Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

सुलतानपूरजवळ भीषण अपघात चार ठार, सहा जखमी
मेहकर, १९ मे/ वार्ताहर

 

लोणार तालुक्यातील अजिजपूर येथून मुंबईला निघालेली बोलेरा समोरून आलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जागीच ठार तर ६ जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सुलतानपूरजवळ सोमवारला घडला. मृतांमध्ये वधूपिता व भावाचा समावेश आहे. अपघाताने अजिजपुरात शोककळा पसरली आहे.
अजिजपूर येथील देवीदास पुंडलिक कुलाळ नोकरीनिमित्त मुंबई येथे राहतात. त्यांच्या मुलीचा विवाह ३ मे रोजी मुळगावी अजिजपूर येथे पार पडला.
विवाह समारंभ व त्यानंतरच्या प्रक्रिया आटोपल्यानंतर १८ मे रोजी देवीदास कुलाळ कुटुंब व नातेवाईकांसह एमएच२८सी ५१७४ क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरोने मुंबईकडे जात होते. रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान बोलेरो सुलतानपूर अंजनी जवळ पोहोचली.
या ठिकाणी १७ मे रोजी झालेल्या वादळाने रस्त्यावर बाभळीचे झाड पडले होते. त्याला वळसा घेऊन बोलेरो समोर जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच १४ व्ही ४७३४ वर आदळली. ही बोलेरो लोणार येथील मनोज रतनलाल जुगड यांच्या मालकीची आहे. या अपघातात चौघे जागीच ठार झाले. अपघातात बोलेरोचा चुराडा झाला. मृतामध्ये वधूपिता देवीदास कुंडलिक कुलाळ (४५), भगवान मोतीराम टेकाळे (३०), वैभव देवीदास कुलाळ (१५) सर्व रा. अजिजपूर व चालक सुभाष सूर्यभान टेकाळे (३०) रा. खुरमपूर यांचा समावेश आहे. ऋषीकेश अरुण वाघ (१३), पूजा अरुण वाघ (६), पंचफुला देवीदास कुलाळ, आशा अरुण वाघ, अरुण किसन वाघ, डॉ. मधुकर तुकाराम डहाके रा. अजिजपूर हे गंभीर आहेत.
यापैकी पंचफुला कुलाळ, पूजा वाघ, आशा वाघ यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अकोला येथे तर इतर जखमींना मेहकर येथे हलविण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.