Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

इंग्रजी शाळांना उधाण
संजय बापट

जिल्ह्यात जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी नव्या शाळांचे एकूण ८५५ प्रस्ताव आले असून, त्यापैकी तब्बल ५०५ प्रस्ताव इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आहेत. एकीकडे मतदानातील मराठी टक्का आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ राजकीय मैदानात सुरू असताना नव्या मराठी शाळा सुरू करण्याची इच्छा दाखविणाऱ्यांचा टक्का इंग्रजीच्या तुलनेत भलताच घसरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठी मतांचे विभाजन झाल्यावरून शिवसेना आणि मनसेत आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झडत आहेत.

अख्खे गाव आज उपोषण करणार
५२ लाखांची पाणी योजना पाण्यात!
शहापूर/वार्ताहर
धरण उशाशी असतानाही वर्षांनुवर्षे घशाला कोरड असणाऱ्या मुसई येथील १२०० ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प योजनेतून घेतलेल्या ५२ लाख २४ हजार रुपयांच्या पाणी योजनेचे काम अतिशय निकृष्ट झाल्याने गावात अजून थेंबभर पाणी न आल्याने ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत. दरम्यान, या योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत असल्याने पाणी योजनेची चौकशी होऊन कारवाई व्हावी, या मागणीकरिता अख्खे मुसई गाव बुधवारी शहापूर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.

गीता पठण करणाऱ्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा शंकराचार्याच्या हस्ते सन्मान
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीच्या गीता पठण वर्गातील २३ विद्यार्थ्यांनी गीता मुखोद्गत करून शृंगेरीच्या मठात गीता मुखोद्गत म्हणून दाखविल्याबद्दल प. पू. स्वामीजी शंकराचार्य भारतीतीर्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना एक लाख ३८ हजारांची पारितोषिक देऊन नुकतेच सन्मानित केले आहे. डोंबिवलीतील हे विद्यार्थी वय वर्षे ३५ ते ७२ या वयोगटातील आहेत.
डोंबिवलीच्या गीता पठण वर्गातील ८५ विद्यार्थी शृंगेरी येथे गीता पठण वर्गाचे प्रमुख, माजी मुख्याध्यापक वामन गणेश नवरे यांच्या नेतृत्वाखाली गेले होते.

कडोंमपाचे कार्यकारी अभियंता बनले झारीतील शुक्राचार्य
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली पालिकेने मलनि:स्सारण केंद्रांची कामे ठेकेदारांना देऊन सहा महिने उलटले, तरी एकही काम अद्याप सुरू झालेले नाही. ही कामे रखडविणाऱ्या ठेकेदारांच्या बँक गॅरण्टी जप्त करा, त्यांना काळ्या यादीत टाका आणि या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश सोमवारी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.

बाजार समितीमधील ३५२ भाजीपाला गाळे लवकरच व्यापाऱ्यांना उपलब्ध
कल्याण/प्रतिनिधी - गेल्या पाच ते सहा वर्षांंपासून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १६ कोटी रुपये खर्च करून बांधलेले ३५२ भाजीपाला बाजारासाठीचे गाळे उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे लवकरच व्यापाऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे कल्याण बस आगाराजवळ पहाटे चार ते सकाळपर्यंत लक्ष्मी मार्केट बाजारामध्ये जी गर्दी होते, त्यामुळे परिसरात जी घाण होते ती कमी होण्यास मदत होणार आहे.

बदलापुरात सहा पुस्तकांचे प्रकाशन
ठाणे/प्रतिनिधी

बदलापूर येथील साहित्यिक भीमराव बोराडे यांच्या सहा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.‘मित्राची बायको’ या कथासंग्रहासह ‘माणुसकीच्या शत्रूसंगे..’, ‘चतुर राजकन्या’, ‘स्वातंत्र्यसमर’, ‘वसुंधरेची हाक’ आणि ‘वाचाल तर वाचाल’ या प्रबोधनात्मक एकांकिकांचे प्रकाशन समारंभपूर्वक झाले. समीक्षक लक्ष्मण पाटील यावेळी बोलताना म्हणाले, या कथासंग्रहातील कथा अनुबंध, संवाद, भाषाशैली आणि प्रांजळ वास्तववादी चित्रणामुळे समृद्ध झालेल्या आहेत.

शॉक लागून कामगाराचा मृत्यू
भिवंडी वृत्त
भिवंडी/वार्ताहर

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कणेरी येथे असलेल्या मधु टेक्स्टाईल इंडस्ट्रीज कंपनीत मशीनचे बफिंग करीत असलेल्या एका मजुराला विजेचा जोरदार शॉक लागल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली . याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कणेरी येथील मधु टेक्स्टाईल इंडस्ट्रीज कंपनीत ऋषिकेश सहदेव महाराणा (३०), रा. टेमघर हा मशीनचे बफिंग करीत असताना, त्याला विजेचा जोरदार शॉक लागल्याने तो जागीच कोसळला.

कल्याणात अवजड वाहनांना रेड सिग्नल
ठाणे/प्रतिनिधी

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सॅटिस प्रकल्पाअंतर्गत स्काय वॉकचे काम सुरू झाल्याने एकतर्फी वाहतूक होते. त्यात अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने प्रदूषणासह वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. म्हणून मंगळपासून शहरातून येणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे.

टिटवाळ्यात लवकरच ‘महागणपती’ अत्याधुनिक रुग्णालय
टिटवाळा /प्रतिनिधी - टिटवाळा येथे रुग्णांना माफक दरात अत्याधुनिक सुविधा देणारे महागणपती रुग्णालय उभारण्यात येणार आहे. क्रिएटिव्ह ग्रुप, हिंदुजा हॉस्पिटल आणि टिटवाळ्याचे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी डोंबिवलीच्या प्रमिला वसंत दलाल(आई), प्रमोद दलाल(मुलगा) यांनी भूखंड उपलब्ध करून दिला आहे.

ठाण्यात दरोडय़ांचे सत्र सुरूच नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराट !
ठाणे/प्रतिनिधी
ठाण्यात सातत्याने सुरू असलेल्या दरोडय़ांमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, नौपाडा परिसरातील आणखी दोन दुकानांत काल रात्री दरोडा पडला. दोन दिवसांपूर्वी गोखले रोडवरील दोन दुकानांत रात्रीच्या वेळेस दुकानाचे मागील शटर, एसीची खिडकी तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश करून सामान व रोख लुटली होती. तशीच पद्धती अवलंबून गोखले रोडवरील कॅल्शियम किड्स व सायली स्टोर्स या दुकानात रात्रीच्या वेळेस दुकान फोडण्यात आले.मागील आठवडय़ात मुंब्रा येथे एका व्यापाऱ्याची हत्या झाली होती. मुंब्रा पोलिसांनी या हत्येप्रकरणी सदर व्यापाऱ्याच्या चुलतभावाला अटक केली होती. वैतीवाडी येथे तीन दिवसांपूर्वी तीन घरांत रात्रीच्या वेळेस घरफोडी झाली. लग्नानिमित्त त्या घरांतील लोक गावी गेले होते.

आंतरराष्ट्रीय महिला कीर्तनकार पद्मावती देशपांडे यांचे निधन
डोंबिवली/प्रतिनिधी- आंतरराष्ट्रीय महिला कीर्तनकार पद्मावती देशपांडे (८५) यांचे मंगळवारी सकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पाच मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या साठ वर्षांंपासून त्यांचे डोंबिवलीतील टिळकनगरमध्ये वास्तव्य होते. पद्मावती देशपांडे यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून कीर्तन करण्यास सुरुवात करून, शरीर बिछान्याला खिळेपर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे शिवधनुष्य उचलले होते. आकाशवाणीवर कीर्तन करणाऱ्या त्या पहिल्या महिला कीर्तनकार ठरल्या. डोंबिवलीत कीर्तन कुलाची स्थापना करण्यात, कीर्तन महोत्सव सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. श्री गणेश मंदिर संस्थानात त्या सुमारे ३५ वर्षे ज्येष्ठ महिन्यात दहा दिवस ‘गंगा लहरी’ या विषयावर व्याख्यान देत असत. कोल्हापूर येथे शंकराचार्याच्या हस्ते नुकताच पद्मावती आईंचा सत्कार करण्यात आला होता. ‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

आंग्रे यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल
ठाणे/प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयातून जामीनावर सुटलेले निलंबित पोलीस निरीक्षक रवींद्र आंग्रे यांच्यावर काल पुन्हा महेश वाघ यांना तक्रार मागे घेण्यासंबंधी धमकावल्याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील तरण तलावाच्या भागीदारीवरून शिवसेनेचा एक वरिष्ठ नेता, महेश वाघ आणि आंग्रे यांच्यात वाद झाले. हे प्रकरण पोलिसांपर्यत पोहचले आणि आंग्रे यांना १४ महिने कारागृहात राहावे लागले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी त्यांची जामीनावर सुटका केली. सोमवारी महेश वाघ यांच्या दुसऱ्या तक्रारीवरून न्यायालयाने पोलिसांना आंग्रेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. काही गुंडांनी वाघ यांना आंग्रेविरोधातील तक्रार मागे घेण्यासंबंधी धमकावल्याची तक्रार आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून त्याचा अहवाल न्यायालयाला पाठविला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कापुरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गव्हाणे यांनी सांगितले.