Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

क्रांतीसेनेच्या राष्ट्रवादीतील विलीनीकरणावर उद्या निर्णय
शालिनीताई पाटील पुन्हा राष्ट्रवादीच्या मार्गावर
सातारा, २० मे/प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रांतिसेना पक्षाच्या संस्थापिका आमदार डॉ. शालिनीताई पाटील आपला नवीन राजकीय पक्ष विसर्जित करून स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत येण्याच्या मार्गावर आहेत.
मंगळवारी मुंबईत या संदर्भात त्यांची अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून दादांनी याबाबत हिरवा कंदिल दाखवला आहे. येत्या शुक्रवारी सातारा रोड येथे माहेरच्या घरी कार्यकर्त्यांशी चर्चा करून विलिनीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र क्रांतिसेनेचे अध्यक्ष शालिनीताईंचे भाचे जरंडेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र बाबा फाळके यांनी सांगितले.

फुटीर नगरसेवकांचे पद कायम राहणार
दयानंद लिपारे
इचलकरंजी, २० मे

राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेच्या पाश्र्वभूमीवर नगरसेवकांच्या घोडेबाजाराची चर्चा सुरू असताना फुटलेल्या नगरसेवकांचे नगरसेवकपद कायम राहणार असल्याची तरतूद झाल्याने घोडेबाजार आणखी गतिमान होण्याची चिन्हे आहेत. फुटीर नगरसेवकास स्वीकृत नगरसेवकाचा दर्जा राहणार असल्याने आर्थिक आमिषास किती नगरसेवक बळी पडणार, हा राजकीय पटलावर लक्षवेधी मुद्दा बनला आहे.

आचारसंहिता समाप्तीच्या पत्राअभावी महापालिका सभेत विषय अधांतरीच
कोल्हापूर, २० मे / विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याविषयी राज्यशासन वा निवडणूक आयोगाकडून कोणतेच पत्र प्राप्त झाले नसल्याचे कारण दाखवून बुधवारी महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्य नियुक्तीचा विषय सर्वसाधारण सभेत दाखल करून घेण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आली. यामुळे या विषयावर दि. ३१ मे पूर्वी महापालिकेला पुन्हा सर्वसाधारण सभा घ्यावी लागेल. अन्यथा उच्च न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

आयातकर खात्याच्या गलथान कारभाराबद्दल अधिकाऱ्यांवर टीका
सोलापूर, २० मे/प्रतिनिधी

महापालिका आयातकराच्या करंट खात्यावर साडेसहा कोटींची थकबाकी असून पांढरपेशातील तीन अधिकाऱ्यामार्फत मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याच्या सखोल चौकशीची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर सपाटे यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली. बुधवारी महापौर अरुणा वाकसे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सर्व साधारण सभा झाली. या वेळी सपाटे यांच्यासह भाजपचे बंडखोर नगरसेवक जगदीश पाटील, काँग्रेसचे प्रा. पुरणचंद्र पुंजाल यांनी पालिकेच्या आर्थिक प्रश्नावर अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले.

धनंजय महाडिक यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचाली
सांगली, २० मे / शीतल पाटील

लोकसभा निवडणुकीनंतर सांगली व कोल्हापूर जिल्हय़ांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुन्ना महाडिक यांचे चुलते सांगली जिल्हा काँग्रेसचे खजिनदार नानासाहेब महाडिक व जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
महाबळेश्वर, २० मे/वार्ताहर

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वरमध्ये अर्धा तासच पण मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची, तसेच फिरावयास आलेल्या पर्यटकांची एकच धावपळ झाली. पर्यटकांनी मात्र या पावसाचा आनंदही लुटला. दरम्यान, महाबळेश्वर येथे सध्या उन्हाळी हंगाम सुरू आहे. पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून आठवडय़ाची सलग सुट्टी आल्यास त्यास आणखीनच उधाण येते. गेले दोन दिवस या गिरी शिखरावर सायंकाळी धुके व थंड हवा यामुळे येथे कुटुंबीयांसमवेत मौज मजा करण्यासाठी आलेला पर्यटक या वातावरणावर अत्यंत खुश आहे. राज्यात अन्यत्र घामाच्या धारा वाहत असताना येथे मात्र रात्री विश्रांतीच्या वेळी गरम शाली, चादरींचा वापर करावा लागत आहे. या येथील वातावरणामुळे येथे आलेल्या पर्यटकांना मात्र या नंदनवनात आनंद उपभोगावयास मिळतो आहे. यामुळे येथे आलेली ही मंडळी खुश आहेत.दरम्यान गेले दोन दिवस थोडी ढगाळ हवा होती. आज सकाळीही थंड हवा व ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच वाजता मात्र पाऊस सुरू झाला. तो अर्धातास विजांच्या कडकडाटासह कोसळला.

संशयास्पद ७३ लाख न्यायालयाच्या आदेशाने परत
कराड, २० मे/वार्ताहर

तासवडे टोलनाक्याजवळ पोलिसांनी तीन तरुणांकडून ताब्यात घेतलेली ७३ लाख रुपयांची संशयास्पद रक्कम काही अटींवर परत करण्याचे आदेश आज येथील न्यायालयाने दिले. दरम्यान, गुजरात राज्यात झालेल्या सुमारे ८५ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील ही ७३ लाखांची रक्कम असल्याच्या संशयातून गुजरात पोलिसांचे एक पथक कराडात डेरेदाखल आहे. ९ मे रोजी दुपारी एक मारुती स्विफ्ट कारमधून ७३ लाख रुपयांची बेनामी, बेहिशेबी रक्कम जाणार असल्याची माहिती कराड विभागीय पोलीस अधिकारी विजय दळवी व शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजीराव पाटील यांना मिळाली होती. यावर पोलिसांनी सापळा रचून मुंबईकडे जाणाऱ्या एमएच-१२-ईएक्स-७०८० ही मारुती स्विफ्ट तासवडे टोलनाक्यावर ताब्यात घेऊन ७३ लाखांची रक्कम ताब्यात घेऊन नंतर महेंद्र प्रजापत घनश्याम जडेजा आणि मनोज ठाकूर यांना अटक केली होती. ही रक्कम जागा खरेदीतील असल्याची कागदपत्रे न्यायालयात आज सादर करण्यात आली. शहर पोलिसांनी ही रक्कम संबंधितांच्या स्वाधीन केली आहे.

ट्रॅक्टर व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत सापडला
फलटण, २० मे/वार्ताहर
ट्रॅक्टरच्या कामानिमित्त औरंगाबाद जिल्ह्य़ात गेलेल्या नाईकबोंबवाडी (ता. फलटण) येथील धनंजय शंकर ढमाळ (वय ५०) यांचा मृतदेह विहिरीत सापडला.
याबाबतची अधिक माहिती अशी, की तालुक्यातील जावली, मिरढे, नाईकबोंबवाडी येथील ट्रॅक्टर व्यावसायिक चालकासह दरवर्षी मराठवाडा, विदर्भात रोजगारासाठी जात असता. धनंजय ढमाळ हे सचिन बोडरे व सागर चव्हाण यांना सोबत घेऊन औरंगाबादला काम मिळविण्यासाठी गेले होते. दि. १६ रोजी त्यांचा मृतदेह टोकी (ता. गंगापूर) येथे ट्रॅक्टरपासून चार कि.मी. अंतरावरील विहिरीत आढळून आल्याची माहिती तेथील पोलीस पाटलांनी दिली होती. नंतर तपासाअंती हा मृतदेह ढमाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या नातलगांना कळविण्यात आले. त्यांचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंढरपूरमध्ये वळिवाचा जोरदार पाऊस
पंढरपूर, २० / वार्ताहर
पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील नागरिक चार ते पाच दिवस उकाडय़ाने कमालीचे हैराण झाले असतानाच मंगळवारी रात्री १२ ते बुधवारच्या पहाटे ४ पर्यंत अवकाळी पावसाने या परिसरात हजेरी लावली. पावसाची एकूण ४१ मि. मी. नोंद झाली, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. गेले चार पाच दिवस नागरिक उकाडय़ाने हैराण झाले होते. दोन दिवस नुसते झिरझिर पाऊस, जोरदार वारे अन् वादळ अशाने उकाडा असह्य़ झाला होता. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास अधून मधून थोडा पाऊस थोडा वारा असे चालू होते. रात्री १० च्या सुमारास वारे थोडे कमी होताच पावसाला सुरुवात झाली. तर रात्री १२ वाजता पावसाचा जोर वाढला. या पावसामुळे उकाडा थोडा कमी झाला असला तरी वातावरण अजूनही ढगाळ आहे.

आय.आय.डी.एम.के. अ‍ॅवॉर्ड सुनील पाटील यांना
कोल्हापूर, २० मे / विशेष प्रतिनिधी
इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया इंटेरियर डिझाईनर्स (आय.आय.आय.डी)या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून दरवर्षी बांधकाम अंतर्गत सजावटीसाठी आय.आय.डी.एम.के. अ‍ॅवॉर्डस देण्यात येतात. सन २००८ साठीचा हा पुरस्कार कोल्हापुरातील इंटेरियर डिझाईनर आर्किटेक्ट सुनील पाटील यांना देण्यात आला. इंटेरियर अँड आर्किटेक्चरल इंटेरिअर्स या विभागात सुनील पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावून आय.आय.आय.डी.एम.के.झोनल अ‍ॅवॉर्ड २००८ प्राप्त केले आहे. गौरवचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार नुकताच पुणे येथे समारंभात संपन्न झाला.

आटपाडीमध्ये वळिवाची दमदार हजेरी
आटपाडी, २० / वार्ताहर
काल रात्री आटपाडी तालुक्यात दमदार वळवाच्या पावसाने हजेरी लावली. काल सायंकाळी पावसाने हुलकावणी दिली. परंतु पहाटे १.३० पासून ५.३० पर्यंत पावसाची संततधार सुरू होती. आटपाडी येथे ५ मि.मी. तर दिघंची व खरसुंडी येथे अनुक्रमे ५१ व २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उन्हाच्या झळा तीव्र होत चालल्या असताना वळिवाने दमदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे आटपाडी शहर व परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या आटपाडी तलावातील पाणी साठय़ात काहिशी वाढ झाली आहे. पावसामुळे शहरातील शुक्र ओढय़ातून पाणी वाहत आहे. या पावसामुळे पाणी टंचाई कमी प्रमाणात होणार असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

वृद्धाचा खून केल्याप्रकरणी पाच जणांना अटक
फलटण, २० मे/ वार्ताहर

सुरवडी (ता. फलटण) येथे भांडणे सोडविण्यास गेलेल्या ७५ वर्षीय वृद्धाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली. दि. १८ रोजी सुरवडी येथे सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सुखदेव रामचंद्र जाधव (वय २६) हे आपल्या घरासमोरील नळावर अंघोळ करीत होते. त्या वेळी आदल्या दिवशी सोमेश्वर येथे लग्नाच्या वऱ्हाडावेळी झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून किसन भिसे, गुंणू भिसे, विकास भिसे, नंदू भिसे, पप्पू भिसे (सर्व रा. सुरवडी, ता. फलटण) यांनी लाकडी दांडय़ाने जाधव यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्या वेळी सुखदेव यांच्या शेजारील मारुती करडे (वय ७५) भांडणे सोडविण्यास गेले असता त्यांनाही मार बसला.

टँकरची धडक बसून दुचाकीस्वार ठार
आटपाडी, २० मे/ वार्ताहर

पिंपरी खुर्दहून आटपाडीकडे येणारा रॉकेलचा (एम डब्ल्यू के ५९४) टँकर आडवा आल्याने दुचाकीवरून घरी निघालेले शिवाजी पाटील, माजी जि.प. सदस्य तानाजी पाटील यांचे ज्येष्ठ बंधू, काटय़ात पडून जखमी झाल्याने संतप्त झालेल्या त्या परिसरातील नागरिकांनी टँकरचे टायर व काचा फोडल्या. सदरची घटना १७ मे रोजी बाळटेवस्तीजवळ घडली. सांगली येथील रॉकेल व्यावसायिक कोळेकर यांचा टँकर रॉकेल पुरवठा करून सायंकाळी आटपाडीकडे परतत होता. या वेळी माणगंगा कारखाना रस्त्यावर पुजारवाडीच्या जवळ टँकर आडवा आला. त्यामुळे घरी परतणारे शिवाजी पाटील जखमी झाले. त्यानंतर त्या भागातील उपस्थित नागरिकांनी टँकरचे टायर व काचा फोडल्या. टायर व काचा फोडल्याने टँकरचालक पळाला. या घटनेनंतर दोन दिवस टँकर त्या ठिकाणीच राहिल्याने टँकरमधील हजारो लीटर रॉकेल चोरीला गेले. तसेच मोठय़ा प्रमाणात रॉकेल रस्त्यावर पडून वाया गेले. या घटनेनंतर रॉकेलच्या टँकर मालकाने पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात याबाबत तक्रार नोंदविलेली नाही. यामुळे या रॉकेल चोरीबाबत संशय निर्माण झाला आहे.