Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

रिलायन्स-जागतिक बँक सहकार्य कराराने
उपनगरातील झोपडपट्टय़ा उजळणार
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

 

मुंबई उपनगराला विजेचे वितरण करणारी रिलायन्स कंपनी आणि जागतिक बँक यांच्यात मुंबई उपनगरातील झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना जागतिक दर्जाची वीज वितरण यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबतचा करार झाला असून या उपक्रमाच्या सुरुवातीचा लाभ गोवंडी परिसरातील शिवाजीनगर भागाला मिळणार आहे.
‘ग्लोबल पार्टनरशिप ऑन आऊटपूट बेस्ड एड’ (जीपीओबीए) या जागतिक बँकेच्या उपक्रमाने रिलायन्स कंपनीची उपनगरातील वीज वितरणाची परवानाधारक कंपनी म्हणून शिवाजीनगर, गोवंडीमध्ये या प्रकल्पाची काम करण्यासाठी निवड केली आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कंपनी योजनाबद्ध पद्धतीने वीज वितरणासाठी लागणारी वितरण व्यवस्था व अन्य सर्व यंत्रणा उभारणार आहे. यामध्ये वितरण वाहिन्यांचे जाळे विणणे, वीज मीटर बसविणे या कामांचा समावेश आहे.
या कंपनीला जागतिक बँकेकडून मदत मिळणार असली तरी उत्कृष्ट दर्जाची वितरण यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक असणारी प्राथमिक गुंतवणूक रिलायन्स कंपनी करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथे राहात असलेल्या एक लाखांहून अधिक रहिवाशांना या प्रकल्पाचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे. मात्र या प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांचा विजेचा वापर १०० युनिटहून कमी आहे अशा सुमारे १० लाखांहून अधिक झोपडपट्टीवासीयांना आम्ही वितरण सेवा पुरवित आहोत आणि त्यांना अधिकृत मीटरद्वारे विजेचा पुरवठा मिळावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू, असे रिलायन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ललित जालान यांनी सांगितले. रिलायन्स कंपनी उपनगरातील ग्राहकांना १५०० मेगाव्ॉट विजेचे वितरण करते.