Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक उपचार कक्ष
राज्यभरात १२ जिल्ह्य़ांमध्ये प्रायोगिक सुरुवात
चांदूर रेल्वे, १९ मे/ वार्ताहर

 

सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग विद्यार्थ्यांसाठी शस्त्रक्रियेसोबतच आता अत्याधुनिक उपचार कक्षाच्या माध्यमातून फिजिओथेरपी (भौतिक उपचार) व आक्युपेशन थेरपीद्वारे (व्यवसायोपचार) ० ते १८ वयोगटातील मतिमंद, कर्णबधिर, अस्थिव्यंग, आदी अपंगाच्या विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर उपचार केल्या जात आहे. सध्या राज्यभरातील अमरावती, धुळे, औरंगाबाद, सांगली, चंद्रपूर, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, यवतमाळ, ठाणे आदी १२ जिल्ह्य़ांमधून सुरुवात होणार आहे. सुमारे ४ लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक उपचार कक्षात अपगांचा ६ महिने उपचार होणार आहे.
विविध समाजातील विद्यार्थ्यांसोबत विशेष गरजा असलेल्या (अपंग), विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उदात्त हेतूने या कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये फिजिओथेरपी व आक्युपेशनल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांवर विविध अत्याधुनिक साहित्याच्या सहाय्याने उपचार होणार आहेत. अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी पैरलल बार मिरर, रॅम्प विथ स्टिअर केस, स्पटीक सायकल, सिघी चेअर, कमोड चेअर आदीसह मतिमंद व कर्णबधिरांसाठी एम्पोलिन, स्विग्स, वॉल बार, वाकर्स, पिंच गेज, मल्टीपल एक्सरसाईज, इक्वीली ब्रियम, बोवल बोडर्सच्या माध्यमातून संतुलन. विविध व्यायामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त व्यायामाच्या साहित्याची भर यामध्ये राहणार आहेत.
जून महिन्याच्या मध्यान्हानंतर हा कक्ष सुरू होणार असून राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या अगोदर विविध शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्यांनी लाभ घेतला अशांनाही या कक्षाचा लाभ होणार आहे. थेरेपी मॅट, थेरेपिटिक्स बॉक्स पिंच बॉक्सच्या साह्य़ाने अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना अधिक बळ मिळणार आहे. शस्त्रक्रिया सोबतच भौतिक उपचार पद्धती व व्यवसायोपचार पद्धतीने प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थ्यांवर उपचार होणार असून लवकरच राज्यभरातील इतरही जिल्ह्य़ात ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमाद्वारे अपंग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सोनेरी क्षण येणार आहे.