Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेस जिल्हाध्यक्ष व जि.प. अध्यक्षांच्या मतदारसंघातच मेघेंची पिछाडी
प्रशांत देशमुख

 

वर्धा, १९ मे
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या गावात काँग्रेसचे दत्ता मेघे यांना आघाडी मिळवून दिली असतानाच मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कलावती वाकोडकर तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण उरकांदे यांच्याच मतदारसंघात मेघे पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडी सत्तेत आहे. यामध्ये काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष कलावती वाकोडकर यांचा जि.प. मतदारसंघ वाढोणात मेघेंपेक्षा भाजपच्या सुरेश वाघमारेंना आघाडी मिळाली आहे. काँग्रेसच्याच महिला व बालकल्याण सभापती मेघा उरकांदे यांच्या वायगाव मतदारसंघात भाजपच्या वाघमारेंनी चांगली मते खेचली. काँग्रेसचे जि. प. सभापती मिलिंद भेडे यांच्या तळेगावात तसेच दिवाकर कंगाली यांच्या हिंगणी गावात मेघेंना आघाडी मिळाली आहे. ही आकडेवारी संपूर्ण जि.प. मतदारसंघाची नसून जि. प. सदस्याच्या मतदारसंघ मुख्यालयाची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. उपाध्यक्ष सुनील राऊत यांनी त्यांच्या पोहणा मतदारसंघात मेघेंना आघाडी मिळवून देत स्वत:ची ‘निष्ठा’ सिध्द केली. जि.प. सभापती शेषराव चरडे यांच्या ठाणेगावात मेघे-वाघमारे समसमान आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बहुतांश जि. प. सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघात दत्ता मेघेंना आघाडी मिळवून जणू हिशोबाची पावतीच दिली आहे. बहुतांश सदस्यांनी प्रचाराची चोख किंमत मेघेंकडून सहर्ष स्वीकारली. त्यामुळे मतांची आघाडी मिळवून देण्याची ‘हिशोबी’ जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. अपवाद वगळता बहुतांश सदस्यांनी हिशोब चुकता केल्याचे चित्र आहे.
आर्वी विधानसभा मतदार संघातील पारडी, तळेगाव (श्या), कारंजा, वाढोणा या जि.प. मतदार संघाच्या मुख्यालयी वाघमारेंनी आघाडी घेतली आहे. तर साहूर, आष्टी, लहान आर्वी, कन्नमवार ग्राम, सिंदी विहिरी, जळगाव, वाठोडा, मोरांगणा, रोहणा व विरूळ येथे मेघे पुढे सरकले. यापैकी पारडी मतदारसंघात भाजप सदस्याकडे, साहूर, कारंजा अपक्षाकडे वाठोडा राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित अपक्ष व आष्टी, ठाणेगाव व विरूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. भाजपने तळेगाव व वाढोणा या काँॅग्रेस सदस्यांच्या गावात बाजी मारत काँग्रेसला धक्का दिला.
वर्धा-सेलू विधानसभा मतदारसंघातील सेलू, केळझर, येळाकेळी, हमदापूर, नालवाडी, वायफ ड, पिपरी, सिंदी, सेवाग्राम, सावंगी, बोरगाव या जि.प. मतदार संघाच्या गावात मेघेंना आघाडी मिळाली. यापैकी हिंगणी, सेलू, हमदापूर व बोरगाव येथेच काँग्रेस सदस्य आहेत. सावंगी व केळझरला राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. येळाकेळी, नालवाडी व पिपरी या गावात मेघे समर्थक सदस्य आहेत. सर्वानी भरभरून मते मिळवली. सिंदीला बसप तर सेवाग्रामला रिपाइं सदस्य आहेत. भाजप सदस्य असलेल्या आंजीत भाजपने चांगली आघाडी तर भाजपच्याच वायफडला मेघेंनी भाजपवर मात केली. याच विधानसभा मतदार संघातील वायगाव (काँग्रेस), तरोडा (भाजप) व तळेगाव (काँॅग्रेस) या गावापैकी तळेगावलाच मेघेंना आघाडी मिळाली.
देवळी-पुलगाव मतदारसंघातील गुंजखेडा, गौळ, इंझाळा व भिडी चार काँग्रेसी मतदारसंघात मेघेंना आघाडी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंदोरी व मेघे समर्थक अपक्षाच्या नाचणगावातही मेघे बाजी मारून गेले. हिंगणघाट विधान मतदार संघातील गिरड (भाजप), मांडगाव (भाजप), समुद्रपूर (राष्ट्रवादी काँग्रेस), नंदोरी (अपक्ष), कोरा (सेना), कानगाव (सेना), वडनेर(राष्ट्रवादी काँग्रेस), पोहणा (राष्ट्रवादी काँग्रेस) या बहुतांश सेना वर्चस्वाखालील गावात वाघमारे नव्हे तर मेघे बाजी मारून गेल्याचे चित्र आहे. वाघमारेंना अल्लीपूर (भाजप) व शेकापूर (काँॅग्रेस) या दोनच मतदारसंघाच्या मुख्यालयात यश मिळाले. वाघमारेंचे मूळ गाव अल्लीपूरने त्यांच्या पदरात भरभरून ‘कमळं’ टाकली. तसेच कांढळी या सेना मतदारसंघातही वाघमारेंनी बाजी मारली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण उरकांदेना त्यांच्या वायगावात मेघेंना मताधिक्य देता आले नाही. त्यांच्याच पत्नी जि. प. सभापती उरकांदे यांचा वायगाव मतदारसंघ वाघमारेंना नजरेत भरणारे मताधिक्य देऊन गेला. प्रभा राव गटाचे असलेले जिल्हाध्यक्ष उरकांदे हे प्रचाराच्या सुरुवातीलाच मेघेंभोवतीच्या गोतावळ्यावर नाराजी ठेवून दूर राहले होते. नंतर उपस्थित राहले. मात्र वायगावने मेघेंना मागे टाकत वाघमारेंना पुढे केल्याने उरकांदेवर प्रष्टद्धr(२२४)्नाचिन्ह उमटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शशांक घोडमारे यांच्या वायफ ड मतदारसंघात भाजपचा जि.प. सदस्य आहे. मात्र येथे घोडमारेंनी मेघेंना मताधिक्य मिळवून देत राष्ट्रवादी काँग्रेस-सहकार गटावरील संशयाचे मळभ दूर के ले. काँग्रेससोबत असलेल्या रिपाइं (आठवले)चे जिल्हाध्यक्ष तसेच जि. प. सदस्य विजय आगलावे यांनी ग्रामपंचायतमधील सत्ता याच दरम्यान झालेल्या निवडणुकीत गमावली. मात्र मेघेंना भरभरून मताधिक्य त्यांनी त्यांच्या सेवाग्राम केंद्रात मिळवून देण्यात कसर सोडली नाही. ‘स्वभाप’चे जिल्हाध्यक्ष मधुसुदन हरणे यांच्या पत्नी सदस्य असलेल्या सावलीत मेघेंनी आघाडी घेतली आहे.
मेघेंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावांनी गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या दत्ता मेघेंना मताधिक्य दिल्याचे दिसून येते. सावंगी, पिपरी, सिंदी, बोरगाव या गावामागे मेघे लागणाऱ्या मतदारसंघात मेघेंनी वाघमारेंवर मात केली. मेघेंचे मूळ गाव असलेल्या पवनारला मेघेंनी वाघमारेंवर विक्रमी आघाडी घेतली तर वाघमारेंच्या अल्लीपूरने वाघमारेंवरील प्रेम कमी झाले नसल्याचे मतदानातून दाखवून दिले.