Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

अनंत भावे यांना बिनानी बालसाहित्य पुरस्कार जाहीर
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

 

ज्येष्ठ बालसाहित्यिक अनंत भावे यांनी पद्मा बिनानी फाउंडेशनतर्फे भारतीय भाषेतील उत्कृष्ट बालसाहित्यासाठी देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जून महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘बालसाहित्याला पुरस्कार मिळणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. लहान वयात मुला-मुलींवर वाचनाचे संस्कार झाले की पुढे त्यातूनच सक्षम वाचक तयार होतात’, अशी प्रतिक्रिया अनंत भावे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. इंग्रजी भाषेत प्रचंड प्रमाणावर बालसाहित्य निर्माण झाले आहे. त्या तुलनेत मराठीत बालसाहित्य अगदीच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मराठी शाळांची संख्या वेगात कमी होत आहे. त्यामुळे लहान मुलांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करुन देणे हे मोठय़ा माणसांनी आपले कर्तव्य मानले पाहिजे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी शाळांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण तसे होत नाही. मी अनेक शाळांमध्ये लहान मुलांसाठी कार्यक्रम करतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळतो, पण कोणतीही शाळा असे कार्यक्रम आखण्यात पुढाकार घेत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरवर्षी एका भारतीय भाषेतील बालसाहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. पहिल्या वर्षी हिंदी, दुसऱ्या वर्षी तामिळ तर यंदाचा पुरस्कार मराठी भाषेतील बालसाहित्याला देण्यात आला आहे. याबद्दल अधिक माहिती देताना पद्मा बिनानी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या पुरस्कारासाठी तीन भाषांतील बालसाहित्य लेखकांचे अर्ज मागविण्यात येतात. त्याप्रमाणे २००८ या वर्षांसाठी कोकणी, मराठी आणि गुजराती या भाषांतील लेखकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. ज्या भाषेतील सर्वात जास्त अर्ज येतात, त्या भाषेतून पुरस्कार विजेत्याची निवड करण्यात येते. २००८ सालातील पुरस्कारासाठी मराठी भाषेतील साहित्यिकांचे ६५ अर्ज आले होते. त्यातून अनंत भावे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.