Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

राज्य


रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या खारआंबोली येथील धरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी पावसाचे पाणी या धरणात जमा करण्यात येईल. या धरणामुळे मुरुडच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणाचे शेवटचे काम सध्या सुरु आहे. (छाया : सुधीर नाझरे)

चिपळूण तालुक्यातील अनेक धनगरवाडय़ांना पाणीटंचाईचा फटका
चिपळूण, १९ मे/वार्ताहर

उन्हाळ्यात चिपळूण तालुक्यातील धनगरवाडय़ांना पाणीटंचाई चुकलेली नाही. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सध्या तालुक्यातील पेढांबे धनगरवाडी, निरबाडे कातकरवाडी, अडरे, पोफळी, अनारी, कुडप, तळसर, दादर, रिक्टोली, तिवडी, तिवरे, शिरगाव, डेरवण या सह्याद्रीच्या कडय़ाकपारीतील, तसेच गुढे मोरेवाडी, मार्गताम्हाने या भागातील धनगरवाडय़ांत पाणीटंचाई अद्यापही कायम आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रभूंना फटका फंद-फितुरीचा!
रत्नागिरी, १९ मे/खास प्रतिनिधी

देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून बहुचर्चित रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांना भाजप-सेना युतीतील फंद-फितुरीचाच फटका बसल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे.

रायगडवाडीत भीषण पाणीटंचाई
महाड, १९ मे/वार्ताहर

महाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत असताना प्रशासनाकडून या समस्येची दुर्दैवाने दखल घेतली जात नाही. तालुक्यातील रायगडवाडी, टकमकवाडी, आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. गावाकरिता टँकर पाठविला जातो; परंतु चार चार दिवस टँकर येत नसल्याने डोंगर कपारीतून पाझरणाऱ्या पाण्याचा वापर ग्रामस्थांना करावा लागत आहे.

टँकरद्वारा गढूळ पाणीपुरवठा; हाळ बुद्रुकवासीय संतप्त
खोपोली, १९ मे/वार्ताहर

खोपोली नगरपालिका प्रशासनाने हाळ बुद्रुक परिसरात टँकरद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केल्यामुळे नागरिक संतप्त झाले. भीषण पाणी टंचाई व त्यात न.पा. प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा निदर्शनास आल्यामुळे, हाळ बुद्रुकवासीयांनी नुकताच न.पा. कार्यालयावर मोर्चा नेला होता. चर्चेअंती उपनगराध्यक्ष बेबी सॅम्युअल, मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी हाळ येथील दोन विहिरींमध्ये प्रत्येकी तीन-तीन असे प्रतिदिनी सहा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले होते.

प्राथमिक शाळांमधील साठवण टाक्यांची दुरवस्था
महाड, १९ मे/वार्ताहर

रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शाळांच्या प्रांगणामध्ये साठवण टाक्या बांधण्यात आल्या. आज या टाक्यांची दुरवस्था झाली असल्याने शासनाने या प्रकल्पासाठी खर्च केलेले लाखो रुपये अक्षरश: पाण्यात गेल्याचे ग्रामीण भागातील शाळांमधून दिसून येते. याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रभाकरनच्या मृत्यूने नक्षलवाद्यांची रसद आटणार ?
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, १९ मे

श्रीलंकेतील दहशतवादी संघटना ‘लिट्टे’चा प्रमुख प्रभाकरन ठार झाल्याने एकेकाळी नक्षलवाद्यांच्या चळवळीसोबत या संघटनेच्या असलेल्या सहकार्याच्या पाऊलखुणा आपसूकच पुसल्या गेल्या आहेत. शांततामय मार्ग आणि लोकशाही, या दोन गोष्टींवर अजिबात विश्वास नसलेल्या नक्षलवादी चळवळीने सध्या अध्र्या देशाला ग्रासले आहे.

कौटुंबिक वादातून नातवाने केला आजोबांचा खून
संगमेश्वर, १९ मे/वार्ताहर

कौटुंबिक वादाचे पर्यवसान शिवीगाळ आणि वादावादीमध्ये झाल्यानंतर हे वाद विकोपास गेले व त्यातून नातवाने आजोबांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना आज सकाळी तुरळ गावी घडली. तुरळ मराठवाडी येथे राहणारे सोनू भायजे (६०) व नितीन हरेकर (२२) हे नात्याने आजोबा आणि नातू लागतात. दोघांचीही घरे जवळजवळ आहेत. गेले तीन दिवस सोनू भायजे व नितीन हरेकर यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. नितीनच्या घराचे काम सुरू असताना त्याला भायजे सर्व सहकार्य करीत होते, तरीही त्यांच्यात वाद होता. आज सकाळी ६ वाजता भायजे घरातून बाहेर पडल्याचे पाहून नितीन चाकू घेऊन घराबाहेर पडला. तुरळ सांगडेवाडी या ठिकाणी त्यांची नजरानजर होताच दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि आजोबांना ठार मारण्याच्या उद्देशाने आलेल्या नितीनने आपल्याजवळील चाकूने भायजेंवर वार केले. नंतर नितीनने जवळचा दगड भायजेंच्या डोक्यात घातला. नंतर नितीन स्वत:हून संगमेश्वर पोलीस ठाण्यात हजर झाला. गंभीर जखमी अवस्थेतील भायजेंवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

कर्जत : पाणीटंचाईग्रस्त गावे व वाडय़ांची यादी पं. स.ला सादर
कर्जत, १९ मे/वार्ताहर
आदिवासी गावे तसेच वाडय़ा या विभागांमध्ये कार्य करीत असलेल्या जागृत कष्टकरी संघटना या स्वयंसेवी सामाजिक संस्थेने कर्जत तालुक्यातील आदिवासी गावे, तसेच वाडय़ा यांबाबत योजनाबद्ध सर्वेक्षण करून तयार केलेली पाणीटंचाईग्रस्त आदिवासी गावांची आणि वाडय़ांची यादी कर्जत तालुका पंचायत समितीला सादर केली आहे. जाधववाडी, धामणी, धोत्रेवाडी-१, धोत्रेवाडी-२, शिंगढोळ, भालेगाव, मोग्रज, भक्ताची वाडी, भानसोली, कोषाणे-९, कोषाणे-२, आषाणे, आनंदवाडी, फणसवाडी, आंबेवाडी, कळंब, सुतारपाडा, वारे जांभूळवाडी, ताडवाडी, मोरेवाडी, धोत्रेगाव, मुंढेवाडी, सालपे, बार्णे, गणेगाव, चिंचवली, चोची, बीड, मुगपे, सांगवी, मूळगाव, नांदगाव, खांडस, विठ्ठलवाडी, डामसेवाडी, मेंगाळवाडी, बांगारवाडी, पेटारवाडी, बेलाची वाडी, नागेवाडी, जांभूळवाडी, खांदन, आंबिवली, रजपे, हिरेवाडी, डूकरपाडा, ठोंबरेवाडी, धाबेवाडी, फुलाची वाडी या सर्व ठिकाणी तातडीने टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी कर्जत तालुका पंचायत समितीकडे करण्यात आली आहे.

पाच दरोडेखोरांना अटक
नालासोपारा, १९ मे/वार्ताहर

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या नेपाळी टोळीच्या पाच जणांना नालासोपारा पोलिसांनी एस. टी. डेपो परिसरातून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यापैकी दोघे पळून गेले. दरोडय़ासाठी लागणारे सामान व २५ तोळे सोने त्यांच्याकडे सापडले. दयाराम हरिजन (२४), इंद्रजित प्यारे हरिजन (२१), देवेंद्र हरिजन (२१), राजू पोर्णिमा सिंग प्रसाद (२४), धनीराम हरिजन (२२, सर्व रा. मूळचे नेपाळ, सध्या बोईसर) हे पाच जण संशयास्पद स्थितीत नालासोपारा एस. टी. डेपोत फिरत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसताच त्यांनी चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांच्याकडे मिरची पूड, चॉपर, स्क्रू-ड्रायव्हर, दोर असे सामान सापडले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून २५ तोळे सोन्याच्या तीन लडय़ा सापडून आल्या. त्यांचे दोन साथीदार जितेंद्र हरिजन (२०) व दिनेश हरिजन यांना दुसऱ्या दिवशी बोईसर येथील दांडी पाडा येथून पोलिसांनी पकडले. हे सर्व दिवसा कडिया काम करून व रात्री दरोडा घालत होते. या दरोडेखोरांनी पालघर, बोईसर येथील सोनारांना हे सोने विकले होते.

आषाढी यात्रेच्या तयारीसाठी आढावा बैठक
पंढरपूर, १९ मे/वार्ताहर

पुढील महिन्यात आषाढी यात्रा भरत असून यात्रेच्या निमित्ताने पंढरीनगरीत येणाऱ्या वारकरी, विठ्ठलभक्त, भाविक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्वच खात्यांच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी व समन्वयाने काम करावे. तसेच सुरक्षेचीही दक्षता घेऊन तयारीला लागावे, असे आवाहन प्रांत व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव पलांडे यांनी केले.आषाढी एकादशी ३ जुलैला असून २९ जून ते ६ जुलै ०९ दरम्यान आषाढी एकादशी सोहळा आहे. त्याच्या नियोजनासाठी पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा या तीन तालुक्यांतील सर्व महत्त्वाच्या खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पंढरपूर येथील संत तुकाराम भवन येथे पलांडे यांनी आयोजित केली होती. या बैठकीस अधिकारीवर्ग, महत्त्वाचे खातेप्रमुख हजर होते.पंढरीत आषाढी एकादशीच्या सोहळय़ासाठी वारकरी व भाविकांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. त्यादृष्टीने वारकरी व भक्तांच्या सोयीकरिता महत्त्वाच्या खात्यांच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी. तसेच पोलीस खाते, आरोग्य विभाग यांनी आपत्कालीन आराखडे तयार ठेवावेत. माळशिरस व पंढरपूर या दोन तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी कोणती कामे तातडीने करणे गरजेचे आहे, याची पाहणी करावी, हे पलांडे यांनी सांगितले.पालखी मार्गावरच्या गावात बैठक, पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, टप्पा, कुरोली वाखरी, तसेच पालखी मार्गावरचे सर्व पालखीतळ, तसेच मुक्काम विसावा या ठिकाणच्या अडीअडचणींबाबत कार्यालयाचे अधिकारी यांनी २१ मे पर्यंत पाहणी करून बैठका घेऊन अडीअडचणी व समस्यांबाबत गावातच बैठका घेऊन त्या सोडवल्या जातील, असे पलांडे यांनी सांगितले.