Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

‘पुनरागमनाचा श्रीगणेशा’
आसाराम लोमटे, परभणी, १७ मे

एकेकाळी जिल्ह्य़ाच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका असलेल्या गणेश दुधगावकर यांना राजकीय यश १९९०पासून सातत्याने हुलकावणी देत होते. तब्बल २० वर्षे पराभवाच्या छायेत काढल्यानंतर त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. जिल्ह्य़ाच्या राजकारणात बाजीगर ठरलेल्या श्री. दुधगावकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या शिष्याला, सुरेश वरपूडकर यांना पराभूत केले.

बाजार फुलांचा बहरला
लातूर, १७ मे/वार्ताहर

सध्या लग्नसराई असल्यामुळे शेवंती, मोगरा, गुलाब आदी विविध फुलांच्या व्यवसायास चांगले दिवस आल्याचे दिसून येते. शहरात छोटी-मोठी मिळून फुलांची एकूण ६० दुकाने आहेत. सध्या लग्नसराईमुळे दररोज या व्यवसायात दीड लाख रुपयांची उलाढाल होते. लातूरच्या बाजारात दररोज शेवती पिवळी, मोगरा, गुलाब, गोल्डन काडी, डच गुलाब, अस्वरा हिरवा आदी प्रकारांतील फुले उपलब्ध आहेत. लग्नसमारंभात वधू-वरांचे हार, गुच्छ यांनाही मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे सुभाष चौक येथील लातूर फ्लॉवर स्टॉलचे मालक अब्दुल खादर हाजी यांनी सांगितले.

संथ मतमोजणीचा मुंडे यांना फटका
बीड, १७ मे/वार्ताहर
मतमोजणीच्या काळात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पंकजकुमार यांच्या संथ कारभाराचा विजयी उमेदवार व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांना त्रास सहन करावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांची मनमानी भूमिका निवडणूक काळात अखेरच्या क्षणापर्यंत वादग्रस्तच राहिली.

लकेरीचे सूर
चंद्र वेढलेला एका मोठय़ा काळ्याकुट्टं ढगानं. वारा इथं नाही. तिथंही नसावा. म्हणून तर एवढा वेळ मुक्तीसाठी. मुंगीच्या पावलानं सरकत जातोय तो ढग. सारं लक्ष, केव्हा चंद्र येतो बाहेर, याकडं लागलेलं. संध्याकाळी गच्चीवर पाणी टाकलं. तासाभरात पाणी गेलं उडून, गच्चीत साचलेली दिवसभराची उष्णता घेऊन. शीतल झालीय आता. जाडसर अंथरुण टाकलं. डोक्याखाली उशी. आकाशभर शांतता. पण तो चंद्र काही येत नाहीये बाहेर.

दोन वऱ्हाडांना अपघात; पाच ठार, ६१ जखमी
हिंगोली, १७ मे/वार्ताहर
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो आज सायंकाळी दिग्रस कऱ्हाळे येथे उलटून तीन जण ठार व ३१ जण जखमी झाले. जालना जिल्ह्य़ातही वऱ्हाड नेणाऱ्या मालमोटारीला अपघात होऊन दोन जण ठार व ३० जण जखमी झाले. हिंगोली तालुक्यातील पारडा बिरडा येथील लग्नाचे वऱ्हाड जिंतूर तालुक्यातील जुनुजा येथे जात होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दिग्रस कऱ्हाळे येथे टेम्पो उलटला. भास्कर डोंगरे (३२), मिलिंद बलखंडे (२२) व मनोज घोंगडे मृत्युमुखी पडले. सर्व जखमींना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांचेही रुग्णालयात निधन झाले.

पावसाने दाणादाण
औरंगाबाद, १७ मे/प्रतिनिधी
जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट
अनेक झाडे, जाहिरातीचे फलक उडाले
पाणी साचल्याने अपघात
सकाळपासून कडक ऊन आणि उकाडय़ाने बेहाल झालेल्या शहरवासीयांना अचानक आलेल्या मुसळधार पावसाने काहीसा दिलासा दिला. साडेतीन वाजेपासून सुरू झालेला पाऊस अधून-मधून मोकळीक देत होता खरा; मात्र सोसाटय़ाच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहर व परिसरात बरेच नुकसान केले. शहरातील अनेक लहान-मोठय़ा झाडाच्या फांद्या तुटल्या. तर क्रांती चौक, उस्मानपुरा, निराला बाजार, अमरप्रीत चौक आदी भागांतील जाहिरातींचे फलक फाटल्याचे प्रकार घडले. शहर व परिसरात दोन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात हाहाकार उडविला.

दोन रिक्षांची टक्कर होऊन ११ जखमी
परभणी, १७ मे/वार्ताहर

पूर्णा-कंठेश्वर रस्त्यावर सारंगी फाटय़ाजवळ दोन रिक्षांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. यातील चार जणांना गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. रिक्षा (क्रमांक एमचएच २२ एन १०८०)ा पपई भरून पूर्णेकडे जात होती. दुसरी रिक्षा (क्रमांक एमएच २२-३५३९) प्रवासी घेऊना पांढरी गावाहून कंठेश्वरला जात होती. सारंगी फाटय़ाजवळ त्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये ११ प्रवासी जखमी झाले. यातील चार प्रवाशांना जास्त मार लागल्यामुळे नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात मुक्ताबाई दशरथ पौळ, नामदेव दशरथ पौळ, माधव भागवत पौळ, ज्ञानोबा दशरथ पौळ, चंद्रसेना बाळासाहेब पौळ, भगवान मदन पौळ, सुरेखा भगवान गुंडाळे, शीतल भगवान गुंडाळे, सुरेश गुंडाराव पौळ, गोपाळ बाळासाहेब पौळ, पद्मिनी मदन पौळ अशी जखमींची नावे आहेत. इतर जखमींवर पूर्णेच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

वीज पडून वृद्धाचा मृत्यू
जालना, १७ मे/वार्ताहर

वीज पडल्यामुळे अंबड तालुक्यातील बठाण (बुद्रुक) येथील वामन बुवाजी कावळे (वय ६५) मृत्युमुखी पडले. आज दुपारी ही दुर्घटना घडली. जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील सुखदेव कृष्णाजी खेडेकर यांच्या गुरांच्या गोठय़ावरही आज दुपारी वीज पडली. त्यामध्ये एक बैल ठार झाला.

३७ लाख पाठय़पुस्तके विनामूल्य वाटणार
जालना, १७ मे / वार्ताहर

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्य़ात ३७ लाख पाठय़पुस्तकांचे मोफत वितरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १८ लाख पुस्तके जालना जिल्ह्य़ात आली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न असून, जिल्ह्य़ातील तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

दोन मोटरसायकलस्वार अपघातात ठार
जालना, १७ मे/वार्ताहर

अॅपे रिक्षा आणि मोटरसायकल यांची टक्कर होऊन दोन जण ठार झाले. अंबड तालुक्यातील जामखेड गावाजवळ काल सायंकाळी हा अपघात झाला. अंबड तालुक्यातील बळेगाव येथील गणेश पाराजी नरवडे (२५) आणि विठ्ठलवाडी येथील बबन बनकर (४०) लग्नाच्या निमंत्रण पत्रिका देण्यासाठी जामखेडकडे जात होते. समोरून येणाऱ्या अॅपे रिक्षाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या दोघांना जखमी झालेल्या अवस्थेत जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार चालू असताना त्यांचा तेथे मृत्यू झाला.

आंबे तोडल्याच्या वादातून मारहाण
जालना, १७ मे/वार्ताहर

बांधावरील झाडाचे आंबे तोडल्याच्या कारणावरून भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथील दोघांना मारहाण करण्यात आली. बोरगाव जहागीर येथील कैलास काशिनाथ कुंदर आणि साहेबराव देवकर कुंदर यांच्या शेतीचा सामायिक बांध आहे. या बांधावरील झाडाचे आंबे तोडण्यासाठी कैलास कुंदर गेले असता त्यांचा साहेबराव कुंदर यांच्याशी वाद झाला. या वेळी कैलास कुंदर यांना मारहाण झाली. त्यामध्ये ते जखमी झाले.

भिंत पडून महिला ठार
जालना, १७ मे/वार्ताहर

जालना तालुक्यातील गोलापांगरी येथे भिंत अंगावर पडल्याने सविता उत्तम कवठकवार (वय ३५) ठार झाली. आज दुपारी ही दुर्घटना घडली. या वेळी झालेल्या जोरदार वादळाने अनेक घरांवरचे पत्रे उडाले.

मोबाईल चोरांना अटक
नांदेड, १७ मे/वार्ताहर

शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरी, दरोडासारख्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली असताना त्याबाबत कोणत्याही उपाययोजना न करणाऱ्या पोलिसांनी काल तीन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील ७८ हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत. शेख बाबू शेख फरीद, अवेजखान एजाज खान व शेख इस्माईल शेख उस्मान यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे १७ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत ७८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

बचत गटातील महिलांच्या मेळाव्याचे आयोजन
औरंगाबाद, १७ मे/खास प्रतिनिधी

नालंदा स्वयंसहायता महिला विकास बचत गटाच्या वर्धापनदिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन २५ मे रोजी करण्यात आले आहे. मामा चौकातील नालंदा बुद्धविहारमध्ये सकाळी साडेदहा वाजताहा कार्यक्रम होणार आहे. या बचत गटामार्फत पापड उद्योग, सकस आहार पुरवठा आणि पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणखी विविध पाच उद्योग व्यवसाय येत्या दोन वर्षांत सुरू करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती बचत गटाच्या अध्यक्षा संगीता बनसोडे यांनी दिली. प्तरी या मेळाव्याला महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चंद्रभागा वाहूळ, पद्माबाई जाधव यांनी केले आहे.