Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रपतींकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण , लोकसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आग्रह नाही
मनमोहन सिंग आणि सहकाऱ्यांचा उद्या शपथविधी
नवी दिल्ली, २० मे/खास प्रतिनिधी

 

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज मनमोहन सिंग यांची देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी २२ मे रोजी पद व गोपनीयतेची शपथ घेतील. आज सकाळी १०, जनपथ येथे झालेल्या युपीएच्या बैठकीनंतर मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी सायंकाळी राष्ट्रपती पाटील यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस-युपीएला सरकारला ३२२ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असून तशी पत्रे राष्ट्रपतींना सादर केली. काँग्रेस-युपीएपाशी पुरेसे संख्याबळ असल्यामुळे लोकसभेत बहुमत सिद्ध करण्याचा राष्ट्रपतींनी आग्रह केलेला नाही.
काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी निवड केल्याबद्दल मनमोहन सिंग यांचे अभिनंदन करून सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठय़ा निवडणूकपूर्व आघाडीचे नेते म्हणून पंतप्रधानपदी नियुक्त करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे राष्ट्रपती पाटील यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. शुक्रवारी २२ मे रोजी परस्परांना सोयीच्या वेळी शपथविधी समारंभासाठी राष्ट्रपतींनी मनमोहन सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपतींनी दिलेले नियुक्ती पत्र वाचून दाखविले. काँग्रेस-युपीएच्या सदस्यांची संख्या चार अपक्ष खासदारांसह २७४ झाली असून सपा, बसप आणि राजदच्या समर्थनामुळे सरकारला ३२२ खासदारांचा पाठिंबा असल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले.
तत्पूर्वी, आज सकाळी १०, जनपथ येथे सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसशी निवडणूकपूर्व युती करणाऱ्या मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे सर्वेसर्वा,
तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी व दयानिधी मारन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन, मुस्लीम लीगचे ई. अहमद, एमआयएमचे असादुद्दीन ओवैसी, के. एम. मणी, बिश्नमुथिहारी तसेच काँग्रेसकडून प्रणव मुखर्जी, अहमद पटेल, राहुल गांधी, ए. के. अँटनी, पी. चिदंबरम उपस्थित होते. मात्र, या बैठकीला लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान या युपीएच्या जुन्या मित्रपक्षांना पाचारण करण्यात आले नव्हते.
या बैठकीत युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. युपीएच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आली. सोनियांच्या नावाचा प्रस्ताव करुणानिधी यांनी मांडला, तर ममता बॅनर्जी यांनी या प्रस्तावाचे अनुमोदन केले.
तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी युपीएचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यावर भर दिला. पण त्यावर काँग्रेसने विशेष अनुकूल प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. किमान समान कार्यक्रमाविषयी बैठकीत चर्चा झाली नसल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. युपीएतील घटक पक्षांच्या जाहीरनाम्यातील समान मुद्यांचा किमान समान कार्यक्रमात समावेश करण्यासाठी एक छोटा समूह स्थापन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, पूर्वीच्या युपीएचा किमान समान कार्यक्रम पुढे राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत कोणत्याही मुद्यावर असहमती नव्हती आणि कोणीही कोणतीही अट घातली नाही, असेही द्विवेदी यांनी सांगितले.