Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आर.जे. मेहता यांच्या पश्चात युनियनची मालमत्ता चांदबिबीने लाटली?
कोर्टाचा तपासाचा आदेश
मुंबई, २० मे/प्रतिनिधी

 

‘इंजिनियिरग मजदूर सभा’ या कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते रसिकलाल ऊर्फ आर. जे. मेहता यांच्या मृत्यूनंतर अवघ्या १८ दिवसांत युनियनच्या कार्यालयात त्यांच्या सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या श्रीमती चांदबिबी झैदी या महिलेने युनियनच्या नावावर असलेला कारमायकेल रोड या श्रीमंत वस्तीतील ‘गिरिराज’ इमारतीमधील एक आलीशान फ्लॅट व गॅरेज लबाडीने स्वत:च्या नावावर करून घेतला आणि हा फ्लॅट विकून आलेली एक कोटी रुपयांची रक्कमही स्वत:च घेतली, असा आरोप करणारी एक फिर्याद दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली गेली आहे.
५३ वर्षे कामगार चळवळीत काढलेल्या आर. जे. मेहता यांचे १७ जुलै २००३ रोजी निधन झाले होते. मेहता यांचे चिरंजीव किरण मेहता यांनी केलेल्या या फिर्यादीवर बेलार्ड पियर येथील ३८ व्या न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी व्ही. बी. श्रीखंडे यांनी एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाण्याला तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी चांदबिबी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपासाला सुरुवात केली आहे. याआधी किरण मेहता यांनी पोलीस ठाण्यात व आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्या ऑगस्टमध्ये तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यांची दखल न घेतली गेल्याने त्यांनी दंडाधिकाऱ्यांकडे खासगी फिर्याद दाखल केली व तिच्यावर न्यायालयाने आदेश दिल्यावर आता पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
युनियनच्या नावावर असलेल्या एका वाहनाला अपघात झाला असता विमा कंपनीकडून मिळालेली काही लाख रुपयांची भरपाई आर. जे. मेहता यांची बनावट स्वाक्षरी करून स्वत: घेतल्याचाही चांदबिबी हिच्यावर आरोप असून त्यासंदर्भात तपास करून डी.बी. मार्ग पोलिसांनी तिच्यासह तीन आरोपींविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे.
किरण मेहता यांची फिर्याद अशी आहे : आर. जे. मेहता यांनी युनियनतर्फे कीर्तिलाल ड्रेसवाला यांना कर्जाऊ रक्कम दिली होती. ‘गिरिराज’ इमारतीमधील ९७० चौ. फूट आकाराचा एक फ्लॅट व १५८ चौ. फुटांचे एक गॅरेज यांच्या तारणावर ड्रेसवाला यांनी हे कर्ज घेतले होते. अखेर कर्ज व व्याज मिळून १.२६ कोटी रुपयांची रक्कम थकली. प्रकरण हायकोर्टात गेले तेव्हा तेथे मे २००० मध्ये युनियनच्या प्रतिनिधी म्हणून चांदबिबी व ड्रेसवाला यांच्यातर्फे ‘कन्सेन्ट टर्मस’ दाखल होऊन प्रकरण मिटले. त्यानुसार थकित कर्जाच्या बदल्यात ड्रेसवाला यांनी हा फ्लॅट व गॅरेज युनियनला दिले. फिर्यादीनुसार ड्रेसवाला यांच्याऐवजी सोसायटीचे सभासद म्हणून नोंद व्हावी यासाठी युनियनच्या प्रतिनिधी या नात्याने चांदबिबी यांनी ‘गिरिराज’ सोसायटीकडे अर्ज केला. प्रत्यक्षात मात्र सोसायटीचे सदस्यत्व युनियनच्या नव्हे तर व्यक्तिश: चांदबिबी यांच्या नावावर नोंदविले गेले. आर. जे. मेहता यांच्या निधनानंतर चांदबिबी यांनी हा फ्लॅट व गॅरेज आपल्या व्यक्तिगत मालकीचे आहे असे दाखवून विलेपार्ले (प.) येथे राहणाऱ्या झल्पा व पोपटभाई लुखी या दाम्पत्याला ती मालमत्ता विकण्याचा रीतसर करार करून त्याची निबंधकांकडे नोंदणीही केली. या व्यवहारापोटी लुखी यांच्याकडून मिळालेली एक कोटी रुपयांची रक्कम चांदबिबी यांनी स्वत: घेतली.