Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

..बरसो रे मेघा मेघा!
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

 

उष्म्याच्या तडाख्याने आणि उकाडय़ाने हैराण झाल्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांवर अखेर आज वरूणराजाची कृपा झाली. न बरसताच पुढे निघून जाणाऱ्या कृष्णमेघांनी मुंबईवर रेंगाळून जलधारांची बरसात केली. या जलाभिषेकाने न्हाऊन अवघी मुंबापूरी चिंब झाली. हवेतील कुंद गारव्याने सुखावलेल्या मुंबईकरांनी ‘..बरसो रे मेघा मेघा!’ अशी धून आळवली. मात्र ऐन गर्दीच्या वेळी मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने उपनगरवासियांच्या आनंदावर विरजण पडले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाच्या दमदार सरींनी मुंबईत हजेरी लावली. धुळीने माखलेले रस्ते पावसाच्या सरींनी लख्ख धुवून निघाले आणि धुंद करणाऱ्या मातीच्या सुगंधाने आसमंत कुंद झाले. हवेतील सुखद गारव्याने मुंबईकर सुखावले. घरी परतण्याच्या गडबडीत असलेल्या मुंबईकरांची आणि फेरीवाल्यांची पावसाने काहीशी तारांबळ उडवली. दुचाकी चालकांचीही पुरेवाट लागली. अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्म्याने व उकाडय़ाने हैराण मुंबईकरांनी पावसाने उडवलेली ही भंबेरी पावसात चिंब होऊन ‘एन्जॉय’ केली. मुंबईखेरीज ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली या ठिकाणीही पावसाने हजेरी लावली. मुंबईत नेमका किती पाऊस पडला, हे कळू शकले नाही. मात्र उपनगरांच्या तुलनेत दक्षिण मुंबईत त्याचा जोर अधिक होता. नैऋत्य मोसमी वारे अद्याप अंदमान-निकोबापर्यंत पोहोचले नसल्याने, या वळवाच्या सरी होत्या, असे वेधशाळेतून सांगण्यात आले.
लोकलसेवा विस्कळीत
महालक्ष्मी स्थानकाजवळ एमयूटीपीची नवी लोकल नादुरुस्त झाल्याने आज संध्याकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे सुमारे तासभर पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या. परिणामी पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आणि प्रवाशांचे नाहक हाल झाले. कसारा ते कल्याणदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचेही तीनतेरा वाजले. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निर्माण झालेल्या या दोषामुळे रात्री सुमारे साडेदहा वाजेपर्यंत कसारा ते कल्याणदरम्यानची रेल्वे वाहतूक जवळपास खोळंबली होती. डाऊन मार्गावर फारसा अडथळा नव्हता. मात्र अप मार्गावरील वाहतूक टिटवाळा ते कल्याणदरम्यान पूर्णत: ठप्प होती. या मार्गावर नुकतेच डीसी-एसी परिवर्तनाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे हा तांत्रिक दोष उद्भवल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.