Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

युनिक अ‍ॅकॅडमीच्या १५ विद्यार्थ्यांची आयएएस परीक्षेत अंतिम निवड
अमरावती, १९ मे / प्रतिनिधी

 

संघ लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या आयएएस परीक्षेत युनिक अ‍ॅकॅडमीच्या १५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड या परीक्षेत झाली आहे. युनिक अ‍ॅकॅडमीच्या पुणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर व मुंबई येथे शाखा असून अ‍ॅकॅडमीच्या या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा युनिक अ‍ॅकॅडमी व डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीतर्फे येत्या ८ जून रोजी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा. अमोल पाटील यांनी दिली आहे.
आयएएस परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या युनिक अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये शीतल उगले, बालाजी मंजुळे, अभिनव देशमुख, अनिल पारसकर, अजय तांबोळी, प्रशांत होळकर, माधव देशमुख , पूजा टिल्लू, शिवाजी सुतार, सुधीर कोहकाडे, साहेल काजी, उमेश कोराम यांचा समावेश आहे. शीतल उगले ही महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम आली असून ती युनिक अ‍ॅकॅडमीच्या आयएएस फाऊंडेशन कोर्सची विद्यार्थिनी आहे. बारावीपासूनच तिने युपीएसच्या परीक्षेची तयारी केली होती. गेल्या वर्षी तिची आयआरएससाठी निवड झाली होती, अशी माहिती अमोल पाटील यांनी दिली आहे. बालाजी मंजुळे हा वडार समाजाचा पहिला आयएएस असून दगडफोडीचे काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्य असलेल्या बालाजीने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
अनिल पारसकर हा अकोल्याचा असून त्यालाही आयएएसपद मिळण्याची शक्यता आहे. उमेश कोराम हा युनिक अ‍ॅकॅडमीच्या नागपूर शाखेचा विद्यार्थी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यश लक्षणीय असल्याचे प्रा. अमोल पाटील यांनी सांगितले.