Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

प्रभाकरनच्या मृत्यूने नक्षलवाद्यांची रसद आटणार ?
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, १९ मे

 

श्रीलंकेतील दहशतवादी संघटना ‘लिट्टे’चा प्रमुख प्रभाकरन ठार झाल्याने एकेकाळी नक्षलवाद्यांच्या चळवळीसोबत या संघटनेच्या असलेल्या सहकार्याच्या पाऊलखुणा आपसूकच पुसल्या गेल्या आहेत.
शांततामय मार्ग आणि लोकशाही, या दोन गोष्टींवर अजिबात विश्वास नसलेल्या नक्षलवादी चळवळीने सध्या अध्र्या देशाला ग्रासले आहे. या चळवळीकडून होणाऱ्या हिंसाचारात रोज निरपराधांचे बळी पडत आहेत. आता माओवादी, असे नाव धारण केलेली ही चळवळ पीपल्स वॉर ग्रुप या नावाने देशात काम करीत असताना नक्षलवाद्यांनी पंधरा वर्षांपूर्वी श्रीलंकेतील ‘लिट्टे’शी संपर्क स्थापित केला होता. प्रतिकूल स्थितीत गनिमी काव्याने सरकारी यंत्रणेशी यशस्वीपणे लढण्याचे तंत्र ‘लिट्ट’ेने चांगल्या पद्धतीने आत्मसात केले होते. त्या तंत्राचे प्रशिक्षण नक्षलवाद्यांनाही मिळावे, या हेतूने हा संपर्क साधण्यात आला होता. दोन्ही संघटनांची लढाई एकाच पद्धतीची असल्याने हे तंत्र भारतात लढणाऱ्या नक्षलवाद्यांना अवगत करून द्यावे, ही तेव्हाच्या नक्षलवादी नेत्यांची मागणी प्रभाकरनने तात्काळ मान्य केली होती. तामिळींच्या प्रश्नावर देत असलेल्या लढय़ाकडे भारत लक्ष देत नाही तेव्हा नक्षलवाद्यांना रसद पुरवून भारतावर दबाव वाढवावा, हा हेतू ‘लिट्टे’च्या या मदतीमागे होता. एकमेकांना सहकार्य करण्याचे तत्वत: मान्य झाल्यानंतर १९९५ ते ९९ या काळात प्रभाकरनच्या सूचनेवरून लिट्टेचे काही दहशतवादी शेजारच्याच आंध्रप्रदेशात व गडचिरोली जिल्हय़ाच्या दुर्गम भागात दाखल झाले. या सर्वानी गनिमी युद्ध अधिक अचूकपणे लढण्याविषयीचे प्रशिक्षण नक्षलवाद्यांना तीन ते चार ठिकाणी दिले. नक्षलवादी या आधीसुद्धा भुसूरूंग स्फोट घडवून आणण्यात तरबेज होते. या प्रशिक्षणानंतर त्यात आणखी अचुकता आली. यानंतरच नक्षलवाद्यांनी आंध्र व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात हिंसक कारवायांमध्ये वाढ करीत शेजारच्या छत्तीसगडमध्ये वेगाने पाय पसरले.
नक्षलवाद्यांनी आत्मघाती हल्ले करणारी पथके तयार करावी, असा लिट्टेचा आग्रह होता. त्यादृष्टीने लिट्टेने नक्षलवादी चळवळीत नव्याने दाखल झालेल्या काही तरुणांना प्रशिक्षणही दिले होते. मात्र, अशा पद्धतीने माणूस गमावणे त्यांच्या विचारसरणीत बसत नाही, असे म्हणत नक्षलवादी नेत्यांनी हा प्रस्ताव नंतर बाजूला ठेवला. लिट्टेने नक्षलवाद्यांना केवळ प्रशिक्षणच दिले नाही तर शस्त्रांचा पुरवठासुद्धा नियमितपणे केला. लिट्टेच्या या सहकार्यामुळे नक्षलवादी आणखी उग्र बनले, हा इतिहास आहे व त्यांच्या नोंदी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पडून असलेल्या पोलीस दलाच्या अहवालात नमूद आहेत. काही वषार्ंपूर्वी देशातील तसेच, नेपाळमधील नक्षलवादी माओवादाच्या नावाखाली एकत्र आल्यानंतर या चळवळीचा लिट्टेशी असलेला संपर्क कमी होत गेला तरी आता लष्करी कारवाईत ठार झालेल्या प्रभाकरनला आदर्श मानणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या आजही मोठी आहे. आता प्रभाकरन ठार झाल्याने व लिट्टे जवळजवळ संपुष्टात आल्याने नक्षलवादी मात्र एकाकी पडले आहेत.
नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यात मोठी कामगिरी बजावलेले गडचिरोलीचे माजी पोलीस अधीक्षक व सध्या हैदराबाद येथील पोलीस अकादमीत अतिरिक्त महासंचालक असलेले डॉ. शिरीष जैन यांनी नक्षलवादी व लिट्टे यांच्यात संपर्क होता, हे मान्य केले. हिंसक कारवायांचा आधार घेत उभ्या राहिलेल्या संघटनेचे काय होते, हे श्रीलंकेतील लष्कराच्या कामगिरीवरून आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनासुद्धा आता त्यांच्या पद्धतीवर पुनर्विचार करावा लागणार आहे, असे ते म्हणाले.
प्रभाकरनचा चेहरा हीच लिट्टेची ओळख होती. त्यामुळे त्याच्या संपण्याने ही संघटना मोडकळीस येईल पण, नक्षलवाद्यांचे तसे नाही, या फरकाकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकारने मनात आणले तर नक्षलवाद्यांविरुद्ध अशीच धाडसी कारवाई करता येते, असे जैन म्हणाले.