Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

४८ ग्रामसेवा संस्थेच्या निवडणुका अनिश्चिततेच्या सावटात
मेहकर, १९ मे / वार्ताहर

 

शेतकरी आणि सहकारी सोसायटय़ांच्या गेल्या ६ वर्षांपासून निवडणुकाच झाल्या नाहीत. मेहकर तालुक्यात ६१ संस्था आहेत. त्यापैकी १३ संस्थांच्या निवडणुका पार पडल्या तर सोनाटी गावाच्या संस्थेचा व्यवहारच नाही.
तालुक्यात ५४ ग्रामसेवा सहकारी संस्था व ३ विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. यांचा कारभार चालवण्यासाठी १९७१-७२ मध्ये गटसचिवांच्या नियुक्तया करण्यात आल्या होत्या. संस्थांमार्फत शासनाच्या शेतकऱ्यासंबंधीच्या विविध योजणा राबवल्या जातात तसेच सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा केल्या जातो. आजपावेतो ग्रामसेवा सहकारी संस्थेंतर्गत बँकेमार्फत ८ हजार ६९३ सभासदांना एकूण १३ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपयांचे वाटप केले होते. त्यापैकी २००८/२००९ या वर्षांत ९ कोटी ५६ लाख ५२ हजार रुपये कर्ज वसुली करण्याची आवश्यकता आहे परंतु, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे १९ कर्मचारी कारभार हाताळत आहेत. काही कर्मचाऱ्यांकडे ६ ते ७ संस्थांचा कारभार देण्यात आल्यामुळे त्यांची सुद्धा तारांबळ उडत आहे. ६१ सहकारी संस्थांपैकी सोनाटी या गावाच्या संस्थेचा व्यवहार नाही. १३ संस्थांच्या निवडणुका पार पडल्यामुळे ४८ संस्थांची निवडणूक होणे बाकी आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर ४८ संस्थांच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवल्या जात आहे पण, त्यानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणी व मशागतीमध्ये व्यस्त असतात. आक्टोबर, नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांचा अंदाज बघता या ४८ संस्थेच्या निवडणुका पुन्हा अनिश्चिततेच्या सावटाखाली सापडल्या आहेत.