Leading International Marathi News Daily

बुधवार, २० मे २००९

विविध


पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात लष्कराने तालिबानविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांमधील अनाथ झालेला हा मुलगा जेवणासाठी छोटा लाहोरमधील मदत छावणीमधील रांगेत उभा आहे.

श्रीलंकेतील सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान करणार - राजपक्षे
कोलंबो, १९ मे/पीटीआय

श्रीलंकेमधील तामिळींचा प्रश्न सोडविण्यासाठी लष्करी कारवाई हा अंतिम उपाय असल्याचे आम्ही मानत नाही. श्रीलंकेतील सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान करणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे असे त्या देशाचे अध्यक्ष राजपक्षे यांनी आज पार्लमेंटमध्ये केलेल्या भाषणात म्हटले आहे. दहशतवादाविरोधातील लढाई आता संपली असल्याचेही ते म्हणाले. आश्चर्याची बाब ही की एलटीटीईचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन हा लष्कराच्या कारवाईत ठार झाला असल्याबद्दल कसलाही उल्लेख करणे राजपक्ष यांनी टाळले.

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
बालासोर, ओरिसा १९ मे/पीटीआय

अग्नी-२ या लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी आज यशस्वीरित्या घेण्यात आली. ओरिसाच्या किनाऱ्यावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. येथून ८० कि.मी. अंतरावर असलेल्या धर्माजवळच्या व्हीलर्स बेटांवरून सकाळी १० वाजून सहा मिनिटांनी फिरत्या प्रक्षेपकावरून ते सोडण्यात आले. लष्कराने केलेली ती उपयोजित चाचणी होती, यावेळी संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे वैज्ञानिक उपस्थित होते. अत्यंत आधुनिक स्वरूपाचे हे क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला ३००० किलोमीटर इतका आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता त्याच्या माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने घेतलेल्या यशस्वी चाचण्यानंतर या क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. एका वरिष्ठ संरक्षण वैज्ञानिकाने सांगितले की, या प्रकारच्या क्षेपणास्त्रासाठी लागणारी सर्व साधनसामग्री तयार करण्यात आली आहे. आता लष्करातही अशा प्रकारची क्षेपणास्त्रे हाताळण्याचे विशेष कौशल्य असलेला एक गट स्थापन करण्यात आला आहे. सरकारी मालकीच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीने अग्नी-१ व अग्नी-२ या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत मोठी भूमिका पार पाडली आहे. भारतीय बनावटीच्या अग्नी-१ क्षेपणास्त्राचा पल्ला १५०० किमी असून अग्नी-२ क्षेपणास्त्र १००० किलो वजन घेऊन २५०० ते ३००० किमी अंतरापर्यंत मारा करू शकते.

इराणच्या अण्वस्त्रांचा साऱ्या जगाला धोका-ओबामा
वॉशिग्टंन, १९ मे /पीटीआय

इराण अण्वस्त्रांची निर्मिती करून साऱ्या जगाला अस्थिर करणार नाही यासाठी अमेरिका सर्व ते प्रयत्न करेल असे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या भेटीनंतर व्यक्त केले. इराणकडील अण्वस्त्रामुळे त्याचा अमेरिका, इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असे सांगून ते म्हणाले की, या भूमिकेबाबत आम्ही गंभीर आहोत. त्यासाठी अधिक आंतरराष्ट्रीय र्निबधासह अन्य काही पर्यायाच्या जवळ आम्ही पोहोचत आहोत. चर्चेच्या माध्यमातून इराणने अण्वस्त्रे प्राप्त करण्याचा मार्ग सोडून द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, याबाबतचे सर्व पर्याय आम्ही खुले ठेवले आहेत. इराणच्या अण्वस्त्रांमुळे इस्रायलला निर्माण होणाऱ्या धोक्यांची नेतान्याहू यांनी या बैठकीत ओबामा यांना सविस्तर कल्पना दिली. ते म्हणाले की, इराण अण्वस्त्रांची निर्मिती करेल व त्यामुळे आमच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होईल. इराणी नेते जाहीरपणे आम्हाला नष्ट करण्याच्या घोषणा करत आहेत. मध्यपूर्व आशियातील मध्यमार्गी अरब राष्ट्रांसह अमेरिकेलाही इराणच्या अण्वस्त्रांचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

कोलकाता दारूगोळा कारखाना मंडळाच्या माजी महासंचालकासह चौघांना अटक, दोन कोटींची रोकड सापडली
नवी दिल्ली, १९ मे/पीटीआय

कोलकाता येथील दारूगोळा कारखाना मंडळाचे माजी महासंचालक व त्यांच्या इतर तीन साथीदारांना आज सीबीआयने लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपये रोख व काही प्रमाणात परकीय चलन जप्त करण्यात आले. अटक केलेल्या चौघांमध्ये माजी महासंचालक सुदिप्ता घोष, आशिष बोस, प्रदीप राणा, कन्हैयालाल दास यांचा समावेश आहे. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोलकाता येथे घोष व दास या दोघांना अटक करण्यात आली तर राणा व बोस यांना देशाच्या राजधानीत ताब्यात घेण्यात आले. यावेळी तपासणीत सीबीआयला घोष यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी एक कोटी रुपये सापडले. त्यांच्या सिंगापूर बँकेतील खात्यात ९९ हजार ९९७ डॉलर (सुमारे ५० लाख रुपये) आहेत. त्या खात्यात शेवटचा व्यवहार १० नोव्हेंबर २००८ रोजी केलेला आहे. सीबीआयने कोलकाता येथील विशेष न्यायालयात एफआयआर दाखल केला असून त्यात म्हटले आहे की, घोष यांनी बोस व इतरांच्या मदतीने गुन्हेगारी कट केला. दारूगोळा कारखान्याच्या खासगी पुरवठादारांकडून पुरवठा मागण्या नोंदवताना लाच घेतली यात काही परदेशी पुरवठादारांचाही समावेश होता. घोष हे ३० एप्रिलला निवृत्त झाले असून त्यांनी कोलकाता दारूगोळा कारखाना मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. २००८-०९ पासूनच सीबीआयने घोष यांच्या कारभारावर नजर ठेवली होती. बोस यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ४७.७० लाख रुपये तर प्रदीप राणा यांच्या निवासस्थानी अडीच लाख रुपये सापडले आहेत, आता त्यांचे जाबजबाब नोंदवले जाणार आहेत.

माकपच्या मतांचा टक्का घटला!
नवी दिल्ली, १९ मे /पीटीआय

संयुक्त पुरोगामी आघाडीचा सत्तेवरच्या शेवटच्या पाठिंबा काढून घेण्याची चूक डाव्या पक्षांचे नेतृत्त्व करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला चांगलीच भोवल्याचे निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीवरून दिसून येत आहे. माकपचे वर्चस्व असणाऱ्या पश्चिम बंगाल, केरळ व त्रिपुरातील टक्केवारीने चांगलाच गोता खाल्ल्याने पक्षाला धोक्याचा इशारा दिला आहे. या तीन राज्यांत सत्तेवर असणाऱ्या माकपचा मतांचा हिस्सा २००४ च्या ५.६६ टक्क्य़ांवरून ५.३३ टक्के असा घसरला असून लोकसभा सदस्यांची संख्या ४३ वरून १६ वर आली आहे. पश्चिम बंगाल, केरळ व त्रिपुरात माकपला मिळालेल्या मतांची टक्केवारी अनुक्रमे ३३.१, ३०.४८ व ६१.६९ अशी आहे. २००४ ला हीच टक्केवारी ३८.५७, ३१.५२ व ६८.८ अशी होती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २००४ ला मिळालेल्या २१.०४ मत टक्केवारीच्या तुलनेत ३१.१७ टक्के अशी दणदणीत मते मिळाली आहेत. काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या टक्केवारीत घट झाली असून २००४ ला मिळालेली अनुक्रमे १४.५६, ८.०६ टक्के मते या वेळी १३.४५, ६.१४ टक्के अशी घसरली आहेत. केरळात माकपचा टक्का घसरत असताना काँग्रेसने आपला टक्केवारीतील हिस्सा ३२.१३ टक्क्य़ांवरून ४०.१३ टक्के असा भरघोस वाढविला आहे. भाजपच्या टक्केवारीत १०.३८ टक्क्य़ांवरून ६.३१ टक्के अशी घसरण झाली आहे. त्रिपुरात माकपच्या टक्केवारीत सात टक्क्य़ांनी घसरण होत असताना काँग्रेसने आपली टक्केवारी १४.२८ टक्क्य़ांवरून ३०.७५ टक्क्य़ांपर्यंत वाढविली आहे. बिगर काँग्रेस व बिगर भाजप पक्षांशी आघाडी करण्याचा पक्षाचा निर्णय मतदारांना विश्वासार्ह व योग्य पर्याय वाटला नसल्याने कामगिरी खालावल्याचे मत पक्षाने व्यक्त केले आहे. १९६४ मध्ये स्थापना झाल्यापासून पक्षाची प्रथमच एवढी खराब कामगिरी झाली असून ही बाब चिंताजनक आहे व मतदारांचा पाठिंबा, विश्वासार्हता मिळविण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जातील असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

जिवंत काडतुसे, रायफलसह भोपाळ विमानतळावर महिलेला अटक
भोपाळ, १९ मे/ पीटीआय

येथील राजा भोज विमानतळावर एका प्रवासी महिलेच्या बॅगेत १० जिवंत काडतुसे सापडल्यावर तिला अटक करण्यात आली. जेट एअरवेजचे हे विमान मुंबईला जाण्यासाठी उड्डाण करणार असताना काही मिनिटे अगोदर ही बाब लक्षात आली असे पोलिसांनी सांगितले. अन्वर सुल्तान असे या महिलेचे नाव असून, तिच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला या जिवंत काडतुसांबरोबरच तिच्या बॅगेत ३१५ बोअरची एक रायफलही सापडली. अन्वर सुल्तान ही ५५ वर्षांची महिला भोपाळचीच रहिवासी असून, मुंबईला जाण्यासाठी सकाळी ९ वाजेचे जेट एअरवेजचे विमान पकडण्यासाठी आपला मुलगा ममनून हसन यांच्याबरोबर विमानतळावर आली होती. अटक केल्यानंतर तिला स्थानिक पोलिसांच्या हवाली करण्यात आले, तसेच शस्त्रास्त्र कायद्याखाली तिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हाही गांधीनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, आज न्यायालयातही हजर करण्यात आले. सदर महिलेची चौकशी करण्यात आल्यानंतर ही काडतुसे आपल्या मुलाचा मित्र लईक याची असल्याचे तिने सांगितले. ही बॅग आपण त्याच्याकडूनच घेतली होती तसेच रायफलचा परवाना जहांगिराबाद येथून घेतल्याचेही तिने सांगितले.

फ्रेंच अध्यक्षांच्या पत्नीचा हल्लाबोल
पोप यांनी आफ्रिका खंडाची वासलात लावली!
लंडन, १९ मे/पी.टी.आय.
‘एड्सचा प्रसार कंडोमचे वाटप करून थांबणार नाही. उलट त्यामुळे ही समस्या आणखी बिकट होईल.’ असे विधान आफ्रिकेत जाऊन करणाऱ्या पोप बेनेडिक्ट यांच्यावर फ्रान्सच्या ‘फर्स्ट लेडी’ अर्थात अध्यक्षांच्या पत्नी कार्ला ब्रुनी यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. गेल्या मार्च महिन्यात पोप यांनी आफ्रिका दौऱ्यावर असताना हे धक्कादायक विधान केले होते. कोणत्याही प्रकारचे गर्भनिरोधक वापरण्यास ख्रिश्चन धर्माची मान्यता नाही. या पाश्र्वभूमीवर पोप बेनेडिक्ट यांनी याच धोरणाचा पुरस्कार करताना एड्सचा सगळ्यात जास्त फटका बसलेल्या आफ्रिकेत कंडोमचे वितरण करण्यास विरोध दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचा कार्ला ब्रुनी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आपल्या पूर्वायुष्यात एक प्रथितयश मॉडेल म्हणून नाव कमावलेल्या ब्रुनी यांच्या या हल्ल्याने ख्रिश्चन धर्मवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.‘फेमी अ‍ॅक्चुएली’ या महिलाप्रधान नियतकालिकास दिलेल्या मुलाखतीत कार्ला ब्रुनी यांनी पोप यांच्याविषयीचा हा संताप प्रकट केल्याचे वृत्त लंडनमधील ‘दि टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने दिले आहे. मी जन्माने ख्रिश्चन आहे. माझा ‘बाप्तिस्मा’सुद्धा झालेला आहे. परंतु मी आयुष्यात ‘कट्टर धर्मनिरपेक्ष’पणे वावरले. वास्तविक आफ्रिका खंडात आजारी, असहाय्य जनतेची सेवाशुश्रुषा चर्चमार्फतच केली जाते. हा प्रत्यक्ष व्यवहार आणि तत्वज्ञान यांतील फरक धक्कादायक आहे. पोप यांच्या संदेशातून असा समज होतो की कंडोम हे गर्भनिरोधनाचे एक साधन आहे. आणि कोणत्याही गर्भनिरोधकास चर्चचा विरोध आहे. परंतु कंडोम हे आज माहिती असलेले एड्स टाळू शकणारे एकमेव साधन आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असे परखड मत कार्ला ब्रुनी यांनी मांडले आहे.

तिहारमधील कैदी आता करणार वातानुकूलित गाडीतून प्रवास!
नवी दिल्ली, १९ मे/पी.टी.आय.

‘गुन्हा करावा आणि तिहार तुरुंगात जावे’ अशी नवी म्हण आता दिल्ली आणि आसपासच्या गुन्हेगारी वतुळात तयार होऊ घातली आहे. तुमचा पुरेसा ‘प्रभाव’ असेल तर तिहारमध्ये तुम्हाला टीव्ही, पंखे, आरामशीर पलंग, उशा आणि गाद्या, साग्रसंगीत भोजन, वॉकमन, रेडिओ, सिगरेट्स, मद्य अशा अनेक सवलती मिळू शकतो. अर्थात या साऱ्या ‘सोयी’ अनधिकृतच असतात. परंतु या यादीत आता ‘अधिकृत’पणे वातानुकुलित प्रवास या सुविधेची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गंमत म्हणजे या कैद्यांचा काहीही संबंध नसलेल्या ‘सहाव्या वेतन आयोगा’ने त्यांना ही संभाव्य ‘भेट’ दिली आहे.तिहार तुरुंगात असलेल्या कैद्यांना त्यांच्यावरील खटल्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या न्यायालयांमध्ये नेले जाते. त्यासाठी त्यांच्याबरोबर हत्यारी पोलीस जात असतात. सहाव्या वेतन आयोगाने हत्यारी पोलिसांना प्रवासासाठी ‘एसी थ्री टायर’ श्रेणी देऊ केली आहे. आता हेच हत्यारी पोलीस जर कैद्यांना घेऊन जाणार असतील तर कैद्यांनाही त्याच श्रेणीतून न्यावे लागणार.यासंदर्भात दिल्ली सरकारच्या गृह मंत्रालयाने तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना कायदेशीर मत मागितले आहे.

रशियन युवतीचा मृत्यू; पुण्यातील दोन विद्यार्थ्यांची चौकशी
पणजी, १९ मे/पीटीआय

थिविम स्थानकाजवळ रुळांमध्ये एलिना सुखानोव्हा या १९ वर्षीय रशियन मुलीचा मृतदेह ८ मे रोजी आढळून आला होता. या मुलीच्या मृत्यूपूर्वी काही दिवस तिला भेटलेल्या पुण्यातील दोन विद्यार्थ्यांची गोवा पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र या विद्यार्थ्यांची नावे पोलिसांनी उघड केलेली नाहीत. यासंदर्भात पोलीस अधीक्षक टोनी फर्नाडिस यांनी सांगितले की, हे दोन विद्यार्थी गोव्यामध्ये सहलीसाठी आलेले असताना त्यांनी एलिनाची एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात बागा समुद्रकिनारी भेट घेतली होती. एलिना ही ट्रेनमधून पडून तिचा अपघाती मृत्यू झाला की तिला ठार मारण्यात आले अशा दोन्ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करीत आहेत. मृत्यूच्या काही दिवस आधी एलिनाने पुण्यातील या दोन विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून बोलणे केले होते हेही तपासात उघड झाले आहे. ती या दोन विद्यार्थ्यांना कशी भेटली की त्यांना भेटायला एलिना गोव्याहून मुंबई की पुण्याला चालली होती याचाही तपास आम्ही करीत आहोत. या दोघांनी एलिनाच्या सहवासात एक दिवस घालविला होता. याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे असे फर्नाडिस म्हणाले.

आसाममधील हिंसाचारात १० ठार, मालगाडीवर गोळीबार
गोहाटी, १९ मे/पी.टी.आय.
आसामच्या हिंसाचारग्रस्त कर्बी आँगलाँग आणि नॉर्थ कचार हिल्स या दोन जिल्ह्णाांमध्ये आज पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला. यात सहा अतिरेक्यांसह १० जण ठार झाले तर एका मालगाडीवरही गोळीबार करण्यात आला. नॉर्थ कचार हिल्स जिल्ह्णात काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एक वाहन थांबवून त्यातील प्रवाशांना खाली उतरण्यास भाग पाडले. व खाली उतरलेल्यांवर गोळीबार केला. यामध्ये चारजण जागीच ठार झाले. हल्लेखोर त्यानंतर पळून गेले. तर शेजारच्या कर्बी आँगलाँग जिल्ह्णाात लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ‘नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड’ या संघटनेचे सहा अतिरेकी ठार झाले. त्यांच्याजवळून लष्कराने मोठय़ा प्रमाणावर दारुगोळाही जप्त केला. एनसी हिल्स जिल्ह्णाात काही अतिरेक्यांनी एका मालगाडीवरही गोळीबार केला. माहुर गावाजवळ बोगद्यातून बाहेर येणाऱ्या मालगाडीवर त्यांनी गोळीबार केला.