Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

(सविस्तर वृत्त)

रेणके आयोगाच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष सुरूच राहणार -हरिभाऊ राठोड
यवतमाळ, १९ मे / वार्ताहर

 

‘पराभवाने खचून न जाता भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी असलेल्या बाळकृष्ण रेणके आयोगाच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करीतच राहू, आपण सामाजिक कार्याला साध्य मानतो त्या करिता राजकीय क्षेत्र हे साधन आहे, अशी आपली धारणा आहे म्हणूनच रेणके आयोगासाठी लढाई सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी केले. पराभवाचे दु:ख पचवून झाल्यावर तिसऱ्या दिवशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पराभवाची कारणमीमांसा करताना हरिभाऊ राठोड म्हणाले, ‘कुंपणानेच शेत खाल्ले’ आणि ‘आपला गुलाम नबी आझाद झाला’ हे वाक्प्रचार आठवत आहेत. काँग्रेसमधीलच एका गटाने विश्वासघात केला, अन्यथा या मतदारसंघात सेना उमेदवारांचा विजय ही अशक्य कोटीतील गोष्ट होती. देशात काँग्रेसची लाट असताना विदर्भात आणि विशेषत: अमरावती विभागात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही याचे आपल्याला दु:ख आहे. हे दु:ख पचवून आपण आता रेणके आयोगाच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करीत राहू कारण, रेणके आयोगामुळेच भटक्या विमुक्तांचे कल्याण होणार आहे, असे हरिभाऊ राठोड म्हणाले.