Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

व्यक्तिवेध

महेश कोठारे यांना महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर झाला तेव्हा काळ किती आणि कसा पुढे सरकतो याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. या प्रकारातले पुरस्कार ज्या दिग्दर्शकांना मिळतात त्यांची वये साधारणत: सत्तरीच्या पलीकडे पोहोचलेली असतात, असा सर्वसाधारण अनुभव असतो. दिग्दर्शक म्हणून एक मोठी खेळी केलेल्या आणि अद्याप कार्यरत असलेल्या एखाद्या दिग्दर्शकाला पुरस्कार देण्याचा नवा पायंडा महेश कोठारेंपासून सुरू झाला, असे म्हणता येईल. मराठी आणि

 

हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत कलात्मकता, व्यवसाय आणि सामाजिक भान यांची यशस्वी सांगड घालणारे महान दिग्दर्शक म्हणून व्ही. शांताराम यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. त्यांच्या नावे मिळणारा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार महेश कोठारे यांच्या दिग्दर्शकीय कामगिरीला मिळालेला असला तरी महेश कोठारे यांची कारकीर्द अभिनेता म्हणून सुरू झाली होती. खरे तर बालअभिनेता म्हणून सुरू झाली होती. राम गबाले यांच्या ‘छोटा जवान’मध्ये, ‘राजा और रंक’सारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी बालकलावंत म्हणून लक्षणीय भूमिका केल्या. पुढे त्यांनी तरुण अभिनेता अथवा नायक म्हणून मराठी चित्रपटात काही भूमिका केल्या. परंतु मराठी चित्रपटांतील त्या वेळच्या लोकप्रिय प्रवाहात महेश कोठारेंसारख्या ‘चॉकलेट हीरो’ला तेव्हा फार वाव नव्हता. बावळट, विनोदी नायक अथवा ग्रामीण, राकट-रासवट नायक या दोनच प्रकारची व्यक्तिमत्त्वे मराठी रुपेरी पडद्यावर तग धरून राहत. याच धडपडीच्या काळात सुदैवाने महेश कोठारेंना दिग्दर्शक, लेखक म्हणून काहीतरी वेगळे करण्याची बुद्धी झाली आणि मराठी चित्रपटांच्या प्रवाहाला एक नवे वळण देण्याची कामगिरी महेश कोठारे आणि सचिन या दोघांकडून घडली. मराठी चित्रपटांना ठोकळेबाज ग्रामीण बाजापासून मुक्ती देऊन, तरुण-शहरी प्रेक्षकाला मराठीकडे वळविण्याचा प्रयत्न तेवढय़ापुरता यशस्वी झाला होता. योगायोगाने त्या प्रयत्नात मोठा वाटा असलेले महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हे दोघेही मुळात अभिनेते होते. १९८२ साली ‘धूमधडाका’ या चित्रपटाने याची सुरुवात झाली. ‘प्यार किये जा’ या हिंदी चित्रपटावर बेतलेल्या ‘धूमधडाका’ने मराठी चित्रपटांची गणितेच बदलून टाकली. नृत्य, संगीताची शैली ‘तरुण’ केली. दादा कोंडकेंच्या ग्रामीण ढंगाच्या गाण्यांची लोकप्रियता महाराष्ट्र त्या वेळी अनुभवत होता. महेशने शहरी- ग्रामीण अशी मिश्र संस्कृती गाण्यांमध्ये आणली. ‘धूमधडाका’मध्ये जरी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्वत: महेश कोठारे यांच्या भूमिका असल्या तरी पुढील यशस्वी वाटचालीत महेश कोठारे आणि लक्ष्या ही जोडी अधिक गाजली. संकटात सापडलेल्या लक्ष्याने दिलेली ‘महेश’ अशी हाक आणि प्रत्येक चित्रपटात महेशच्या तोंडी हमखास येणारे ‘डॅम इट’ ही त्याची वैशिष्टय़े बनली. ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’ असा महेश कोठारेंच्या यशाचा त्यानंतरचा झपाटा होता. यापैकी ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’ हे तसे एका साच्यातले चित्रपट होते; परंतु ‘झपाटलेला’ हा मराठी पडद्यावरील एक नावीन्यपूर्ण प्रयोग होता. रामदास पाध्ये यांनी बनविलेल्या ‘बाहुल्या’ला खलनायकाची व्यक्तिरेखा देऊन ‘तात्या विंचू’ ही व्यक्तिरेखा महेशने पडद्यावर पेश केली. या बाहुल्याला दिलीप प्रभावळकर यांनी दिलेला आवाज आणि त्याची पडद्यावरील ‘झुंज’ सगळेच फर्मास झाले होते. १९८२ ते १९९३ चे हे दशक म्हणजे दिग्दर्शक महेश कोठारेंचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. त्यानंतर त्यांना म्हणावे असे यश मिळाले नाही. प्रकृतीशी फटकून काढलेला ‘जीवलगा’चा प्रयोग त्याच्या चाहत्यांना फार रुचला नाही. महेश कोठारेंची दिग्दर्शकीय कारकीर्द सुरू होऊन आता २५ वर्षे होत आली आहेत. अजूनही ते नव्या प्रवाहांशी आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन नवे काहीतरी देण्याच्या प्रयत्नात असतात, ‘फुल थ्री धमाल’ हा असाच एक प्रयत्न होता. आज मराठी प्रेक्षक चांगल्या प्रयत्नाचे स्वागत करायला उत्सुक आहेत. त्यामुळे महेश कोठारे यांना मिळालेला पुरस्कार हा केवळ त्यांच्या कारकीर्दीचा गौरव नसून त्यांना नवे बळ प्राप्त व्हावे यासाठीचे प्रोत्साहनही आहे असे म्हणावे लागेल.