजीनगर’मध्ये दोन्ही पक्षांना अपेक्षित ‘यश’
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ११ हजार मतांची आघाडी देत काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यशाची भावना आहे. तर भाजपाने जेवढी पीछाडी येथे अपेक्षित धरली होती, त्यापेक्षाही थोडी कमी पीछाडी राहिल्यामुळे या मतदारसंघात ‘यश’ मिळाल्याची भावना भाजपामध्येही आहे.

‘लोकाधारित प्रकल्प’ आता आठ जिल्ह्य़ांत राबविणार
पुणे, १९ मे / प्रतिनिधी

ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) पाच जिल्ह्य़ांत लोकाधारित देखरेख प्रकल्पास मिळालेल्या प्रतिसादामुळे आता कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, बीड यांसह आठ जिल्ह्य़ांत येत्या जूनपासून लोकाधारित देखरेख प्रकल्प (सीबीएम) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अरण्येश्वर मित्रमंडळातर्फे सामुदायिक विवाह
पुणे, १९ मे/प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी व सर्वसामान्य गरीब लोकांच्या हिताचा एक भाग म्हणून अरणेश्वर मित्रमंडळ गवळीवाडातर्फे सामुदायिक विवाह सोहळा नुकताच ल. रा. शिंदे हायस्कूल मैदान सहकारनगर येथे संपन्न झाला. या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये दहा जोडपी सहभागी झाली होती. वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी या वेळी विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी, अरविंद सावंत, गिरीश बापट, सुभाष जगताप, सुनील कांबळे, दीपक गावडे उपस्थित होते.या विवाह सोहळ्याचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले. या वेळी उपस्थितांची भोजना व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष अर्जुन जानगवळी यांनी केले.

‘काँग्रेस सत्तेवर येताच जनतेला आनंदाचा प्रत्यय’
पुणे, १९ मे/प्रतिनिधी
‘काँग्रेस आएगी, खुशीयाँ लाएगी’ या घोषणेचा प्रत्यय देशातील जनतेला निवडणूक निकालानंतर दोनच दिवसात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.शेअर बाजाराने आज आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी उच्चांक गाठला असून बाजाराने एकाच दिवसात दोनदा ‘अप्पर सर्किट’ गाठण्याच्या घटनेची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणूक निकालांचाच हा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया अ. भा. काँग्रेस समितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केली आहे. बाजारातील आजच्या उच्चांकामुळे उद्योग व रोजगाराच्या क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे, तर सर्वसामान्य नागरिकांना ‘काँग्रेस आएगी, खुशीयाँ लाएगी’ असा प्रत्यय येत आहे, असेही तिवारी म्हणाले.

लाच घेताना तलाठय़ाला अटक
पुणे, १९ मे / प्रतिनिधी
चिखलीतील पाच गुंठे जमिनीचा सातबाराचा उतारा देण्यासाठी वकिलाकडून दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. चिखलीतील तलाठी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. वकील राकेश सुधाकर अकोले (रा. चिखली) यांनी याबाबत विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून सापळा रचून पोलिसांनी तलाठी नंदकुमार बाबूराव दाभाडे यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश मेस्त्री यांनी चिखली येथे पाच गुंठे जमीन विकत घेतली होती. या जमिनीचा सातबाराचा उतारा मिळविण्यासाठी मेस्त्री यांच्या वतीने वकील राकेश अकोले यांनी नऊ मार्च रोजी दाभाडे यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, हा उतारा देण्यास दाभाडे टाळाटाळ करीत होते.अकोले यांच्यासह मेस्त्री हे दोघेही आज सकाळी दाभाडे यांच्याकडे गेले व उतारा देण्याविषयी विनंती केली. मात्र दाभाडे यांनी यावेळी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर दोघेजण तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेले व दाभाडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून दाभाडे याला अटक केली.

येमूल खून प्रकरणामध्ये सावंत सरकारी वकील
पुणे, १९ मे / प्रतिनिधी

कुमठेकर रस्त्यावरील पेशवाई वस्त्रदालनाचे उद्योजक दत्तात्रय येमूल यांच्या खून प्रकरणात राज्य सरकारच्या राज्य विधी आयोगाचे सदस्य आणि माजी सरकारी वकील अॅड. विजय सावंत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तळजाई टेकडीवरील क्रिकेट मैदानालगतच्या पठारावर गेल्यावर्षी ९ मार्च २००८ रोजी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना येमूल यांचा मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती येमूल यांचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. या गुंतागुंतीच्या खून प्रकरणाचा खटला आता जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.

विद्यार्थ्यांना साहित्य वाटपासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
पुणे, १९ मे/प्रतिनिधी
सेवा सहयोग या स्वयंसेवी संस्थेमार्फत शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना शालेय साहित्य वाटप केले जाते. मागील वर्षी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या तीन हजार विद्यार्थ्यांना या वर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अतुल नागरज यांनी आजपत्रकार परिषदेत दिली.सेवा सहयोग संस्थेच्या सदस्यांमध्ये प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील तरुणांचा सहभाग आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने हे काम केले जाते. प्रत्येक सभासदाने दोनशे रुपये जमा करून हे साहित्य खरेदी केले आहे.मध्ये दफ्तर, वह्य़ा, कंपॉस पेटी, चित्रकला वही आदी शैक्षणिक साहित्य समाविष्ट आहे. यावर्षी पुण्याबरोबरच मुंबई, बंगळुरू येथही हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात आर्थिक योगदान देऊ शकणाऱ्या तसेच यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांनी ९३७२२३११०१० किंवा ९९२३०८०२१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

रस्त्यावर तेल सांडल्याने अपघात
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

पावसामुळे रस्त्यावर तयार झालेल्या पाणी, माती व तेलाच्या मिश्रणाच्या थरामुळे बॉडीगेट ते औंध जकातनाक्यापर्यंतच्या भागात सुमारे पन्नास दुचाकीचालक आज सायंकाळी घसरून पडले. औंध अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दुचाकीस्वारांना वाहनाची गती कमी करावयास लावून या अपघातांना आळा घातला.दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पाऊस पडल्याने बॉडीगेट ते औंध जकातनाक्यापर्यंतचा रस्ता निसरडा झाला होता. पाणी आणि तेलाच्या मिश्रणामुळे तर रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार घसरून पडत होते. याबाबतची वर्दी सायंकाळी सातच्या सुमारास दलाला मिळाली. त्यानंतर दलाचे जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दुचाकीस्वारांनी वाहन सावकाश चालविण्याच्या सूचना दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण कमी झाले मात्र तत्पूर्वी सुमारे पन्नास दुचाक्या घसरून अपघात झाले होते.

जेजुरी शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस
जेजुरी, १९ मे/वार्ताहर

जेजुरी शहर व परिसरात आज विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. जेजुरीच्या वेधशाळेमध्ये ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जेजुरीत सकाळपासूनच उकाडा मोठय़ा प्रमाणात जाणवत होता. तापमानाचा पारा ४० सें.च्या वर गेला होता. दुपारी ३ वाजता आकाशात विजा कडाडू लागल्या आणि पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. पावसाचा जोर सव्वा तास सुरू होता. गावातील रस्त्यावरून जोरात पावसाचे पाणी वाहत होते, कडेपठारचा डोंगर खंडोबा गड या परिसरात आलेल्या पावसाने देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. शिवरी, बेलसर,कोथळे, नाझरे, जवळार्जुन, पांडेश्वर, दौंडज या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदित झाले. जेजुरी परिसरात आज ३२ मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला.