Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

क्रीडा

बंगलोरचे चॅलेंज कायम; दिल्लीवर सात विकेट्सनी मात
जोहान्सबर्ग, १९ मे / वृत्तसंस्था

जॅक कॅलिसची जिगरबाज ५८ धावांची खेळी आणि राहुल द्रविड (३८), रॉस टेलर (३ षटकारांसह २५) यांची उपयुक्त साथ यामुळे बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाने इंडियन प्रीमियर लीगमधील आपले आव्हान कायम ठेवताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला सात विकेट्सनी पराभूत केले. या विजयामुळे बंगलोरच्या खात्यात १४ गुण जमा झाले असून गुणतक्त्यात त्यांनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता या स्पर्धेत सर्वांच्या १३ लढती झाल्या असून बंगलोर, डेक्कन चार्जर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब यांचे प्रत्येकी १४ गुण आहेत.

पंजाब किंग्ज इलेव्हनचे ‘मिशन सेमीफायनल’
दरबान, १९ मे/ पीटीआय

अव्वल स्थानवर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि डेक्कन चार्जर्स या कडव्या प्रतिस्पध्र्याच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ उपान्त्य फेरीच्या उंबरठय़ावर आहे. उपान्त्य फेरीची सीट बुक करण्यासाठी उद्या पंजाबचा संघ जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असेल ते चेन्नईचे आव्हान. उद्या चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करून बाद फेरीत पोहोचण्याचे स्वप्न पंजाबचा संघ पाहत असला तरी कोलकाता नाइट रायडर्स सारख्या ‘लिंबू टिंबू’ संघाकडून पराभवाची चपराक बसल्याने चेन्नईसाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा असेल.

गोलंदाजी, क्षेत्ररक्षण वाईट - मॅक् क्युलम
जोहान्सबर्ग, १९ मे / वृत्तसंस्था

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात विजय मिळवून कोलकाता नाइट रायडर्स संघाने या स्पर्धेतील पराभवाची मालिका खंडित केली आहे, असे असले तरी या संघाचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम याने या सामन्यात आपल्या संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अतिशय वाईट झाले असल्याचे म्हटले आहे. या स्पर्धेत आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण इतके खराब कधीच झाले नव्हते, असे मॅक्क्युलम याने सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मॅक्क्युलम याने केलेल्या ८१ धावांच्या झंझावती खेळीमुळेच कोलकाता नाइट रायडर्स या सामन्यात विजयी होऊ शकला.

विजयाची गरज कोलकातापेक्षा राजस्थानलाच अधिक
दरबान, १९ मे/ पीटीआय

चेन्नई सुपकिंग्ज संघावर अनपेक्षरीत्या सात विकेट्सने विजय मिळविल्यानंतर स्पर्धेदरम्यान सुस्त असलेला कोलकाता नाइट रायडर्स संघ ताजातवाना झालेला दिसत असला , तरी त्यांना या विजयाचा काहीही फायदा होणार नाही. पण उद्या त्यांच्याविरुद्ध होणारा सामना महत्त्वाचा असेल तो राजस्थान रॉयल्स संघासाठी. कारण उद्याचा कोलकाताविरुद्धचा सामना जिंकून त्यांना उपान्त्य फेरीत पोहोचण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
संपूर्ण स्पर्धेत कटू अनुभव पदरी पडले असले तरी शेवट गोड करण्यासाठी कोलकाताचा संघ प्रयत्नशील असेल. तर कोलकाताला नमवून उपान्त्य फेरीत पोहोचण्याची स्वप्ने राजस्थानचा संघ पाहत आहे.

अ‍ॅशेस स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची आज निवड
ब्रेट ली आणि अ‍ॅन्ड्रय़ू सायमण्ड्स यांचा समावेश होण्याची शक्यता
मेलबर्न, १९ मे/ पीटीआय
क्रिकेट जगतातील मानांकित इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिका जुलै महिन्यात रंगणार आहे. यास्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची निवड उद्या निवड समितीचे अध्यक्ष अ‍ॅन्ड्रय़ू हिल्डिच करणार असून वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू सायमण्ड्स यांच्या समावेशाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचे ‘लिफ्ट’ करा दे
सेंचुरियन, १९ मे / पीटीआय

‘लिफ्ट करा दे’ अशी कोलकाता नाइट रायडर्सने सातत्याने केलेली प्रार्थना अखेर फळाला आली. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सात विकेट्सनी विजय मिळवून संघाची लाज राखण्यात शाहरुखच्या या संघाला कसेबसे यश आले. असे असतानाही ‘लिफ्ट करा दे’ या प्रार्थनेतून मात्र त्यांची सुटका होण्याची चिन्हे नाहीत. येनकेनप्रकारेण त्यांना ही प्रार्थना करावीच लागणार असे दिसते. चेन्नईविरुद्ध विजय नोंदविल्यानंतर हॉटेलमध्ये परतलेले कोलकाता संघातले खेळाडू चक्क तिथल्या लिफ्टमध्ये १५ मिनिटे अडकले. माजी कर्णधार सौरव गांगुलीही या लिफ्टमध्ये होता. या परिस्थितीत पुन्हा एकदा ‘लिफ्ट करा दे’ अशी आळवणी करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. ही प्रार्थना कदाचित संघाचे प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांना माहीत नसावी. त्यामुळे ते या गोंधळाच्या परिस्थितीतही आपल्या खेळाडूंची छबी हॅण्डीकॅममध्ये टिपण्यात मग्न होते.

प्रबोधन आंतरराष्ट्रीय ‘फिडे’ बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल खेळाडूंचा सहभाग
मुंबई, १९ मे / क्री. प्र.

बुजुर्ग ‘फिडे’ मास्टर अविनाश आवटे, आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कांबळे (२३५१ फिडे रेटिंग), तीन आंतरराष्ट्रीय नॉर्म प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय मास्टर या किताबाच्या प्रतीक्षेत असणारा शशिकांत कुतवळ (२३५२), पंकज जोशी (२२९२), आदित्य उदेशी (२२८१), सागर शहा (२२७१) आणि अमरदीप बारटक्के (२१७७) अशा अर्धा डझनहून अधिक नामांकित खेळाडूंसह पावणे दोनशे स्पर्धकांनी पहिल्या प्रबोधन आंतरराष्ट्रीय ‘फिडे’ रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपला सहभाग निश्चित केला आहे. मुंबई-ठाणे परिसरातील ८५ मानांकित (रेटेड) खेळाडूंच्या सहभागामुळे सुमारे दीड लाखांची रोख पुरस्कार राशी असणाऱ्या या स्पर्धेमध्ये अटीतटीच्या लढती अपेक्षित आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय विजेत्या रोहिणी खाडिलकर यांच्या हस्ते होत आहे. उद्या २० मे रोजी सकाळी नऊ वाजता होणाऱ्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई भूषविणार असून, बुद्धिबळ क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित असणार असल्याची माहिती प्रबोधनचे प्रमुख कार्यवाह अनिल देसाई यांनी दिली. शालेय महाविद्यालयीन खेळाडूंच्या पालकांसाठी ‘वेटिंग’ आणि कँन्टिंग सुविधाही आयोजकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.‘स्विस लीग’ पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये रोज दोन फेऱ्या, दोन सत्रांमध्ये खेळविल्या जातील. सकाळचे सत्र दहा ते दुपारी दोन आणि सायंकाळचे सत्र चार ते आठ वाजेपर्यंत चालेल. स्पर्धेच्या अंतिम दिवशी म्हणजे रविवार, २४ मे रोजी नवव्या फेरीचे सामने पहिल्या सत्रात होतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

कोकाकोला चषक कॅरम स्पर्धा रविवारपासून
मुंबई, १९ मे / क्री. प्र.

आंतरराष्ट्रीय कॅरमपटूंचा सहभाग असलेली कोकाकोला चषक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स कॅरम स्पर्धा येत्या रविवारी म्हणजेच २४ मेला वरळीच्या वरळी स्पोर्ट्स क्लबच्या सभागृहात रंगणार आहे. या स्पर्धेत मुंबईतील अव्वल १६ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कॅरमपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने आणि आसमंत फाऊंडेशन आयोजित कोकाकोला चषक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कॅरम स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत हरणारे मानांकित कॅरमपटूही रोख पुरस्काराचे मानकरी ठरणार आहेत. एवढेच नव्हे तर ब्रेक टू फिनिश मारणाऱ्या खेळाडूलाही रोख पुरस्कार लाभेल. कोकाकोलाचा मुख्य पुरस्कार लाभलेल्या या स्पर्धेत हार्दिक भावसार, संदीप देवरुखकर, जीतेंद्र काळे, महेंद्र तांबे, पंकज पवार मनु बारिया, प्रशांत मोरे, अनंत गायत्री, राहुल सोलंकीसारखे दमदार खेळाडू खेळणार आहेत. या स्पर्धेला एनकेजीएसबी बँक, एलआयसी नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, सारस्वत बँक, इंडियन ऑइल, एमटीएनएल, स्वदेशी मार्केटिंग आणि लोढा बिल्डर्स यांचेही सहकार्य लाभले आहे.

विजयाची भूक वाढली- स्ट्रॉस
चेस्टर ली स्ट्रीट, १९ मे, वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आमचे खेळाडू विजयासाठी आसुसले होते. खेळाडूंच्या या बदलत्या मनोवृत्तीचा आगामी अ‍ॅशेस मालिकेत आम्हाला नक्कीच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅंड्रय़ू स्ट्रॉस याने व्यक्त केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेबाबत बोलताना स्ट्रॉस म्हणाला की, आमच्या खेळाडूंची विजयाची भूक वाढली आहे याचा मला आनंद झाला आहे. खेळाडूंच्या सकारात्मक वृत्तीचेच हे प्रतीक आहे. अशा मनोवृत्तीचा आम्हाला अ‍ॅशेस मालिकेत नक्कीच फायदा होईल. या हंगामातील इंग्लंड संघाच्या कामगिरीबद्दलही स्ट्रॉस याने यावेळी समाधान प्रकट केले.

ऑस्ट्रियन टेनिस स्पर्धा
व्हिक्टर हॅनेस्कूची निकोलस लॅपेन्टीवर मात
किट्झब्युएल, १९ मे/पीटीआय

तृतीय मानांकित व्हिक्टर हॅनेस्कू याने ऑस्ट्रियन टेनिस स्पर्धेत इक्वेडोरच्या निकोलस लॅपेन्टीवर ६-७ (६-८), ६-३, ७-५ असा रोमहर्षक विजय नोंदविला व दुसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ३२वे स्थान असलेल्या हॅनेस्कू याने आजच्या सामन्यात चार वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. त्याने या सामन्यात परतीच्या फटक्यांचा उपयोग केला, तसेच नेटजवळून प्लेसिंगचा सुरेख खेळ केला. त्याची आता स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स याच्याशी गाठ पडणार आहे. ग्रॅनोलर्सने पहिल्या फेरीत रशियाच्या तैमुराझ गॅबॅहस्वीली याचा ७-६ (१३-११), ६-३ असा पराभव केला. रशियाच्या मिखाईल युझेनी याने स्पेनच्या डॅनियल गेईमो ट्रॅव्हर याच्यावर ६-२, ७-६ (९-७) अशी मात केली. विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळविलेल्या आन्द्रेस बेक याने चेक प्रजासत्ताकच्या जॉन हेर्नीच याला चुरशीच्या लढतीनंतर ५-७, ६-३, ७-५ असे हरविले. चिलीच्या निकोलस मॅसू याने चेक प्रजासत्ताकच्या रॉबिन व्हिक याला ६-४, ६-२ असे पराभूत केले.

बांगलादेशवर महाराष्ट्राचा विजय
पुणे, १९ मे/प्रतिनिधी

महाराष्ट्राने बांगला देशाविरुध्दच्या मित्रत्वाच्या ट्वेन्टी २० क्रिकेट सामन्यात आज सात विकेट राखून विजय मिळविला. हा सामना ढाका येथे आयोजित करण्यात आला होता.
श्रीकांत मुंढे (४/२२) व किरण आढाव (३/२३) यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे बांगला देशचा डाव १९.१ षटकांत ११७ धावांत कोसळला. त्यानंतर हर्षद खडीवाले (६२) व अमेय श्रीखंडे (३१) यांनी शैलीदार फलंदाजी करीत महाराष्ट्रास तीन गडय़ांच्या मोबदल्यात विजय मिळवून दिला.
संक्षिप्त निकाल- बांगला देश- १९.१ षटकांत ११७ (मुश्कीर रहीम ३९, नईम इक्बाल २१, किरण आढाव ३/२३, श्रीकांत मुंढे ४/२२) महाराष्ट्र- ३ बाद ११८ (हर्षद खडीवाले ६२, अमेय श्रीखंडे ३१)

कॅरम : विशाल परमार, राहुल कोळी, रईस विजेते
मुंबई, १९ मे / क्री. प्र.

ए. के. फाऊंडेशन आयोजित व संदीप गायवळ पुरस्कृत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या शिवाजी पार्क येथील कार्यालयात पार पडलेल्या मधुसूदन गायवळ स्मृती कॅरम स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात अंतिम फेरीत ए. के. फाऊंडेशनच्या विशाल परमारने आपल्या सहकारी वरुण गोसावीचा १३-०, १३-७ असा सहज पराभव केला. उपान्त्य सामन्यात विशालने बोरीचा स्पोर्ट्स क्लबच्या पिंकेश लकुमचा १६-३ व १४-० असा तर वरुणने आशिष र्मचडे (ए. के. फाऊंडेशनचा) १९-०, १३-० असा पराभव केला होता. १८ वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात फाइव्ह स्टार स्पोर्ट्स कॅरम अ‍ॅकॅडमीच्या राहुल कोळीने राहुल सोलंकीचा ११-७ व १३-५ असा सरळ पराभव करीत या गटाचे विजेतेपद मिळविले. कोळीने उपान्त्य फेरीत शेख सज्जादवर १५-०, ११-० व १४-० अशी मात केली होती. तर राहुल कोळीने बोरीचा स्पोर्ट्स क्लबच्या नीरज मंडलीयाचा १७-० व १४-० असा सहज पराभव केला होता.