Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

वेकोलिच्या खाणींमधील पाणी वर्धा नदीत सोडण्याचे निर्देश
चंद्रपूर, १९ मे/ प्रतिनिधी

 

जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा वर्धा नदीतून चार सिमेंट उद्योग, बल्लारपूर पेपर मिल, भद्रावती दारुगोळा कारखाना व औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा होत असल्याने या नदीचे पात्र कोरडे आहे. पाण्याचे स्त्रोत आल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून वेकोलिच्या कोळसा खाणींमध्ये उपलब्ध असलेले पाणी शुद्ध करून तातडीने वर्धा नदीत सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी दिले आहेत.
तुडूंब भरून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र यंदाच्या उन्हाळय़ात कोरडे ठणठणीत पडले आहे. याच नदीवरून अंबुजा, अल्ट्राटच, एसीसी व माणिकगड हे चार सिमेंट कारखाने, बल्लारपूर पेपर मिल, भद्रावती दारुगोळा कारखाना व औद्योगिक वसाहतींसह इतर दहा छोटय़ा उद्योगांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या नदीचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे.
वर्धा नदीकाठावरील अस्तित्वातील स्त्रोतांना पुरेसे पाणी उपलब्ध होणे दुराप्रास्त झाले आहे. ग्रामीण जनतेला व गुराढोरांना दैनंदिन पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. ग्रामीण भागातील गुरांना पाण्यासाठी इतरत्र घेऊन जावे लागत आहे. वर्धा या प्रमुख नदीतील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे ही भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अशाही स्थितीत उद्योगांकडून पाण्याचा उपसा होत आहे. वर्धा नदीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वरच्या भागातील धरणाचे पाणी सोडण्यावर जिल्हा प्रशासनाचा विचार सुरू आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे स्त्रोत दिवसागणिक कमी होत असल्याने जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी तातडीची बैठक घेऊन या सर्व उद्योगांना वर्धा नदीतील पाण्याचा कमी वापर करण्याची सूचना केली आहे.
जिल्हय़ातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे व वेकोलिच्या विविध खाणींमध्ये उपलब्ध असलेले पाणी शुद्ध करून वर्धा नदीत सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळताच वेकोलिच्या काही खाणींमधून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. जिल्हय़ात प्रथमच एवढी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून अशा पध्दतीने वेकोलिला नदीत पाणी सोडण्याचे निर्देशही प्रथमच देण्यात आले आहे. वेकोलिने पाणी सोडल्याने काही भागात नदीच्या पात्रात पाणी दिसत आहे. वर्धा नदीला लागून असलेल्या गावात पाणी नाही. यासोबतच वर्धा नदीत छोटय़ा छोटय़ा धरणातील पाणी आरक्षित केले असून ते आवश्यकतेनुसार सोडण्यात येणार आहे. पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता घोडाझरी व आसोलामेंढा २.५ द.ल.घ.मी., चारगाव, लभान सराड, इरई २.५ द.ल.घ.मी. इतके पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. वर्धा नदी व तिच्या उपनदीवरील अस्तित्वातील असणाऱ्या प्रकल्पांना किती पाणी साठा शिल्लक आहे याबाबतचा आढावा घेतल्यानंतर टंचाई परिस्थिती दूर करण्याकरिता पाटबंधारे प्रकल्प उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा कसा उपयोग करून घेता येईल, याबाबत संबधित विभागांना विचारणा करण्यात आली आहे.
गोसेखुर्द जलाशयातून पंधरा दिवसापूर्वी पाणी सोडल्यामुळे काही प्रमाणात या नदीवरील पाणी प्रश्न सुटला आहे. अशाही स्थितीत उन्हाळय़ात दिवसेंदिवस स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. आणखी पंधरा दिवस हीच स्थिती कायम राहिली तर या जिल्हय़ात भीषण जलसंकट उद्भवण्याची शक्यता आहे.