Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

चिंचोली बंदर डंपिंग ग्राऊंड म्हणजे मालाड- गोरेगाव पश्चिमेचा परिसर असा परिचय पूर्वी होता. आणि हे सांगतानाही लोक नाक मुरडायचे किंवा नाकाला रूमाल लावायचे. या परिसरात असलेल्या डंपिंग ग्राऊंडमुळे नागरिकही हैराण झाले होते. अगदी न्यायालयापर्यंत तो वाद गेला होता. अखेरीस ते डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर काही काळ असाच गेला आणि नंतर मात्र या परिसरामध्ये विकासकामाने वेग घेतला. आणि गेल्या काही वर्षांंत गोरेगाव- मालाड पश्चिमेचा चेहरामोहराच बदलून गेला. आता लिंक रोड या परिसरातून जातो. लिंक रोडवर राहतो, हे सांगणे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. हाय- फाय मॉल्स उभे राहिले आहेत. इनॉर्बिट, हायपरसिटी आदी मॉल्स आणि आजूबाजूला उभे राहिलेले माईंडस्पेस हे आयटीविश्व यामुळे संपूर्ण परिसरच हाय-फाय झाला आहे. आपण एकदम वेगळ्याच विश्वात असल्याचा भास त्यामुळे होतो. याच इनॉर्बिट मॉलच्या आजूबाजूचा परिसर हाच पूर्वीचा डंपिंग ग्राऊंडचा परिसर आहे. गेल्या काही वर्षांंत अधूनमधून माईंडस्पेस आणि परिसरात उभ्या राहिलेल्या कंपन्यांमधून पूर्वीच्या डंपिंग ग्राऊंडचा आणि तेथे साठून राहिलेल्या विषारी वायूंचा त्रास होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. याच माईंडस्पेसच्या पुढे अगदी समुद्र किनाऱ्यावर गेल्या दोन वर्षांंत एक छान उद्यान उभे राहिले आहे. या उद्यानालाही ‘माईंडस्पेस गार्डन’ असेच नाव देण्यात आले आहे.

इंटरॅक्टिव्ह खेळ आणि लग्नसंस्थेवर चर्चा
इंटरॅक्टिव्ह खेळांच्या धमाल फेऱ्या आणि त्याद्वारे जोडीदार स्पर्धकांची ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’ हे स्टार प्रवाहच्या ‘जोडी जमली रे’ या रिअ‍ॅलिटी शोचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. त्यामुळे या आठवडय़ात गुरुवारच्या भागात अनेक इंटरॅक्टिव्ह खेळ स्पर्धक खेळतील. नव्या पर्वातील हा दुसरा आठवडा असून स्पर्धकांची आता एकमेकांशी आणि आपल्या जोडीदार स्पर्धकाशी चांगली ओळख झाली आहे. गुरुवारी रात्री १० वाजता दाखविला जाणार भाग ‘गिफ्ट अ‍ॅक्टिव्हिटी स्पेशल’ एपिसोड आहे.
विविध इंटरॅक्टिव्ह खेळ खेळताना स्पर्धक जोडय़ांमध्ये कशा प्रकारे नाते निर्माण झाले आहे ते प्रेक्षकांना समजू शकेल. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यात येतील. लग्न करण्यास इच्छुक तरूण-तरूणींना आपापल्या जोडीदाराला समजून घेता यावे म्हणूनच इंटरॅक्टिव्ह खेळाचे आयोजन ‘जोडी जमली रे’ मध्ये केले जाते. लग्नाच्या जोडप्यांमध्ये एकमेकांना वेळोवेळी सांभाळून घेणे, समजून घेणे तसेच ‘पझेसिव्हनेस’ किती असावा, त्याचा अभाव किंवा अतिरेक असावा का, या सगळ्याचा लग्नसंबंधांवर काय काय आणि कोणते परिणाम होऊ शकतात यासारख्या लग्नसंस्थेतील सर्वाधिक महत्त्वाच्या पैलुंवर स्पर्धक, त्यांचे पालक आणि अर्थातच सूत्रसंचालक अभिनेता अतुल परचुरे आणि अभिनेत्री कविता मेढेकर सविस्तर चर्चा करतील. ‘कौशल्य सारे रचनेत आहे’ या उक्तीनुसार आपल्या जोडीदार कशा प्रकारे वागतो, शिष्टाचाराला धरून वागतो किंवा नाही, एकमेकांच्या अपेक्षा काय-काय असतात या विषयांवरही स्पर्धक आपली मते मांडणार आहेत. मुळातच लग्नसंस्थेवर स्पर्धकांचा कितपत विश्वास आहे याविषयाची मतहीे विचारात घेतली जातील.
प्रतिनिधी