Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

अमरावती नागपूर-इंटरसिटी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याची मागणी
अमरावती, १८ मे / प्रतिनिधी

 

अमरावती नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला अजनी रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा आणि या गाडीची अमरावतीहून सुटण्याची वेळ बदलवावी, अशी मागणी विदर्भ यात्री संघाने केली आहे.
नागपूरमधील अजनी रेल्वेस्थानकावर अनेक एक्स्प्रेस व सुपरफास्ट रेल्वे गाडय़ा थांबतात पण, गेल्या वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला अजनी स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. अमरावती नागपूर दरम्यान दररोज शेकडो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अजनी परिसरातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या परिसरात काम करणारे कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. अजनी येथे थांबा नसल्याने या प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. आर्थिक भरुदड सोसावा लागतो आणि नियोजित स्थळी पोहोचण्यासही विलंब होतो. त्यामुळे या स्थानकावर इंटरसिटी एक्स्प्रेसला दोन मिनिटांचा थांबा देण्यात यावा, असे विदर्भ यात्री संघाचे अध्यक्ष डॉ. रवी अलीमचंदानी यांनी म्हटले आहे.
इंटरसिटी एक्स्प्रेस आठवडय़ातून पाच दिवस धावते. अमरावती-नागपूर या महानगरादरम्यान शेकडो नागरिक प्रवास करतात पण, ही एक्स्प्रेस दररोज सुरू करायला हवी. या रेल्वे गाडीची अमरावतीहून सुटण्याची वेळ पहाटे ५.१५ वाजताची आहे. इतर इंटरसिटी एक्स्प्रेस गाडय़ा या सकाळी सहा नंतर सुटतात.
प्रवाशांचा सोयीचा वेळ लक्षात घेता, ही एक्स्प्रेस अमरावतीहून सकाळी साडे सहा वाजता सोडली जावी, असेही विदर्भ यात्री संघाच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.