Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्य शत्रू काँग्रेसच!
शिवसेनेला ठोसे मारणारा अजून जन्माला आला नाही - उद्धव
मुंबई, २० मे/प्रतिनिधी

 

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा शत्रू क्रमांक एक काँग्रेसच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. मात्र मनसेबरोबर कोणताही राजकीय समझोता अशक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला ठोसे मारणारा जन्माला आला नाही आणि येणार नाही हा मला आत्मविश्वास आहे, असा टोलाही उद्धव यांनी राज ठाकरे यांना लगावला.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित ११ खासदारांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली व त्यानंतर ते बोलत होते. उद्धव यांनी शत्रू क्रमांक एक काँग्रेस असल्याचे जाहीर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख मात्र टाळला. शत्रू क्रमांक एक ठरवताना त्याचा जागांचा आकडा पाहावा लागतो. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे शिवसेनेचा पहिला शत्रू काँग्रेस हाच आहे. मात्र इतरांना शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा शत्रू वाटत असेल तर ते त्यांचे दुर्भाग्य आहे. उद्धव म्हणाले की, शिवसेनेला मिळालेले यश पार्टी करण्याएवढे नसले तरी चहापान करण्याएवढे निश्चित आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत अमर-अकबर-अँथोनी होते. त्यावेळी १२ खासदार विजयी झाले होते. आता त्यांच्यापैकी कोणी नाही, स्टार प्रचारक नाही, सिने तारे-तारका नाहीत. परंतु तरीही शिवसेनेचे ११ खासदार विजयी झाले. ग्रामीण भागाने व विशेष करून शेतकरी बांधवांनी शिवसेनेला भरभरून मते दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
‘तुमने आपुनको इतना मारा. आपुनने तुमको सिर्फ दो मारा लेकीन सॉलिड मारा की नही’ या राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणाला मारायचे ते कळले पाहिजे. शिवसेनेने मराठी माणसांना आपल्या स्वार्थाकरिता कधीच वापरले नाही. उलटपक्षी मराठी माणसांचा स्वार्थ पाहिला. शिवसेनेला ठोसे मारणारा अजून जन्माला आला नाही आणि येणारही नाही असा मला आत्मविश्वास आहे.
मुंबईत पुरेसे लक्ष देऊ शकलो नाही, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत अतिरेकी हल्ल्यापासून अनेक घटना घडल्या. तरीही मुंबईकरांनी काँग्रेसवर विश्वास टाकला याचे मला आश्चर्य वाटते, असे नमूद करून ठाकरे म्हणाले की, मुंबईकर आणि शिवसेना यांची नाळ जोडली आहे. मुंबईकरांनी शिवसेनेच्या ताब्यात महापालिका सोपविली आहे. मनसे उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत मते दिल्याने मराठी मतांचे जे विभाजन झाले त्याचे अनेक मराठी मतदारांना दुख होत असल्याचे त्यांनी मला सांगितले. मराठी मते फुटली तर भगवा खाली उतरतो हे मराठी लोकांनी निवडणुकीत पाहिले, असेही ते म्हणाले.