Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

अग्रलेख

फिटे अंधाराचे जाळे!

 

डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे आधुनिक, सुसंस्कृत आणि सेक्युलर व्यक्तिमत्त्व या देशाच्या पंतप्रधानपदी सलग दुसऱ्यांदा विराजमान होत आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी डॉ. सिंग यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून न सुचवता त्यांचा उल्लेख थेट पंतप्रधान म्हणून केला. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षाचे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होते आणि भारतातल्या कोटय़वधी जनतेने त्यांच्या या आश्वासक नेतृत्वावर खणखणीत शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळेच सोनिया गांधींनी औपचारिकतेचा भाग सोडून देऊन डॉ. सिंग हेच पंतप्रधान आहेत, असे जाहीर केले. डॉ. सिंग यांनी सभ्य, विनयशील आणि दृढनिश्चयी या त्यांच्या स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन घडवले. सुसंस्कृत अशासाठी की गेल्या तेरा वर्षांच्या कालखंडात काँग्रेस पक्षाला कधी नव्हे एवढा विजय मिळूनही त्यांनी तो आपल्या डोक्यावर स्वार होऊ दिलेला नाही. सभ्यतेच्या बाबतीत डॉ. सिंग यांचा आदर्श भल्याभल्यांनी घ्यायची आवश्यकता आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाचे महत्त्व नि:संशय आहे. त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना आणि डाव्यांना सुद्धा सहकार्याचा हात पुढे केला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वात कमकुवत (निकम्मा) पंतप्रधान, अशासारखे शब्दप्रयोग अडवाणींनी वापरल्यानंतरही आपल्या मनात त्याविषयी यत्किंचितही अढी नाही, हे त्यांनी दाखवून दिले. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींना दूरध्वनीवरून ‘तुम्ही मला माझ्या धाकटय़ा बहिणीसारख्या आहात’ हे त्यांनी सांगितले. संस्कृतीचा हा आदर्श कोणत्याही धार्मिक पुस्तकाच्या पारायणातून येत नसतो. डोक्यात द्वेषभावनेचे एकदा का खूळ माजले, की विखार, असूया, मद यांचे विकृत सामाजिक थैमानात रूपांतर होते. भाजपच्या बाबतीत नेमके हेच घडले आणि म्हणूनच त्यांना मतदारांनी झिडकारले आहे. मतदारांनी आपल्याला कौल दिला आहे, पण तो आपल्याला टिकवायचा आहे आणि पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये वाढवायचाही आहे, हे सांगायचे धाडस हा डॉ. सिंग यांच्या दृढनिश्चयी स्वभावाचा एक पैलू होय. सोनिया गांधींनी त्यांच्या या स्वभाववैशिष्टय़ाबरोबरच त्यांच्या परिणामकारक आणि प्रतिष्ठित नेतृत्वाचाही गौरव केला आहे. डॉ. सिंग पंतप्रधानपदाची शपथ उद्या घेतील, पण त्यापूर्वीच त्यांनी आपल्या पुढल्या ‘अजेंडय़ा’चीही लोकसभेवर नव्याने निवडून आलेल्या पक्षसदस्यांना कल्पना दिली. अर्थकारणाचे संपूर्ण पुनरुज्जीवन आपल्याला करायचे असून नवे रोजगार निर्माण करायला आपले प्राधान्य असेल, हे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांपैकी पहिल्या शंभर दिवसांत कुणी काय काम केले, कोण कुठे कमी पडले, याची माहिती आपण स्वत: घेणार आहोत, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा अनेकांना इशारा आहे. ग्रामीण भागाच्या विकासात सर्वाधिक महत्त्व हे पाण्याच्या सुनियोजित व्यवस्थापनाला आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता अन्यत्र कुठेही नावापुरतेही ते शिल्लक राहिलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा कृष्णा खोरे विकासाची आजची अवस्था कृष्णा एकीकडे आणि खोऱ्याने पैसे भलतीकडेच अशी झाली आहे. यापुढे होणारे युद्ध हे पाण्याचे असेल, असे अनेक नामांकित अर्थतज्ज्ञ सांगत असताना त्याकडे हे दुर्लक्ष परवडणारे नाही. ग्रामीण भागाचा विकास हा सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर शहरांची आज जी दयनीय अवस्था बनली आहे, ती अधिक दारुण बनणार आहे. शहरी लोकसंख्येचा स्फोट हा गुन्हेगारी आणि इतर असंख्य गैरमार्गाना उत्तेजन देणारा ठरतो आहे. थोडक्यात विकासाला ‘शहरी’ किंवा ‘ग्रामीण’ असे मापदंड न लावता सार्वत्रिक विकासाकडे झेप घेणारेच धोरण निश्चित करावे लागेल. आपले कंत्राटदार, आपले नातलग, आपलेच दात आणि आपलेच ओठ हे असले ‘कौटुंबिक विकासा’चे धोरण हाणून पाडले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारा निर्धार डॉ. सिंग यांच्याकडे आहे. म्हणून तर त्यांनी काही गोष्टी अर्थतज्ज्ञ या नात्याने यापूर्वी स्पष्ट केल्या होत्या. मागल्या खेपेला त्यांनी प्रत्येक मंत्रालयाचे प्रगतिपुस्तक तयार केले होते. त्यात कृषी खात्याचे काम सर्वाधिक कनिष्ठ दर्जाचे होते, हे त्यांनी दाखवून दिले. ग्रामीण भागातल्या शेतीची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णत: कोलमडून पडली आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणून त्यांच्यासाठी आर्थिक मदतीचे ‘पॅकेज’ जाहीर केले गेले, त्यांच्या कुटुंबीयांना मदतही दिली गेली, पण ही अनवस्था का ओढवली, त्याचा विचार आपल्याला शेतीतले जास्त कळते, असा दावा करणाऱ्यांनी कधीच केला नाही. गव्हाला रास्त भाव देण्याऐवजी गव्हाचे भरपूर उत्पादन झालेले असूनही गव्हाची वारेमाप आयात केली गेली, तो जादा दराने आणला. हा गहू तरी चांगला असावा तर तसेही नाही. तो फेकून द्यायची आणि जाळून टाकायची वेळ आली. डॉ. सिंग यांनी आर्थिक सुधारणांच्या मार्गात धोंड ठरणाऱ्या अशा सर्वानाच समजेल, अशा भाषेत इशारा देऊन यापुढे लांडय़ालबाडय़ा चालणार नाहीत, हे अधोरेखित केले आहे. जनतेने प्रामाणिक, कार्यक्षम अशा सरकारला पुन्हा निवडून देऊन चैतन्य निर्माण केले आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. शेवटी जनतेला काय हवे असते, तर शांतता, समृद्धी, आपला आणि देशाचा विकास. दंगेधोपे करून, दुसऱ्यांची घरेदारे जाळून, रस्तोरस्ती खून पाडून कुणाचा विकास होत नसतो. त्यात होते ती हानी सर्वाचीच असते. आपल्या विरोधात असणाऱ्या आणि बरोबर राहिलेल्या राजकारण्यांकडून त्यांना यासंबंधीच्या आश्वासक कृतिशीलतेची आवश्यकता वाटते आहे. या खेपेच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणांना प्रत्येक टप्प्यात विरोध करणारे डावे सरकारबरोबर राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून या संदर्भात नेमकी कोणती पावले उचलली जातात, ते अजून स्पष्ट व्हायचे आहे. आपल्यापुरती तिसरी आघाडी ही वैचारिक दिवाळखोरी ठरली, हे डाव्यांनी मान्य केले, हे काय कमी आहे? डाव्यांनाही कधीकधी चांगले विचार सुचतात, पण त्याचा अंमल फार काळ टिकत नाही, ही त्यांच्यापुरती वैचारिक गोची आहे. डॉ. सिंग यांनी त्यांनाही विधायकतेचा सल्ला दिला आहे. यापुढले अर्धे दशक हे निर्णायक स्वरूपाचे असेल, असे स्पष्ट करून त्यांनी राज्यकर्त्यांचा आत्मविश्वास किती भक्कम स्वरूपाचा असू शकतो, याची झलक दाखवून दिली आहे. केंद्रात अनेक राजकीय पक्षांचे संयुक्त सरकार स्थापन करणे, ही गोष्ट नाईलाजास्तव आहे, असे १९९८ च्या पंचमढी शिबिरात काँग्रेसने स्पष्ट केले होते. पुढल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रात फक्त काँग्रेसचेच सरकार येऊ शकेल, असे प्रणव मुखर्जी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पक्षाची स्थिती सुधारायला हवी, असे त्यांना वाटते. हा आशावाद अर्थातच चांगला आहे. डॉ. सिंग हेही नेमकी तीच उमेद बाळगून आहेत. भारत ही दक्षिण आशियातलीच नव्हे, तर संपूर्ण आशियातली महासत्ता आहे आणि त्याच्याकडे विकासाचा जोश आहे, असे डॉ. सिंग यांनी अलीकडेच एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही भारताबद्दल बोलताना नेमक्या याच विचारांची मांडणी केली आहे. डॉ. सिंग यांनी तरुणांकडून मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात एका रुपयातले दहा पैसेच प्रत्यक्षात कामावर खर्च होतात, उरलेले दलाल खातात, असे म्हटले होते. राहुल गांधींनी गंगटोकच्या प्रचार सभेत त्याचा उल्लेख करून सरकारी योजनांवर खर्च करायच्या शंभर रुपयांतले दहा पैसेच आता शेवटपर्यंत पोहोचतात असे म्हटले. ही स्थिती बदलावी लागेल. काँग्रेस पक्षाच्या हातात पुन्हा एकदा सत्ता सोपवताना तरुण पिढीच्या अपेक्षाही मोठय़ा आहेत. त्यांना पुरून उरण्याची ऊर्जा या सरकारमध्ये निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. सिंग आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदी पुन्हा नव्याने निवडल्या गेलेल्या सोनिया गांधी यांनाच करायचे आहे. या दोघांच्याही भाषणातून हा दिलासा मिळाला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा चेहरा कदाचित अस्सल राजकारण्याचा नसेलही, पण त्यांनी निर्माण केलेली जिद्द ही सध्याच्या काहीशा मंदावलेल्या प्रगतीला उजाळा द्यायला कारणीभूत ठरणार आहे.