Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
अमरावती, १९ मे / प्रतिनिधी

 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी आणि चुकीचे सर्वेक्षण करून शासनाला खोटा अहवाल सादर केल्याबद्दल तहसीलदारांना निलंबित करावे, अशी मागणी किसान स्वराज्य आंदोलनाचे प्रमोद तऱ्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या खरीप हंगामात लष्कर व उंट अळीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. पण, तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कालावधी संपल्यावर सर्वेक्षण केले आणि शासनाला खोटी माहिती सादर केली, असा आरोप प्रमोद तऱ्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये सोयाबीन पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यात शिवणी रसुलापूर, गावनेर तळेगांव, शेलू चिखली, खंडाळा इत्यादी गावांचा समावेश आहे. पण, अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना चुकीची माहिती पुरवल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळाला नाही.
अनेक गावांमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लष्करी व उंट अळीमुळे सोयाबीन पिकाचे भरपूर नुकसान झाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही संबंधित विभागाने ऑक्टोबर महिन्यात शेतांचे सर्वेक्षण केले. तेव्हा ५० टक्क्यांहून अधिक सोयाबीनचे पीक शेतामधून निघून गेले होते. त्यामुळे नुकसानीचा अंदाज गृहीत धरता आला नाही. शासनाने सोयाबीन पिकाच्या नुकसानीबद्दल जिल्ह्य़ातील इतर काही तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पण, नांदगाव खंडेश्वर तालुक्याला त्यातून वगळण्यात आले. हा अन्याय असून शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी प्रमोद तऱ्हेकर यांनी केली आहे.