Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

सर्वधर्मीय मेळाव्यात ६५ जोडपी विवाहबद्ध
चंद्रपूर, १९ मे / प्रतिनिधी

 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय व नवनिर्माण सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्यावतीने बल्लारपुरात नुकत्याच झालेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यात ६५ जोडपी विवाहबद्ध झाली.
वादळवाऱ्यामुळे या मेळाव्याचा मंडप कोसळला होता. त्यामुळे या मेळाव्याच्या आयोजनाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांनी रात्र जागून पुन्हा मंडप उभा केला होता. या मेळाव्यात १६ बौद्ध धर्मीय जोडप्यांचे विवाह बौद्ध पद्धतीने करण्यात आले. त्यासाठी दोन भन्ते आमंत्रित करण्यात आले होते. उर्वरित जोडप्यांचे हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे विवाह करण्यात आले.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार शोभा फडणवीस, खासदार हंसराज अहीर, चंदनसिंह चंदेल, लखनसिंह चंदेल, सपना मुनगंटीवार, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, मधुसूदन रुंगठा, किशोर जोरगेवार, प्रभाकर पटकोटवार उपस्थित होते. वधू-वरांना मंगळसूत्र, कपडे व शुभेच्छा भेटही देण्यात आल्या. रांगोळीकार प्रल्हाद ठक यांची रांगोळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. मंडपात भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वधू-वरांना हाताच्या घडय़ाळी भेट देण्यात आल्या. आकर्षक होमकुंड तयार करण्यात आले होते. त्याशेजारी मंगल कलशांची सुंदर आरास तयार करण्यात आली होती. वधू-वरांची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. वधूवरांसह आलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी स्वतंत्र भोजन मंडपात भोजनाची व्यवस्था होती. याचा २०हजारांहून अधिक लोकांनी लाभ घेतला. या सोहोळय़ाचे संचालन अशोक सिंह, प्रा. श्याम हेडावू, हरीश शर्मा यांनी केले.
याप्रसंगी लखनसिंह चंदेल, शिवचंद द्विवेदी, हरीश शर्मा, रेणुका दुधे, नीलेश खरबडे, समीर केने, मनीष पांडे, राजू गुंडेट्टी, ओमप्रकाश राऊत, श्रीनिवास संचुवार, जयराज कंडे, बुचय्या बंदीवार, शांता बहुरीया, मीना द्विवेदी, मीना चौधरी, किरण चंदेल, वैशाली जोशी, संध्या मिश्रा, इंदू बोडे, माधवी सरदेशमुख, संजय मुप्पीडवार, प्रकाश पटेल, रामधन सोमानी, शंकर तोकल उपस्थित होते.