Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आयसीटीच्या संचालक पदावर जी. डी. यादव यांची नेमणूक
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

 

‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (आयसीटी) या संस्थेच्या (जुने नाव यूआयसीटी) संचालकपदावर डॉ. जी. डी. यादव यांची नेमणूक झाली आहे. संस्थेचे संचालक डॉ. जे. बी. जोशी निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या या पदावर यादव यांची निवड करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाहीर केला होता. त्या अनुषंगाने यादव या संस्थेचे संचालक तथा कुलगुरू म्हणून काम पाहतील.
यादव यापूर्वी यूआयसीटीमध्येच काम करीत होते. रसायन अभियांत्रिकीचे विभागप्रमुख, दरबारी सेठ अध्यासनाचे प्राध्यापक, संशोधन, कन्सल्टन्सी आणि रिसोर्स मोबीलायझेशन विभागाचे अधिष्ठाता, मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचे तसेच ग्रीन टेक्नॉलॉजी केंद्राचे समन्वयक अशा विविध पदांवर ते काम करीत होते. शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती आहे. ब्रिटनमधील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल इंजिनियर्सच्या इन्सा या प्रसिद्ध संस्थेची फेलोशिप त्यांना मिळाली आहे. यादव हे मुळचे कोल्हापूर जिल्'ाातील अर्जुनवाडा (राधानगरी) या गावातील रहिवाशी आहेत. त्यांना आयआयटी-मुंबईमध्ये प्रवेशाची संधी मिळाली असतानाही त्यांनी ती नाकारून यूआयसाटीमध्येच प्रवेश घेतला होता. यूआयसीटीचेच विद्यार्थी असलेले यादव आता याच संस्थेचे संचालक बनले आहेत, हे विशेष.
दरम्यान, यूआयसीटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर संस्थेत उद्या (२१ मे) विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल एस. सी. जमीर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले, प्रसिद्ध संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा सायंकाळी ५ वाजता होणार आहे.