Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

ट्रकने महिलेला चिरडले; चंद्रपुरात तणाव
चंद्रपूर, १९ मे / प्रतिनिधी

 

वरोरा नाका चौकात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकी ट्रकखाली आल्याने एक महिला जागीच ठार झाली. या दुर्घटनेनंतर चौकात तणाव निर्माण झाला. येथे वारंवार अपघात घडत असल्याने संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहराच्या बाहेरील बल्लारपूर वळण रस्त्यावरून होणारी जड वाहतूक नागपूरकडे जाताना वरोरा नाका चौकातून वळण घेते. यामुळे या चौकात नेहमी अपघात घडतात. मंगळवारी दुपारी मंगला संजय दुधे (३७) व त्यांची मुलगी दीक्षा (१२) स्कुटीने (एमएच ३४ - ५२३२) तुकूम परिसरातून जनता महाविद्यालयाकडे जात असताना चौकात त्यांची दुचाकी अचानक ट्रकखाली (एमएम ३४ -७९१५) आली. ट्रक नागपूरहून बल्लारपूरकडे वेगाने जात होता. ट्रकचालकाने चौकात आल्यावर वेग कमी न केल्याने हा अपघात घडला. यात मंगला दुधे व त्यांची मुलगी ट्रक खाली चिरडल्या गेल्या. यात मंगला दुधे जागीच ठार झाल्या तर त्यांच्या मुलीला गंभीर जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर चौकातील लोक घटनास्थळी धावले. लोक मारतील या भीतीने ट्रकचालकाने वाहन तिथेच सोडून पळ काढला. हा अपघात घडला तेव्हा चौकात वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस हजर नव्हता. हे बघून लोक आणखी संतप्त झाले. घटनेची माहिती मिळताच रामनगर ठाण्यातील पोलीस तातडीने घटनास्थळी आले. तोपर्यंत संतप्त जमावाने वाहतूक रोखून धरली होती. कामवर हजर नसलेल्या पोलीस शिपायाला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी जमावाकडून केली जात होती. या चौकात नेहमी अपघात होत असल्याने वाहतुकीच्या नियंत्रणासाठी जादा पोलीस नेमण्यात यावे, अशी मागणी जमावाने केली. अखेर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर तणाव निवळला.