Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

लोमटे व घोरपडे यांना दर्पण पुरस्कार
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ दै. ‘लोकसत्ता’चे खास प्रतिनिधी अभिजित घोरपडे व परभणी येथील वार्ताहर आसाराम लोमटे यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, जांभेकर फाउंडेशन, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबीय यांच्यातर्फे दर्पणकार जांभेकर यांच्या १६३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे कार्यकारी विश्वस्त रवींद्र बेडकिहाळ यांनी या पुरस्काराची घोषणा केली. या वेळी देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तनुजा भोसले, पोंभुर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच, प्रतिभा पाडावे, मधुकर जांभेकर उपस्थित होते.
या प्रसंगी बेडकिहाळ यांनी राज्यातील इतर पुरस्काराथीर्ंची नावे घोषित केली. त्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्यपातळीवर दिल्या जाणाऱ्या २००९ च्या ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक’ या पुरस्कारासाठी चंद्रपूर येथील दै. चंद्रपूर समाचारचे संपादक रामदास दिनोजी रायपुरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. ‘दर्पण पुरस्कार’ घोषित झालेल्या इतर पुरस्कारार्थीमध्ये बृहन्महाराष्ट्र विभागात दै. ‘पुढारी’चे आवृत्ती प्रमुख प्रभाकर ढगे, पुणे विभागात दै. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, नाशिक विभागात दै. ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक रमाकांत पाटील, अमरावती विभागात दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीचे प्रतिनिधी आनंद कसंबे, कोकण विभागात दै. सकाळचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांचा समावेश आहे, तर ‘विशेष दर्पण पुरस्कार’ कऱ्हाड येथील ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील व जळगावचे येथील ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांना जाहीर झाला आहे.‘दर्पण’ पुरस्काराचे हे सतरावे वर्ष आहे. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानपत्र, जांभेकर चरित्रग्रंथ व लघुपट सी. डी., शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, तर विशेष दर्पण पुरस्काराचे स्वरूप विशेष सन्मानपत्र, जांभेकर चरित्रग्रंथ व लघुपट सी.डी., शाल, श्रीफळ असे आहे.