Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आयसीएसई परीक्षेत मुंबईचा ऋषी मेहता देशात प्रथम
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

 

‘द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’च्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) व बारावीच्या (आयएससी) परीक्षांचे तसेच ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’च्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर झाले. आयसीएसईच्या परीक्षेत विलेपार्ले येथील जमनाबाई स्कूलचा ऋषी मेहता देशातून सर्वप्रथम आला असून त्याला ७०० पैकी ६८८ (९८.२९ टक्के) गुण मिळाले आहेत. यंदा मुंबईतील आयसीएसईच्या ६२ शाळांमधील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
अंधेरी येथील राजहंस स्कूलच्या मिहिका सेन गुप्ता हिने सीबीएसईच्या (बारावी) विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला ९८.०४ गुण मिळाले आहेत. तर पोदार स्कूलच्या साध्वी मेहरा हिने समाजशास्त्र शाखेतून पहिला क्रमांक पटकावला आहे. आयसीएसईमध्ये देशातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या ऋषी मेहता याला इतिहास, भूगोल, गणित व संगणक या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. यंदा देशातून आयसीएसईसाठी एक लाख आठ हजार २१७ तर आयएससीसाठी ५२ हजार ५५२ विद्यार्थी बसले होते. यात आयसीएसईचे ९८.०५ टक्के तर आयएससीचे ९७.०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. आयसीएसईमध्ये ९८.१४ तर आयएससीमध्ये ९८.१८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याउलट मुलांचे प्रमाण अनुक्रमे ९६.९० व ९६.२१ टक्के एवढे आहे.