Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

दुभाजकावर मोटारसायकल आदळून दोन विद्यार्थी ठार
इचलकरंजी, १९ मे / वार्ताहर

 

भरधाव दुभाजकावर मोटरसायकल आदळून झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन तरूण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. इचलकरंजीतील सांगली रस्त्यावरील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ हा अपघात झाला.
शीतल अशोक मुन (यवतमाळ), निशांत राघवेंद्र कुलकर्णी (सोलापूर) आणि अर्जुन शंकर माने (अंबप) हे तिघे इचलकरंजीतील डी.के.टी.ई.इन्स्टिटय़ूटच्या एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षांचे विद्यार्थी आहेत. सोमवारी या अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर होता. पेपर दिल्यानंतर त्यांनी जेवणाचा बेत आखला होता. सांगली रोडवर पल्सर मोटरसायकलवरून तिघेजण जेवणासाठी गेले होते. जेवण करून परत येत असताना बाजार कृती समितीजवळ त्यांची मोटरसायकल रस्ता दुभाजकावर आदळली. त्यामुळे शीतल मून आणि अर्जुन माने उडून जाऊन रस्त्यावर आदळले. तर सुमारे ५० फूट मोटरसायकल फरफटत गेली. निशांत कुलकर्णी हा मोटरसायकलसह रस्त्याच्या कडेला गटारीत जाऊन पडला. यामध्ये तिघांच्याही डोक्याला गंभीर इजा पोहोचली. भागातील नागरिकांनी ही माहिती नगरसेवक मदन कारंडे यांना दिली. त्यांनी तात्काळ आपल्या मोटारीतून तिघांनाही निरामय रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र दीड वाजण्याच्या सुमारास शीतल मून याचा तर पावणे तीन वाजता निशांत याचा मृत्यू झाला. अर्जुनच्याही डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच डी.के.टी.ईमधील शिक्षक आणि त्यांच्या मित्र परिवाराने निरामय रूग्णालयात मोठी गर्दी केली होती. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी आय.जी.एम.रूग्णालयात नेत असताना उपस्थित त्याच्या मित्रपरिवाराला अश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यामुळे उपस्थित नागरिकही गहिवरून गेले होते.