Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

न्यायालयातही ‘मनसे’ चर्चा होते तेव्हा..
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकांमुळे चर्चेचा विषय बनलेल्या ‘मनसे फॅक्टर’ने आज चक्क न्यायालयात प्रवेश करून रुक्ष समजल्या जाणाऱ्या न्यायालयीन कामकाजात काही वेळाकरिता का होईना राजकीय रंग भरला. ‘येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे त्यांना मुलाखत घेतल्याशिवाय तिकीट देईल’, असे उपहासात्मक वक्तव्य करून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनीच खुद्द हा रंग भरण्यात पुढाकार घेतला.
पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्याविरुद्धच्या खटल्यासाठी आर्थर रोड तुरुंगात विशेष न्यायालय तयार करण्यात आले आहे. मात्र सर्वसामान्य न्यायालयापेक्षा काहीसे बंदिस्त असलेल्या या न्यायालयात विरंगुळा म्हणून अधून-मधून न्या. टहलियानी हे आपल्या विनोदबुद्धीची झलक दाखवत असतात. त्यांनी एखाद्या विषयाबाबत विशेषत: राजकारणाबाबत, राजकीय नेत्याबाबत केलेल्या उपहासात्मक वक्तव्याने संपूर्ण न्यायालयात हास्याची लकेर उमटत असते. खटल्याचे कामकाज आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी साधारणत: एकाच वेळी सुरू झाली. त्यामुळेच सुनावणीच्या अगदी पहिल्या दिवसापासून न्या. टहलियानी हे न्यायालयाबाहेरील राजकीय धुमाळीवर उपहासात्मक वक्तव्य करून ती न्यायालयात आणून तिच्याद्वारे एक हलके-फुलके वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. आज मात्र त्यांनी स्वत:बाबतच एक ‘गुगली’ टाकून सगळ्यांनाच अचंबित केले.
एका मुद्दय़ावरून अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम आणि कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांच्यात वाद सुरू होता. हा वाद आणखी वाढणार असे लक्षात येताच न्या. टहलियानी यांनी, अ‍ॅड. काझ्मी आणि शाहिद आजमी यांना मनसे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट देणार असल्याची फिरकी घेत वातावरणात हास्यरंग भरण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाहीतर ‘मला तर मनसे मुलाखतीशिवायच विधानसभेचे तिकीट देईल.
पण त्याच्यासाठी मला राजीनामा द्यावा लागेल’ असे बोलत त्यांनी सर्वानाच धक्का दिला. न्या. टहलियानी यांच्या या उपहासात्मक बोलण्याने एकीकडे न्यायालयात हशा पिकला असताना कामात व्यग्र असलेल्या अ‍ॅड. काझ्मी यांचे सहाय्यक के. बी. पवार यांना न्या. टहलियानी यांनी लक्ष्य केले व ‘पवार’ तुम्ही असे ‘ट्रस्टेड’ होऊ नका सोनिया तुम्हाला नक्कीच मदत करतील, असा टोला लगावला. त्यामुळे पुन्हा न्यायालयात हशा पिकला. न्यायालयाच्या कामकाजानंतरही ही ‘मनसे’ चर्चा सर्वाच्या कुतूहलाचा विषय बनली होती. दरम्यान, गिरगाव चौपाटी येथे ‘२६/११’च्या रात्री पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेला पाकिस्तानी दहशतवादी अबू इस्माईल याचे शवविच्छेदन करणारे नायर रुग्णालयाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे डॉक्टर शैलेश मोहिते यांची साक्ष नोंदविण्यात आली. अबू इस्माईलला पाच गोळ्या लागल्याचे आणि त्याच्या शरीरावर ११ जखमा आढळून आल्याचे सांगणाऱ्या डॉ. मोहिते यांना आरोपी फईम अन्सारीचे वकील शाहिद आजमी यांनी हरप्रकारे जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. तसेच अभियोग पक्षाच्या दाव्यानुसार फईमने तयार केलेला नकाशा अबू इस्माईलकडून मिळाला नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ. मोहिते यांनी त्यांना व्यवस्थित उत्तरे देऊन तसेच त्यामागील कारण समाजावून सांगत त्यांच्या प्रश्नांचा हल्ला परतवून लावला.