Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राष्ट्रपतींकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण , लोकसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आग्रह नाही
मनमोहन सिंग आणि सहकाऱ्यांचा उद्या शपथविधी
नवी दिल्ली, २० मे/खास प्रतिनिधी
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज मनमोहन सिंग यांची देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी २२ मे रोजी पद व गोपनीयतेची शपथ घेतील. आज सकाळी १०, जनपथ येथे झालेल्या युपीएच्या बैठकीनंतर मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी सायंकाळी राष्ट्रपती पाटील यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला.

शेतकरी संघटनेसोबत पुन्हा
युतीचे भाजपचे संकेत
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, २० मे

लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणाऱ्या शेतकरी संघटनेसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत युती करण्याचे संकेत भाजपच्या वर्तुळातून मिळू लागल्याने जागा वाटपाच्या वेळी या मुद्यावरून युतीत मोठे रणकंदन होण्याची शक्यता आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीमध्ये प्रथमच शेतकरी संघटनेचा शिरकाव झाला होता. संघटना लोकसभेची कोणतीही जागा लढणार नाही आणि संघटनेचे सर्वेसर्वा शरद जोशी यांना राज्यसभेत स्थान दिले जाईल, या मुद्यावर युतीत हा तिसरा पक्ष सामील झाला होता.

काँग्रेसची मतांची टक्केवारी घटली
तर राष्ट्रवादीची किरकोळ वाढली !
मुंबई, २० मे / खास प्रतिनिधी
राज्यात सर्वाधिक १७ जागा मिळालेल्या काँग्रेस पक्षाची मतांची टक्केवारी गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांची तुलना करता घटली आहे. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मात्र किरकोळ वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात १९.६१ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या तुलतेन नऊ जागा कमी मिळालेल्या राष्ट्रवादीला मात्र १९.२८ म्हणजेच काँग्रेसच्या जवळपासच मते मिळाली आहेत. भाजपला (१८.१७ टक्के)तर शिवसेनेला १७ टक्के मते मिळाली आहेत.

मनसेचा राष्ट्रवादीलाही मुंबईत फटका; युतीमधील कुरबुरीमुळेही बुरुज ढासळले!
मुंबई, २० मे/प्रतिनिधी
मुंबईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दक्षिण मुंबई व ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही दणका दिलेला आहे. याच दोन्ही मतदारसंघांत युतीमधील कुरबुरीचा फटका त्यांच्या उमेदवारांना बसला. प्रिया दत्त यांच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेल्या विजयात मनसेचा वाटा नाही तर दत्त करिष्म्याचा तो प्रताप आहे. दक्षिण मध्य मुंबई व उत्तर मुंबईत मनसेने शिवसेनेची मते खाल्ली तर वायव्य मुंबईत शिवसेनेला मनसेच्या शालिनी यांनी ‘ठाकरी’ हिसका दाखवला.

‘जाती’साठी खाऊ नका ‘माती’..
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील निकालांचे प्रथेप्रमाणे विश्लेषण चालू झाले आहे. कुणी कोणाची मते खाल्ली. कोण चालला नाही यावर राजकीय तज्ज्ञ मंडळीमध्ये काथ्याकूट चालू आहे. या वेळच्या निवडणुकीत जातीच्या मुद्याचा प्रछन्न वापर झाला. याकडे मात्र राजकीय अभ्यासकांचे अजून लक्ष गेलेले दिसत नाही. जातीचा आधार घेऊन मतांचा जोगवा मागण्याएवढा निलाजरेपणा महाराष्ट्रात यापूर्वी कधी दिसला नव्हता. महाराष्ट्रात जातीच्या मुद्याचा वापर लपून छपून व्हायचा.

मंत्रीपदासाठी आता चलो दिल्ली
नवी दिल्ली, २० मे/खास प्रतिनिधी

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रण दिल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश होणार याविषयी दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गृह, अर्थ, परराष्ट्र यासारखी महत्त्वाची खाती तसेच लोकसभेचे अध्यक्षपद काँग्रेस स्वतकडेच राखणार असून ममता बॅनर्जी यांना रेल्वे मंत्रालय जाणार हेही जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

‘स्टार माझा’ नंबर वन
मतमोजणीच्या सर्व वाहिन्यांना मागे टाकले
मुंबई, २० मे / प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाच्या वृत्तांकनामध्ये आज-तक, एनडीटीव्ही, अशा न्यूज चॅनेल्सना मागे टाकून मराठमोठय़ा ‘स्टार माझा’ने राज्यात पुन्हा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातल्या सर्व न्यूज चॅनेल्सच्या कामगिरीचा आढावा घेणारे गेल्या आठवडय़ाचे टीआरपी रेटिंग आज प्रसिद्ध झाले. त्यामध्ये निवडणूक निकालाच्या दिवशी ‘स्टार माझा’ने बाकी सर्व न्यूज चॅनेल्सवर मोठी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.

मंत्रीपद मिळाले नाही तरी वाईट वाटणार नाही - लालूप्रसाद यादव
नवी दिल्ली, २० मे/पी.टी.आय.

राजद पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना पुन्हा केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रीपद देण्यास काँग्रेस पक्ष नाराज असतानाच लालू यांनी आपल्या नशीबावर हवाला ठेवत केंद्रात जरी मंत्रीपद मिळाले नाही तरी आपल्याला वाईट वाटणार नाही, असे सीएन-आयबीएन या खाजगी टीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दिल्लीमध्ये जे पत्र सत्ता आणतात त्यांच्यावरच कृपा होते. आपण यावेळी तेवढय़ा जागा निवडून आणलेल्या नाहीत. त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही तरी आपणास त्याचे काहीही दु:ख नाही, असेही लालू यांनी सांगितले. बिहारमध्ये लालूंच्या पक्षाला फक्त चार जागा मिळाल्या आहेत. राजद, समाजवादी पार्टी आणि लोकजनशक्ती पार्टी यांचा समावेश असलेल्या चौथ्या आघाडीचे भवितव्य काय असे विचारता लालूप्रसाद म्हणाले की, तशी कोणतीही चौथी आघाडी अस्तित्वातच नाही. आमचा काही पक्षांबरोबर फक्त समझौता झाला होता. लालूप्रसाद यादव यांनी आता यूपीए आघाडीला आपला विनाअट पाठिंबा देऊ केला आहे. सोनिया गांधी यांच्या कुटुंबासमवेत आपले वैयक्तिक संबंध अत्यंत सौहार्दाचे आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आपण एकही शब्द बोलणार नाही असेही यादव यांनी सांगितले.

आंध्रच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा राजशेखर रेड्डी
हेदराबाद, २० मे/वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची आज वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी शपथ घेतली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाल्यानंतर ५४ वर्षांचे रेड्डी यांची या पदावर फेरनिवड झाली. राज्यपाल नारायणदत्त तिवारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज केवळ रेड्डी यांचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळाची घोषणा अद्याप झाली नसून नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी २२ मे रोजी होण्याची शक्यता आहे.
नवीन पटनाईक यांचा उद्या शपथविधी
ओरिसात बिजू जनता दलाचे सरकार उद्या सत्तेवर येत असून नवीन पटनाईक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या १४७ पैकी १०३ जागा जिंकून ‘बीजेडी’ हा स्पष्ट बहुमत मिळविणारा राज्यातील पहिला प्रादेशिक पक्ष ठरला आहे. या पक्षाने लोकसभेच्या राज्यातील २१ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे ओरिसातील ७२ आमदारही प्रथमच विधानसभेत प्रवेश करीत असल्याने सभागृहाचा चेहरा नवा राहणार आहे. नव्या आमदारांत ४९ बीजेडीचे असल्याने मंत्रिमंडळातही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे.