Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

व्यापार-उद्योग

वृद्धीदर घसरला तरी विद्युत उपकरण क्षेत्रात उभारीची ‘ईमा’ला उमेद
व्यापार प्रतिनिधी: भारतीय विद्युत उपकरण निर्मिती व्यवसायास गेल्या २००८-०९ च्या आर्थिक वर्षांत मोठा धक्का बसला. या वर्षांत या उद्योगाचा वृद्धिदर केवळ २.७३ टक्के इतका राहिला. सन २००७-०८ मध्ये हाच दर १५ टक्के होता. या तुलनेत गेल्या वर्षी या उद्योगाचा वृद्धीच्या दरात मोठी घट झाली. वृद्धिदरातील घसरणीच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत देशात केवळ ३४५४ मेगाव्ॉट वीजनिर्मितीची भर पडली. या वर्षांत ११०६१ मेगाव्ॉट नवी वीजनिर्मिती करण्याची सरकारची योजना असतानादेखील त्यापैकी केवळ निम्मी भर प्रत्यक्षात पडली. याखेरीज निर्यात आणि

 

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मागणीही मर्यादितच राहिली. भारतीय विद्युत उपकरण निर्मिती उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी ‘ईमा’ ही संस्था त्यांच्या सदस्यांकडून संकलित केलेल्या वीजनिर्मिती आणि विक्रीसंबंधीच्या एकत्रित आकडेवारीच्या आधारे उपकरण उद्योगातील वृद्धीचा नियमित आढावा घेत असते. पारेषण वाहिन्या, केबल्स, कॅपॅसिटर्स या क्षेत्रात सकारात्मक वृद्धिदर आढळून आला असून स्वीचगियर क्षेत्रातील वृद्धिदरात फारसा बदल झालेला नाही. रोटेटिंग मशिन्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि वीज मीटरच्या क्षेत्रात मात्र नकारात्मक वृद्धी म्हणजे वृद्धिदर घटलेला दिसतो. आयातीशी निगडित असलेल्या विद्युत क्षेत्र, ग्राहक आणि वितरण कंपन्यांकडील मागणी अत्यल्प राहिल्याने कमी दाबाच्या उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. एलटी मोटर्स, एलटी स्वीचगियर उत्पादने, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर उद्योगासही वृद्धिदरात मोठी घसरण पाहावी लागली आहे. वीजनिर्मितीमुळे एचटी मोटर्स, एचव्ही-ईएचव्ही ब्रेकर्स, पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, एचटी कॅपॅसिटर्स, ट्रान्समिशन लाइन टॉवर्स, केबल आणि कंडक्टर्स अशा उच्चदाब उपकरणांच्या उत्पादनांना मागणी असून ‘राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना’ तसेच अन्य केंद्र सरकारी योजना आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या विविध योजनांमुळेदेखील या उत्पादनांच्या मागणीत सातत्य राहिले आहे. पॉवर केबल्स, पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, इन्स्ट्रमेंट ट्रान्सफॉर्मर, ट्रान्स्फॉर्मर्स, ट्रान्समिशन लाइन टॉवर्स अशा उत्पादनांनी विदेशातील मागणीसंबंधीची आपली स्वीकारार्हता कायम राखली असली तरी अगोदरच्या वर्षीच्या तुलनेत व्यापारातील नकारात्मक संतुलन जवळपास दुपटीने वाढले आहे. एलटी आणि एचटी स्वीचगियर, मोटर्स आणि वायिडग वायर्सची मोठय़ा प्रमाणावरील आयात हे या मागील महत्त्वाचे कारण असावे.

बिपाशा बासू ‘अ‍ॅरिस्टोक्रॅट’ची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर
व्यापार प्रतिनिधी: भारतातील आघाडीचा आणि सर्वात लोकप्रिय लगेज ब्रॅण्ड ‘अ‍ॅरिस्टोक्रॅट लगेज’ने आघाडीची अभिनेत्री बिपाशा बासूची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर म्हणून नेमणूक केली. व्हीआयपी इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर जाटीया म्हणाले की, आम्हाला बिपाशा बासूबरोबर केलेला हा सहकार्य करार आमच्या ब्रॅण्डसाठी अगदी योग्य आहे. स्टाइल, दर्जा आणि सौंदर्य या गोष्टींनीच तिचे व्यक्तिमत्त्व बहरले आहे आणि नेमक्या त्याच गोष्टी आमच्या ब्रॅण्ड व्हल्यू आणि पोजिशनींगमधून ध्वनित होतात.

‘पाँड्स’चे ‘व्हाइट ब्युटी स्पॉटलेस लायटनिंग क्रीम’
व्यापार प्रतिनिधी: पाँड्सने ‘पाँड्स व्हाईट ब्युटी स्पॉटलेस लायटनिंग क्रीम’ सादर केले आहे. यातील मॉइश्चरायझर केवळ त्वचेचा उजळपणाच वाढवत नसून, त्वचेवरील डाग अल्पावधीत दूर करते. या क्रीममध्ये प्रो व्हिटॅमिन बी ३ने युक्त प्रगत तंत्र वापरले आहे. पाँड्स व्हाईट ब्युटी स्पॉटलेस लायटनिंग क्रीमची किंमत ५० ग्रॅम जारसाठी १५० रुपये असून, ते देशभरातील सर्व आघाडीच्या ब्युटी स्टोअर्समध्ये व औषधविक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

सोनी इंडियाची एलसीडी बाजारपेठेत विशेष कामगिरी
व्यापार प्रतिनिधी: सोनी इंडियाने एलसीडी बाजारपेठेत २००९ या आर्थिक वर्षांत बाजारपेठेत पहिला क्रमांक पटकावला आहे. कंपनीने १४ नवीन ब्राव्हिया मॉडेलची रेंज बाजारात आणत एलसीडी बाजारपेठेतील ३० टक्के हिस्सा काबीज केला. सोनीने १३ नवीन मॉडेल्स एस. व्ही. डब्ल्यू आणि झेड मालिकेंतर्गत आणली असून मोशनफ्लो २०० एचझेड, फूल एचडी, ब्राव्हिया इंजिन ३ यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ब्राव्हियाच्या नवीन मालिकेंतर्गत स्पष्ट, व्हायब्रंट आणि जीवनाचे खरे अंतरंग उलगडून दाखवणारी प्रतिमा तयार करण्यात आली आहे.

कल्याणच्या ‘फॅशन यात्रा’मध्ये समर्स शॉपिंग
व्यापार प्रतिनिधी: तब्बल एक लाख रुपयांपर्यंतचे इनाम जिंकण्याची ग्राहकांना संधी देणारा समर शॉपिंग उत्सव कल्याणस्थित ‘फॅशन यात्रा’ स्टोअरने सुरू केला आहे. ३१ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या या उत्सवात ग्राहकांना खरेदीवर १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत सूट, खरेदीवर बक्षिसे तसेच प्रत्येक वीकएण्डला कुटुंबासाठी व छोटय़ांसाठी विविध प्रकारचे हॉबी वर्कशॉप्सचा आनंदही उपभोगता येईल. ग्राहकांनी ‘फॅशन यात्रा’मध्ये किड्स वेअर, वुमन्स वेस्टर्न वेअर, एथनिक वेअर आणि मेन्स वेअरच्या विविध ब्रॅण्ड्समधील अत्यंत नव्या श्रेणीची खरेदी करता येईल आणि दर सप्ताहाअखेर सोडत असलेल्या रु. २०,००० ते रु. १,००,००० रोख बक्षिसाच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये सहभागी होता येईल. येत्या २३ आणि ३० मे रोजी स्टोअरमध्ये पाच ते १२ वर्षे वयोगटातील लहानग्यांसाठी अनुक्रमे ओरिगामी आणि शेलबाऊंड या विषयावर मोफत वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

सेटको ऑटोमोटिव्हला १२.५३ कोटींचा नफा
व्यापार प्रतिनिधी: सेटको ऑटोमोटिव्ह लिमिटेडला आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये १२.५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. २००७-०८ मध्ये कंपनीस १२.२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या विक्रीत पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असून, विक्री १३८.५३ कोटी रुपयांवरून वाढून १६०.१४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. उत्तराखंड येथे कंपनीने प्रकल्प उभारला असून, त्यामुळे हे शक्य झाले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरीश सेठ म्हणाले, ‘मूळ उत्पादनांच्या विक्रीत सुमारे २८ टक्के घट होऊनही एकूण विक्रीत कंपनीस पंधरा टक्के वाढ साधता आली आहे.