Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

सुलतानपूरजवळ भीषण अपघात : बोलेरो ट्रकवर आदळून ४ ठार, ६ जखमी
मृतात वधूपिता व भावाचा समावेश
मेहकर, १९ मे/ वार्ताहर
लोणार तालुक्यातील अजिजपूर येथून मुंबईला निघालेली बोलेरा समोरून आलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जागीच ठार तर ६ जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सुलतानपूरजवळ सोमवारला घडला. मृतांमध्ये वधूपिता व भावाचा समावेश आहे. अपघाताने अजिजपुरात शोककळा पसरली आहे.

ट्रकने महिलेला चिरडले; चंद्रपुरात तणाव
चंद्रपूर, १९ मे / प्रतिनिधी

वरोरा नाका चौकात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकी ट्रकखाली आल्याने एक महिला जागीच ठार झाली. या दुर्घटनेनंतर चौकात तणाव निर्माण झाला. येथे वारंवार अपघात घडत असल्याने संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहराच्या बाहेरील बल्लारपूर वळण रस्त्यावरून होणारी जड वाहतूक नागपूरकडे जाताना वरोरा नाका चौकातून वळण घेते.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष व जि.प. अध्यक्षांच्या मतदारसंघातच मेघेंची पिछाडी
प्रशांत देशमुख
वर्धा, १९ मे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या गावात काँग्रेसचे दत्ता मेघे यांना आघाडी मिळवून दिली असतानाच मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कलावती वाकोडकर तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण उरकांदे यांच्याच मतदारसंघात मेघे पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडी सत्तेत आहे. यामध्ये काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष कलावती वाकोडकर यांचा जि.प. मतदारसंघ वाढोणात मेघेंपेक्षा भाजपच्या सुरेश वाघमारेंना आघाडी मिळाली आहे.

सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक उपचार कक्ष
राज्यभरात १२ जिल्ह्य़ांमध्ये प्रायोगिक सुरुवात
चांदूर रेल्वे, १९ मे/ वार्ताहर
सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग विद्यार्थ्यांसाठी शस्त्रक्रियेसोबतच आता अत्याधुनिक उपचार कक्षाच्या माध्यमातून फिजिओथेरपी (भौतिक उपचार) व आक्युपेशन थेरपीद्वारे (व्यवसायोपचार) ० ते १८ वयोगटातील मतिमंद, कर्णबधिर, अस्थिव्यंग, आदी अपंगाच्या विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर उपचार केल्या जात आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
अमरावती, १९ मे / प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी आणि चुकीचे सर्वेक्षण करून शासनाला खोटा अहवाल सादर केल्याबद्दल तहसीलदारांना निलंबित करावे, अशी मागणी किसान स्वराज्य आंदोलनाचे प्रमोद तऱ्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या खरीप हंगामात लष्कर व उंट अळीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते.

अकोल्यातील प्रेमीयुगुल हत्याकांड
नाकरेचाचणीतून रहस्य उघडकीस येणार
अकोला, १९ मे/प्रतिनिधी
अकोल्यातील बहुचर्चित अमित-प्रतीक्षा प्रेमीयुगुल हत्याकांडातल तीन आरोपींच्या नाक रे चाचणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या चाचणीनंतर या प्रकरणातील सत्य उजेडात येणार आहे. अकोला शहराच्या दाबकी मार्गावर राहणाऱ्या अमित व प्रतीक्षा या अल्पवयीन प्रेमीयुगुलाची १४ जून २००८ रोजी सामूहिक हत्या करण्यात आली होती.

माणिकराव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी
पुसद, १९ मे / वार्ताहर

उमेदवारांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीचे माजी सचिव डॉ. मोहम्मद नदिम यांनी केली आहे. विदर्भासह मराठवाडय़ातील सतरा लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक निर्णायक असूनदेखील मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. दिग्रस, पुसद, अचलपूर, अंजनगाव येथील दंगलीत पोलिसांकडून अल्पसंख्यांकांवर अन्याय झाल्याचे लक्षात आणून दिल्यानंतरही काहीच फायदा न झाल्याने काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माणिकराव ठाकरे यांनी निवडणुकांकडे संपूर्ण लक्ष देऊन पक्षाने टाकलेली जबाबदारी पार पाडायला हवी होती. परंतु ते तेथे अपयशी ठरले. गृह मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव झाला, असे ते म्हणाले.

अंभोडा परिसरात बिबटय़ाचा धुमाकूळ
बुलढाणा, १९ मे / प्रतिनिधी

अंभोडा झरी परिसरात बिबटय़ाचा धुमाकूळ सुरूच असून आतापर्यंत सात जणांना जखमी तर १५ ते २० जनावरांना बिबटय़ाने मारले आहे. वनअधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार अंभोडाचे सरपंच रमेश तायडे यांनी केली आहे.बिबटय़ाच्या दहशतीबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी तराळे, वरिष्ठ अधिकारी अब्दुल रौफ यांना लेखी व तोंडी तक्रारी देऊन बिबटय़ाच्या बंदोबस्ताची मागणी केली. मात्र, वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व जखमींना मदत करण्यात यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

पतंजली योग-प्राणायाम केंद्राचा वर्धापन दिन
भंडारा, १९ मे / वार्ताहर

येथील ‘मिस्क्रीन टँक’ बगिच्यात भंडारा पतंजली योग प्राणायाम केंद्राचा वर्धापन दिन, उद्योजक व ज्येष्ठ नागरिक राजाराम निर्वाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केशवराव निर्वाण, केशवराव तिडके, यशवंत गायधने, जयकुलवार उपस्थित होते. प्रास्ताविक श्याम कुकडे यांनी केले. आभार गभणे यांनी मानले. या केंद्रात एकूण ३०० स्पर्धक असून योग आसन, यौगिक क्रिया, सूर्यनमस्कार, प्राणायाम याबद्दल मार्गदर्शन दररोज केले जाते. या कार्यक्रमाला केशवराव तिडके, नरेंद्र बुरडे, समरित विठ्ठल खेडकर, मोहम्मद सईद शेख, गणेशसिंह बैस, सुधाकर फाये, कमला कारेमोरे, इंदू भुरे, रमेश कटकवार आदी उपस्थित होते.

मोफत हृदयरोग तपासणी शिबीर
बुलढाणा, १९ मे / वार्ताहर

येथील सुश्रुत आयुर्वेद हॉस्पिटल व पुणे येथील साधू वासवनी इनलॅक्स व बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने २४ मे रोजी मोफत हृदयरोग तपासणी व निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक सुश्रुत आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत हे शिबीर आयोजिन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग तपासणी व निदान करण्यात येणार असून पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोहर साखरे रुग्णांची तपासणी करणार आहेत. रुग्णांनी नाव नोंदणीसाठी डॉ. गजानन पडघान, सुश्रुत आयुर्वेद हॉस्पिटल बुलढाणा, डॉ. मधुसूदन सावळे, सावळे डायग्रोस्टीक्स बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जखमी कंत्राटदाराचा मृत्यू
आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा
बल्लारपूर, १९ मे / वार्ताहर

येथील पेपर मिलमधील रंगकामाचे कंत्राटदार मो. अस्लम मो. सिकंदर (५५) यांचे उधार घेतलेल्या पैशावरून कामगार अमर ऊर्फ अमन चिंधूजी चिकराम (२९) याच्याशी भांडण झाले. संतापाच्या भरात अमनने लोखंडी सळीने कंत्राटदाराच्या डोक्यावर मारली. त्यात कंत्राटदार मो. अस्लम गंभीररीत्या जखमी झाले. आरोपी अमर फरार होता. कंत्राटदार मो. अस्लम यांना तातडीने डॉ. अजय मेहरा यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. घटनेपासूनच कोमात गेलेल्या मो. अस्लम यांचा उपचारा दरम्यान शुक्रवारी मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. दरम्यान फरार आरोपीस अटक करण्यात आली.

क्रिकेटच्या चेंडूवरून दोन गटात वाद
खामगाव, १९ मे / वार्ताहर

शहरात क्रिकेटच्या चेंडूवरून दोन गटात वाद झाला. टिळक मैदानावर एका गटाची काही मुले खेळत होती. दरम्यान, एक मुलगा चेंडू टोलवत असताना दुसऱ्या गटाच्या मुलास तो लागल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीने प्रकरण शांततेत मिटले. टिळक मैदानाजवळील विवेक राजेश मांडवेकर (३) याला चेंडू लागल्याने त्याच्या वडिलांनी दुसऱ्या गटाच्या मुलांना हटकले असता एक दुसऱ्या गटाचे लोक त्यांच्या अंगावर धावले. त्यांच्याशी बाचाबाची केली. दरम्यान, हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार कानडे, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्यांना पिटाळून लावल्याने या भागातील तणाव मिटला.

धिंगाणा घालणाऱ्या घोडेवाल्यास अटक
खामगाव, १९ मे / वार्ताहर

पहुरजिरा येथे देवीच्या ओटय़ावर नवरदेवाला घोडय़ासह नाचवून धिंगाणा घातल्याप्रकरणी घोडेवाल्यास अटक करण्यात आली आहे. पहुरजिरा येथे देवीचा मानाचा ओटा आहे. या ओटय़ाजवळून नवरदेवाची वरात चालली होती. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य रहिमखां पठाण यांनी नवरदेवाचा घोडेवाला जुबेन इब्राहीम गवळी याला घोडा नवरदेवासह देवीच्या ओटय़ावर घ्यायला लावला. त्यानंतर वाजंत्रीवर घोडय़ासह नवरदेवाला नाचायला लावले. हे दृश्य दिसताच लोक घटनास्थळी धावून गेले. त्यानंतर त्यांनी नवरदेवासह मिरवणूक पुढे नेली. नंतर गावातील विजय राजनकर सह १०० नागरिक जलंब ठाण्यात गेले. तेथे त्यांनी घटनेची फिर्याद दिली. पोलिसांनी एकटय़ा घोडेवाल्याला अटक केली आहे.

नागरिकांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा
रिसोड, १९ मे / वार्ताहर
जीवनआधार केंद्राद्वारे स्वस्त धान्य दुकान देतो, असे सांगून तालुक्यातील नागरिकांकडून पैसे घेतल्या प्रकरणी तीन संशयित आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाशीम जिल्ह्य़ात या टोळीने मोठय़ा प्रमाणात लोकांची फसवणूक केली आहे. पोलीस व अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कसून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. शिवराज कोकाटे (रा. मोरगव्हाण) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जीवन आधार केंद्राद्वारे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना व धान्य देतो असे सांगून प्रत्येकी सात हजार सातशे रुपये आरोपींनी घेतले. आम्हाला कोणाताही प्रकारचा धान्याचा माल दिला नसून आमची फसवणूक केली आहे. आम्हाला काहीच देण्यात आले नाही. यानुसार पोलिसांनी जीवन आधार केंद्राचे संचालक पुणे स्वप्नील किशोर रखके रा. रिसोड, डी.के. डायगव्हाणे गुन्हे दाखल केले आहे. जीवन आधार स्वस्त धान्य केंद्राद्वारे तालुक्यातील अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

पांजऱ्यात एकाच रात्री चार चोऱ्या
कोराडी, १९ मे / वार्ताहर

परिसरातील पाल पेट्रोल पंपा समोरील पांजरा वस्तीत चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री चार घरे फोडली आणि ४१ हजारांचा माल लंपास केला. चारही घरातील कुटुंबे लग्नानिमित्त बाहेर गावी गेले होते. चोरटय़ांनी मध्यरात्री घरामध्ये प्रवेश करून माल लंपास करून पसार झाले. अशोक शंकर बारापात्रे, राजेश सुधाकर कुंभारे, रवींद्र सावरकर तसेच सावरकर यांच्या घरी चोरी झाली.