Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

मत विभाजनाचा डॉ. शिंगणेंना फटका
बुलढाणा, १९ मे / प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या झालेल्या पराभवात धर्मनिरपेक्ष मतांच्या झालेल्या विभाजनाचा त्यांना चांगलाच फटका बसला. बहुजन समाज पक्ष, भारिप-बमसं, युडीएफ व एक अपक्ष अशा चौघांनी त्यांना मिळू शकणारी १ लाख ४१ हजार २९१ मते खेचली आणि हीच मते शिंगणेंच्या पराभवाला कारणीभूत झाली.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांनी ३ लाख ५३ हजार ६७१ तर डॉ. राजेंद्र शिंगणेंनी ३ लाख २५ हजार ५९३ मते घेतली. म्हणजेच डॉ. शिंगणे यांचा तसे बघितले तर केवळ २८,०७८ मतांनीच पराभव झाला. मात्र, त्या तुलनेत शिंगणेंना मिळू शकणारी लाखो मते इतरत्र वळली. बहुजन समाज पक्षाला तब्बल ८१ हजार ७६३ मते मिळाली. हत्तीने प्रथमच एवढी मते घेतली. २००४ लोकसभा निवडणुकीत हत्तीला केवळ १८,२४१ मते मिळाली होती तर भारिप-बमसंनेही यावेळी ३१,०३४ मते घेतली. मागच्यावेळेस या पक्षाला २१,१९७ मते मिळाली होती. मुस्लिम समाजाची हक्काची मते काँग्रेसला समजली जातात. मात्र, यावेळी युडीएफ पक्षाचा उमेदवार रिंगणात होता व या पक्षाने तब्बल १६,४०५ मते मिळविली. ही जवळपास सर्वच मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची होती. त्यानंतर बंजारा समाजाच्या छगन राठोड या अपक्ष उमेदवारानेही ११,९८९ मते घेतली. बंजारा समाज हा प्रामुख्याने काँग्रेस विचारसरणीचा समजल्या जातो. त्यामुळे हा फटकाही शिंगणेंना बसला, अशाप्रकारे शिंगणोंना मिळू शकणाऱ्या १ लाख ४१ हजार १९१ मतांचे विभाजन झाले. यातली फक्त ३० हजार मते जरी डॉ. शिंगणे यांना मिळू शकली असती तर त्यांचा पराभव होऊ शकला नसता, अशी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे.

प्रामाणिक प्रयत्न झाले तरीही पराभव- शिंगणे
सर्वानी प्रामाणिक प्रयत्न केले पण, मिळालेला अवधी अतिशय कमी असल्याने व खामगाव आणि जळगाव जामोद या दोन मतदारसंघात प्रचंड फटका बसल्याने, आपला पराभव झाला. जनतेने तरीही आपल्या पदरात तब्बल ३ लाख २५ हजार ५९३ इतकी मते टाकली, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
राजेंद्र शिंगणे म्हणाले की, खामगाव व जळगाव जामोद या दोन मतदारसंघात बसलेला प्रचंड फटकाच आमच्या पराभवास कारणीभूत ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाइंच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले; परंतु यश मिळू शकले नाही. पहिले काही दिवस कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते या संभ्रमातच गेले. ऐनवेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली व माझी उमेदवारी जाहीर झाली. यामुळे निवडणुकीच्या नियोजनाला व जनतेशी प्रत्यक्ष संपर्काला वेळ फार कमी मिळाला. तरीही विजय खेचून आणू शकलो असतो; परंतु खामगाव व जळगाव जामोद या दोन मतदारसंघाने प्रचंड निराशा केल्यामुळे आपला पराभव झाला.

एक लाख मते मिळण्याची अपेक्षा होती- दांडगे
बहुजन समाज पक्षाने मायावतींना पंतप्रधान करण्यासाठी जनतेसमोर जाऊन प्रथमच मते मागितली. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आम्हाला १ लाख मते मिळण्याची अपेक्षा होती पण, आम्ही ८१ हजार ७६३ मतेच मिळवली.मतदारांनी दिलेला कौल हा आम्हाला मान्य असून, आम्ही येथे न थांबता आता विधानसभेच्या तयारीला लागल्याची प्रतिक्रिया बहुजन समाज पक्षाचे उमेदवार वसंतराव दांडगे यांनी दिली. वसंतराव दांडगे हे अगदी मतमोजणीच्या सुरुवातीपासून मतमोजणी कक्षात हजर होते. त्यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी पत्रकारांनी गाठले. यावेळी दांडगे म्हणाले की, जनतेने आम्हाला जी मते दिली ती आम्ही स्वीकारली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघात एवढी मोठी निवडणूक लढत असल्याने प्रचाराचे फारसे नियोजन नव्हते. सुसुत्रता आणि समन्वयाच्या अभावात आम्ही कमी पडलो. तरी मतदारांनी चांगली साथ दिली पण, या पराभवामुळे आम्ही खचून जाणार नाही, तर येत्या विधानसभा निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात आम्ही बसपाचे उमेदवार ताकदीने उभे करू, असेही दांडगे यांनी सांगितले.