Leading International Marathi News Daily
बुधवार, २० मे २००९

स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का कमी आहे , अशी ओरड केली जात होती. तशी परिस्थिती आता नाही. किंबहुना , आता अत्यंत जाणीवपूर्वक एमपीएससी किंवा यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षांचा मार्ग महाराष्ट्रीय विद्यार्थी स्वीकारत आहेत. ‘ आयआयटी , आयआयएम ’ सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याप्रमाणेच ‘ यूपीएससी ’ ची तयारी हीसुद्धा ‘ प्रोफेशनल ’ झाली आहे. साहजिकच , स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी ‘ मिशनमोड ’ स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्या विषयी..
सनदी सेवा, प्रशासकीय-परराष्ट्र वा पोलीस अधिकारी होणे, हे करीअर आहे.. की तो आदर्शवाद-ध्येयवाद आहे.. हा एक न संपणारा वाद निश्चितच आहे! परंतु, गेल्या काही वर्षांमधील घडामोडींवर नजर टाकली असता, एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवते. स्पर्धा परीक्षांमधील, मग त्या राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)
 

असोत, की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) असोत. या परीक्षांच्या तयारीसाठी निश्चितपणे ‘प्रोफेशनल अ‍ॅप्रोच’ स्वीकारण्यात येत आहे. अगदी, ‘आयआयटी-आयआयएम’सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेऊन करीअर करण्यासाठी स्वीकारला जातो, तसाच ‘प्रोफेशनल अ‍ॅप्रोच’. म्हणूनच, सनदी सेवा या सेवा असोत की व्यवसाय. त्यासाठीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी मात्र ‘करीअर’भिमुखच झाली आहे.
‘यूपीएससी’च्या यंदाच्या निकालातही महाराष्ट्रातील ७० शिलेदारांनी बाजी मारली. गेल्या काही वर्षांमध्ये यशाची ही चढती कमान राहिली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी २०-२५ च्या घरात असलेली संख्या पन्नाशीत पोचली. त्यानंतर गेल्या वर्षी तिने विक्रमी ७८ वर झेप घेतली. यंदा आठ जागा कमी झाल्या असल्या आणि पहिल्या २०० मध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या तुलनेने कमी असली, तरी ‘यूपीएससी’तील यंदाचे यश निश्चितच उत्साहवर्धक आहे. अर्थातच, राज्यभरात पसरलेल्या मार्गदर्शन केंद्रांना व त्यामधून अथक परिश्रमांच्या जोरावर स्पर्धा परीक्षेची लढाई लढणाऱ्या शिलेदारांकडे या यशाचे श्रेय जाते.
सनदी सेवा विरुद्ध खासगी क्षेत्रातील करीअर, अशी चर्चा कायमच केली जाते. सनदी सेवेत अधिकार आहेत, सामाजिक स्तरावर मानमरातब, मान्यता आहे. त्याच्याच जोडीला राज्य वा केंद्रस्तरीय कारभारामध्ये सहभागी होण्याची, त्याचा एक महत्त्वाचा घटक होण्याची संधी आहे. याउलट, खासगी क्षेत्रातील करीअरमध्ये गलेलठ्ठ पॅकेज असली, तरी अधिकार मर्यादित आहेत. तुमच्या कामाची मर्यादित स्वरूपात दखल घेतली जाते. सामाजिक स्तरावरील घडामोडींमध्ये सहभागी होण्याचे कार्यसाफल्य नाही. म्हणूनच की काय, यंदाच्या ‘यूपीएससी’मध्ये अव्वल स्थानी आलेल्या शुभ्राचे उदाहरण बोलके आहे. आयटीमधील भरभक्कम पॅकेजची नोकरी सोडून ती यूपीएससीच्या मार्गाला लागली. कारण, ती शोधात होती बँकबॅलन्सपेक्षा कार्यसाफल्याच्या!
अर्थात, ‘यूपीएससी’मधील आदर्शवाद-ध्येयवाद टिकून आहे, असे घटकाभर आपण मान्य केले, तरी ‘यूपीएससी’ होण्याच्या मार्गक्रमणामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वीप्रमाणे ‘वेडात दौडले वीर मराठे..’ अशी सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीची अवस्था नाही! खरोखरीच, पूर्वीचे सनदी अधिकारी म्हणजे डोक्यात प्रशासकीय सेवेचे वेड घेतलेले, झपाटलेले उमेदवार होते. त्या तुलनेत सध्याच्या विद्यार्थ्यांचे-उमेदवारांचे ‘प्रोफाईल’ खूपच बदलले आहे. पुण्यातील दी युनिक अ‍ॅकॅडमीचे तुकाराम जाधव त्यावर प्रकाश टाकतात.. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मानसिकतेमध्ये खूपच बदल जाणवतो आहे. एक तर पूर्वीपेक्षा त्यांची विचाराची प्रक्रिया अधिक ध्येयनिश्चित झाली आहे. १९९९-२००० च्या सुमारासही ‘एनसीईआरटी’ची पुस्तके फक्त दिल्लीतच मिळत. त्याचप्रमाणे भाषांतरित अभ्याससाहित्य फारसे उपलब्ध नव्हते. आता मात्र परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. केंद्रीय स्तरावरील अभ्याससाहित्य आता पुण्यातही उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे भाषांतरित साहित्य विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांची तयारी व आत्मविश्वासामध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र केडरमधील अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभते आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष सेवेत गेल्यानंतरचा ‘रोड मॅप’ कसा असतो, हे विद्यार्थ्यांना अनुभवता येत आहे.
मराठी माध्यमातून शिक्षण घेतले, तर स्पर्धा परीक्षांमध्ये फारशी संधी मिळत नाही, हा समजही आता दूर होत आहे. अभ्यास साधनांच्या उपलब्धतेबरोबरच मराठी माध्यमातील उमेदवारांचे यशही प्रशासकीय अधिकारी घडविण्यात उपयुक्त ठरत आहे.
स्पर्धा परीक्षांकडे कुणी वळावे?
सनदी अधिकारी होऊन जनतेवर अधिकार गाजवावा, असे ध्येय बाळगण्यात गैर नाही. परंतु, त्यासाठी तुमची नेमकी पात्रता काय असावी, तुमच्यात कोणते गुण-कौशल्ये असावीत, याचा विचार स्पर्धा परीक्षेच्या ‘नादाला’ लागण्यापूर्वीच केलेला बरा. नाही तर स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी तऱ्हा होण्याचा धोका आहे!
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांचे उत्तर होते.. ९९ टक्के चिकाटी आणि टक्का बुद्धिमत्ता असे थॉमस एडिसनचे वाक्य प्रसिद्ध आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यामधील चिकाटी हा मुद्दा अतिशय लागू पडतो आहे. अर्थात, त्याच्याच जोडीला बुद्धिमत्ता ही हवीच. परंतु, चिकाटी हा स्पर्धा परीक्षेतील यशाचा आत्मा आहे. यंदाच्या निकालावर नजर टाकली, तर दुसऱ्या वा तिसऱ्या प्रयत्नामध्ये अपेक्षित यश मिळविणारे उमेदवार बहुसंख्येने आहेत. याचाच अर्थ, मुख्य परीक्षेपूर्वीची तयारी त्यांनी खडतर परिश्रम घेऊन केली होतीच. परंतु, त्याच्याही पुढे जाऊन मुख्य परीक्षेचे शिवधनुष्य पेलण्याचा पराक्रम दोन-तीन वर्षे ते करीत राहिले. त्यानंतर कुठे त्यांच्या पदरी यश पडले.
त्याचबरोबरच अत्यंत महत्त्वाचा निकष म्हणजे नियोजन. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम करण्याच्या टप्प्यापर्यंत येताना विद्यार्थ्यांला आपल्या अभ्यासाच्या शैलीची, क्षमतेची माहिती झालेली असते. किंबहुना, आपल्याला कोणत्या गोष्टी झेपणार नाहीत, याची त्याला पुरेपूर ओळख झालेली असते. अभ्यासाच्या क्षेत्रात तो काही दुधखुळा राहिलेला नसतो. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी साजेसे अभ्यासाचे नियोजन आपण करू शकणार की नाही, हे ताडून पाहणे अत्यंत आवश्यक ठरते. बरं, ही केवळ परीक्षेपूर्वी एक-दोन महिन्यांमधील अभ्यासाची चिकाटी नाही. सातत्याने दोन-तीन वर्षे खडतर परिश्रम करण्याची गरज त्यासाठी आहे. ही शैक्षणिक ‘जोखीम’ आपण पेलू शकणार की नाही, याचा अगदी सडेतोड अंदाज बांधावा. कारण, एकदा का स्पर्धा परीक्षेच्या मार्गाला लागले, की मागे वळून पाहणे किंवा अध्र्यावर मार्ग सोडून दुसऱ्या करीअरच्या मार्गाला जाणे ही अत्यंत अवघड गोष्ट होऊन बसते. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमांचे ‘ड्रॉप आऊट’ होण्यापेक्षा या मार्गाने जाण्यापूर्वी त्याची खडान्खडा माहिती करून घेत आपल्या क्षमता ताडून पाहणे हेच हितावह.
अधिक सजग प्रयत्न..
‘प्रशासकीय सेवांकडे मराठी तरूण जात नाही, अशी टीका करण्यास आता कुणाला फारशी संधी मिळू नये. ‘यूपीएससी’च्या महाराष्ट्रातील चळवळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील मुले-मुली जाणीवपूर्वक प्रशासकीय सेवांमध्ये करीअर करण्याची संधी साधत आहेत. त्याबाबत वाढत्या जागरूकतेमुळेच की काय, आता परराष्ट्र सेवेची निवड करण्याकडे कल वाढू लागला आहे..’
‘यूपीएससी’तील महाराष्ट्रीय गुणवंतांच्या यशाबाबत चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी, ज्ञानप्रबोधिनीतील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सविता कुलकर्णी आदींनी संवाद साधला. स्पर्धा परीक्षांबाबत वाढती जागरूकता निर्माण होत आहे, याचे मोठे लक्षण म्हणजे प्रशासकीय सेवांबरोबरच परराष्ट्र सेवेसारख्या विभागाकडे वाढणारा ओढा. त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवा, जे पूर्वी अंतिम घ्येय होते, त्याच्याही पलीकडे जाऊन विचार का केला जात आहे? उमेदवारांचा प्रशासकीय सेवेवरील विश्वास उडतो आहे काय.. अशा प्रश्नांची उत्तरेही शोधण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
एकविसाव्या वर्षी अनिकेत मांडवगणेने मिळविलेल्या यशाचा ‘ग्रेट’ असा उल्लेख करून ‘अविदा’ म्हणाले की, ‘सिन्सिअर, डेडिकेटेड आणि प्लॅन्ड प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, सर्जनशीलतेला काही मर्यादा असतात, असा माझा अनुभव होता. अनिकेतने मात्र तो साफ धुळीस मिळविला! राज्यात पहिले स्थान हे त्याच्या स्वतंत्र विचारसरणीच्या बुद्धिमत्तेचे आणि मेहनतीचे यश आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शहरी भागांबरोबरच बहुजन, फर्स्ट लर्नर कुटुंबीयांमधील मुला-मुलींनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. यापुढील काळातही यशाचा हा आलेख चढताच राहील. स्पर्धा परीक्षेबाबत वाढत्या जागरूकतेमुळे आता प्रशासकीय सेवेबरोबरच परराष्ट्र सेवेलाही पसंती दिली जात आहे,’ असेही ‘अविदां’नी स्पष्ट केले.
‘वैद्यकीय-अभियांत्रिकी शाखांबरोबरच कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदाही चांगले यश मिळविले आहे. परराष्ट्र सेवेबद्दलची फारशी माहिती यापूर्वीपर्यंत नव्हती. परंतु, आता परदेशी भाषाशिक्षणाचा झालेला प्रसार, त्यामधील वाढत्या संधींचे आकर्षण आणि या सेवेबाबत तपशील जाणून घेण्यासाठीची उत्सुकता, यामुळे परराष्ट्र सेवेलाही आता मराठी युवक-युवतींची मागणी मिळत आहे,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.
राज्यातील ७८ विद्यार्थी गेल्या वर्षी यूपीएससीसाठी निवडले गेले होते. यंदा ही संख्या ७० च्या आसपास आहे. पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये यंदा फक्त पाच-सहा आहेत.. स्पर्धा परीक्षांबाबत असा टीकेचा सूर यंदा लावण्यात येत आहे. अशाप्रकारे आकडेमोडीच्या विचारांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या यशाला अडकवू नये, असे आवाहन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे घटक करीत आहेत. त्याचप्रमाणे या ‘लढाई’त विजय हाती न लागलेल्या विद्यार्थ्यांनीही खच्ची न होता आपल्या पर्यायी करीअरच्या दिशेने पावले टाकावीत. आयुष्यात शिकलेले ज्ञान कधीच वाया जात नाही, हे त्यांनी आवर्जून लक्षात ठेवावे, असे आवाहनही केले जात आहे.

वैशिष्टय़ निकालाचे..
४ शहरांबरोबरच यंदाही ग्रामीण महाराष्ट्रातील, अगदी तालुक्याच्या ठिकाणच्या मुला-मुलींचे यश.
४ बहुजन समाज, फर्स्ट लर्नर्सच्या पाल्यांचे उल्लेखनीय यश.
४ प्रशासकीय सेवेबरोबरच परराष्ट्र सेवेत करीअर करण्याकडे कल.
४ कला शाखा म्हणजे यूपीएससी, हे समीकरण बाद ठरवित यंदाही अभियांत्रिकी-वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय.
४ ‘यूपीएससी’ची ‘लढाई’ जिंकू न शकलेल्यांनो.. निराश न होता पर्यायी करीअरचा मार्ग स्वीकारा.

शासनातर्फे मोफत प्रशिक्षण..
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या विविध संस्था राज्यभर कार्यरत आहेत. त्यापैकी काही व्यावसायिक तत्त्वावर, तर काही व्यवसाय थाटल्यानंतरही ‘मिशन’ म्हणून काम करणाऱ्या आहेत. राज्य शासनातर्फे केंद्रीय सेवांमधील मराठी टक्का वाढावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्था, म्हणजेच स्टेट इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करीअर (एसआयएसी) या संस्थेचा उल्लेख करावा लागेल. मुंबईसह औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूरला ही संस्था कार्यरत आहे. त्यामध्ये प्रत्येक शहरातील संस्थेत १०० उमेदवारांना प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी स्वतंत्र निवड चाचणी घेतली जाते. त्याचप्रमाणे निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराला विद्यावेतनही उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती यशवंत ओव्हाळ यांनी दिली. संस्थेचे मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर कार्यालय आहे. संपर्क क्रमांक - ०२२ - २२०७०९४२. २२०६१०७१.
मुलाखतीसाठी मार्गदर्शन..
स्पर्धा परीक्षेसाठी भरपूर तयारी केली, अंतिम लेखी परीक्षाही चांगली गेली.. आता मुलाखतीचा निर्णायक टप्पा. नेमक्या याच टप्प्यावर मराठी मुले मागे पडतात, असा निष्कर्ष मांडण्यात येतो. परंतु, खासगी प्रशिक्षण संस्थांसह ‘यशदा’सारख्या संस्थेमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये मुलाखतीच्या दृष्टीने खास प्रशिक्षण दिले जाते. ते म्हणजे ‘लुटूपुटू’च्या मुलाखती. म्हणजेच, मॉक इंटरव्ह्य़ू. यंदा सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे या केंद्रातर्फे २००६ सालापासून दरवर्षी मोफत यूपीएससी प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी ५० उमेदवारांची निवड करण्यात येते. दरवर्षी डिसेंबरमध्ये त्याकरिता प्रवेश परीक्षा घेतली जाते. संस्थेतील ग्रंथालय, अभ्यासिका, आधुनिक सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशी या निवासी प्रशिक्षणाची वैशिष्टय़े आहेत. यशदाचा संपर्क - ०२० - २५६०८०००. स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक - मंदार केळकर - ९८२२०१८३८५. ई-मेल- www.yashada.org
आशीष पेंडसे/ ई-मेल: ashpen6@yahoo.com