Leading International Marathi News Daily
गुरुवार, २१ मे २००९

नवी दिल्ली, २० मे/खास प्रतिनिधी
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज मनमोहन सिंग यांची देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी २२ मे रोजी पद व गोपनीयतेची शपथ घेतील. आज सकाळी १०, जनपथ येथे झालेल्या युपीएच्या बैठकीनंतर मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी सायंकाळी राष्ट्रपती पाटील यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस-युपीएला सरकारला ३२२ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असून तशी पत्रे राष्ट्रपतींना सादर केली. काँग्रेस-युपीएपाशी पुरेसे संख्याबळ असल्यामुळे लोकसभेत बहुमत सिद्ध करण्याचा राष्ट्रपतींनी आग्रह केलेला नाही. काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी निवड केल्याबद्दल मनमोहन सिंग यांचे अभिनंदन करून सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठी निवडणूकपूर्व आघाडीचे नेते म्हणून पंतप्रधानपदी नियुक्त करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे राष्ट्रपती पाटील यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. शुक्रवारी २२ मे रोजी परस्परांना सोयीच्या वेळी शपथविधी समारंभासाठी राष्ट्रपतींनी मनमोहन सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपतींनी दिलेले नियुक्ती पत्र वाचून दाखविले.(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्य शत्रू काँग्रेसच!
शिवसेनेला ठोसे मारणारा अजून जन्माला आला नाही - उद्धव
मुंबई, २० मे/प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा शत्रू क्रमांक एक काँग्रेसच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. मात्र मनसेबरोबर कोणताही राजकीय समझोता अशक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला ठोसे मारणारा जन्माला आला नाही आणि येणार नाही हा मला आत्मविश्वास आहे, असा टोलाही उद्धव यांनी राज ठाकरे यांना लगावला. शिवसेनेच्या नवनिर्वाचित ११ खासदारांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली व त्यानंतर ते बोलत होते.

राजस्थान बाहेर, चेन्नई उपान्त्य फेरीत
दरबान, २१ मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगचा गतवर्षीचा उपविजेता चेन्नई सुपर किंग्जने दुसऱ्या वर्षीही उपान्त्य फेरीत धडक मारली असून गतविजेता राजस्थान रॉयल्सचा संघ मात्र उपान्त्य फेरीत प्रवेश करण्यापूर्वीच स्पर्धेबाहेर फेकला गेला. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आता दिल्लीपाठोपाठ चेन्नईने उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. चेन्नईने आज उपान्त्य फेरीसाठी संघर्ष करीत असलेल्या पंजाबला ८ बाद ९२ धावांवर रोखून २४ धावांनी विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना धोनीच्या चेन्नई संघाने केलेल्या ११६ धावांचा पाठलाग करताना युवराजचा पंजाबचा संघ अगदीच ढेपाळला. त्याआधीच्या सामन्यात गतविजेत्या राजस्थान रॉयल्सची वाईट गत झाली. प्रथम फलंदाजी करताना १०१ धावा करणाऱ्या राजस्थानला कोलकाताने चार विकेट्सनी नमविले. कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले होते, पण त्यांनी या स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद करताना राजस्थानला स्पर्धेबाहेर फेकले. चेन्नईच्या खात्यात आता १७ गुण असून पंजाबचे १४ गुण आहेत. आता डेक्कन, पंजाब व बंगलोर हे १४ गुणांवर आहेत. उद्या डेक्कनने बंगलोरला हरविल्यास बंगलोर व पंजाब यांच्यात उपान्त्य फेरीत कोण प्रवेश करणार हे त्यांच्या धावगतीवरून निश्चित होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कळंबोलीत हत्या
पनवेल, २० मे / प्रतिनिधी
कळंबोलीच्या सेक्टर तीनमधील वरुण रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बारबाहेर बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांची हत्या झाली. जयराज नाथा उलवेकर (वय २७) असे या वृत कार्यकर्त्यांचे नाव असून, तो कळंबोलीजवळच्या खिडुकपाडा येथील रहिवासी होता. कळंबोली पोलीस ठाण्यात लुटमार करणे, धमकी देणे आदी विविध गुन्ह्यांची नोंद नावावर असणाऱ्या उलवेकरला पोलिसांनी निवडणुकीच्या काळात तडिपार केले होते. बुधवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी आलेला उलवेकर चार-पाच मित्रांसह वरुण बारमध्ये मद्यप्रासन करीत बसला होता. दुपारी अडीचच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी त्याला बाहेर बोलाविले आणि तो बाहेर येताच त्याच्यावर बंदुकीच्या दोन फैरी झाडल्या. हॉटेलमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला उलवेकर या हल्ल्यात जागीच कोसळला आणि ठार झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात सीमेंटचे ब्लॉक घातले आणि ते पसार झाले. बांधकाम व्यावसायिक असणारा उलवेकर आणि हल्लेखोरांमध्ये पूर्ववैमनस्य असल्याचा तर्क पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुलाने केली बापाची हत्या
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून मुलाने बापाची हत्या केल्याची घटना अंधेरी येथे घडली. सिताराम इंगळे (४१) असे मुलाचे नाव असून त्याने कुशाल आबाजी इंगळे (७१) यांची हत्या केली. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीच्या प्रभूछाया नगरपाडा येथील राजलक्ष्मी इमारतीत राहणाऱ्या कुशाल आणि सिताराम यांच्यात शुल्लक कारणावरून भांडण झाले. भांडण एवढे विकोपाला गेले की सितारामने जवळ पडलेल्या झाडाच्या फांदीने कुशाल यांच्या डोक्यात दोनवेळा घाव केला. त्यानंतर शेजाऱ्यांनी कुशालला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच कुशालचा मृत्यू झाला. याप्रकरणी सितारामला अटक करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याअभावी विदर्भात युतीला कमी जागा- रवि देवांग
धुळे, २० मे / वार्ताहर

शेतकरी संघटनेचा पाठिंबा नाकारल्यानेच भाजप-शिवसेना युतीने विदर्भाच्या कापूस उत्पादक पट्टय़ात किमान सहा जागा गमावल्याचा दावा धुळे जिल्हा स्वतंत्र भारत पक्षाचे नेते रवि देवांग यांनी केला आहे. आता शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष ‘बळीराज्य खान्देश’ हा विचार घेवून विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील, असे देवांग यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून प्रथमच एकही दलित व मुसलमान विजयी होऊ शकला नाही. खरे तर महाराष्ट्रात या दोन्ही समाजाची टक्केवारी अनुक्रमे नऊ व १५ अशी आहे. राष्ट्रवादीनेच त्यांना नाकारल्याचे रामदास आठवले व अंतुले यांच्या पराभवातून स्पष्ट झाले आहे. समीर भुजबळ शरद पवारांच्या नव्हे तर मनसेच्या कृपेमुळे खासदार झाले. इतर मागासवर्गीय खासदारांची संख्या नगण्यच आहे. प्रकाश आंबेडकर, ओबीसींचे नेते म्हणून स्थापित होऊ शकले नाहीत. मायावतींचा बहुजन हत्तीही फतकल मारून बसला. हा बहुजनांचा पराभव आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटना आजवर शेतकरी, ग्रामीण, अठरा पगड जाती, इतर बहुजनांच्या आर्थिक उन्नतीसाठी झटत आहे. निवडणुकीत डाव्यांचा आणि समाजवाद्यांचा झालेला पराभव शेतकरी संघटनेच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे. आता खुली व्यवस्था अधिक गतिमान होवून शेतकरी बहुजनांना स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता वाढली असल्याचा प्राथमिक निष्कर्षही देवांग यांनी काढला आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी