Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री
मुंबई, २० मे/प्रतिनिधी

 

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून शेतकरी आता शेतीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे शेतीच्या या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांच्या पुरवठय़ात कोणतीही अडचण येता कामा नये, व त्यासाठी जिल्हानिहाय बियाणी व खते यांच्या पुरवठय़ाचा आढावा घ्यावा, असे निर्देश आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयातून थेट जळगाव आणि नांदेड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. खरीप हंगामासाठी खते आणि बियाण्यांच्या उपलब्धतेसंदर्भात मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पावसाळ्यात सुरू होणाऱ्या पेरण्यांच्या वेळी बी-बियाणे आणि खतांची मागणी मोठय़ा प्रमाणावर सुरू होईल. त्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थित नियोजन केले आहे, त्याची संबंधित यंत्रणा व अधिकाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.संयुक्त खतांची उपलब्धता कमी असल्याने त्याऐवजी शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार मिश्र खते दिली जातील, ही वस्तुस्थिती सर्व माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केली. राज्यातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते मिळावीत यासाठी शासनाने नियोजन केले असून मंत्रालय, कृषी आयुक्तालय व विभागीय स्तरावर खते पुरवठय़ाचे सनियंत्रण करण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. रासायनिक खत वापरात ३७.४७ लाख मेट्रिक टनावरून ५३.२३ लाख मेट्रिक टनापर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ ४२ टक्के इतकी आहे. मुलद्रव्य स्वरुपातील वापर १७.३९ लाख मे. टनावरून २५.७२ लाख मे. टनापर्यंत वाढला आहे. एकूणच राज्यात प्रति हेक्टर खत वापरात २९ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या खरिपासाठी राज्यात ३५ लाख ३५ हजार मे. टन खत पुरवठय़ाचे नियोजन केले आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.