Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रादेशिक

..बरसो रे मेघा मेघा!
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

उष्म्याच्या तडाख्याने आणि उकाडय़ाने हैराण झाल्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांवर अखेर आज वरूणराजाची कृपा झाली. न बरसताच पुढे निघून जाणाऱ्या कृष्णमेघांनी मुंबईवर रेंगाळून जलधारांची बरसात केली. या जलाभिषेकाने न्हाऊन अवघी मुंबापूरी चिंब झाली. हवेतील कुंद गारव्याने सुखावलेल्या मुंबईकरांनी ‘..बरसो रे मेघा मेघा!’ अशी धून आळवली. मात्र ऐन गर्दीच्या वेळी मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने उपनगरवासियांच्या आनंदावर विरजण पडले.

रिलायन्स-जागतिक बँक सहकार्य कराराने
उपनगरातील झोपडपट्टय़ा उजळणार
मुंबई, २० मे / प्रतिनिधी
मुंबई उपनगराला विजेचे वितरण करणारी रिलायन्स कंपनी आणि जागतिक बँक यांच्यात मुंबई उपनगरातील झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना जागतिक दर्जाची वीज वितरण यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबतचा करार झाला असून या उपक्रमाच्या सुरुवातीचा लाभ गोवंडी परिसरातील शिवाजीनगर भागाला मिळणार आहे.

आर.जे. मेहता यांच्या पश्चात युनियनची मालमत्ता चांदबिबीने लाटली?
कोर्टाचा तपासाचा आदेश
मुंबई, २० मे/प्रतिनिधी
‘इंजिनियिरग मजदूर सभा’ या कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते रसिकलाल ऊर्फ आर. जे. मेहता यांच्या मृत्यूनंतर अवघ्या १८ दिवसांत युनियनच्या कार्यालयात त्यांच्या सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या श्रीमती चांदबिबी झैदी या महिलेने युनियनच्या नावावर असलेला कारमायकेल रोड या श्रीमंत वस्तीतील ‘गिरिराज’ इमारतीमधील एक आलीशान फ्लॅट व गॅरेज लबाडीने स्वत:च्या नावावर करून घेतला आणि हा फ्लॅट विकून आलेली एक कोटी रुपयांची रक्कमही स्वत:च घेतली, असा आरोप करणारी एक फिर्याद दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली गेली आहे.

आयसीएसई परीक्षेत मुंबईचा ऋषी मेहता देशात प्रथम
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

‘द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’च्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) व बारावीच्या (आयएससी) परीक्षांचे तसेच ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’च्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर झाले. आयसीएसईच्या परीक्षेत विलेपार्ले येथील जमनाबाई स्कूलचा ऋषी मेहता देशातून सर्वप्रथम आला असून त्याला ७०० पैकी ६८८ (९८.२९ टक्के) गुण मिळाले आहेत. यंदा मुंबईतील आयसीएसईच्या ६२ शाळांमधील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

एसटीच्या ताफ्यात आलिशान मर्सिडिझ बेंझ!
दादर-पुणे मार्गावर धावणार चार गाडय़ा
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

वाहननिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘मर्सिडिज बेंझ’ने उत्पादित केलेल्या चार हायटेक बसेस एसटीच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत. एसटीच्या ताफ्यातील त्यांच्या समावेशामुळे आता सर्वसामान्य प्रवाशांनाही देशातील सर्वात महागडय़ा आणि अलिशान बसेसमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. ‘शिवनेरी’ या नावाने या बसेस दादर-पुणे मार्गावर धावत आहेत. औंध-परिहार चौकमार्गे धावणाऱ्या या बसेस एसटीने जळगाव येथील एस. एस. ट्रॅव्हल्सकडून प्रति किमी १८ रुपये दराने भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. ‘ओ ५०० आर / आरएफ’ मॉडेलच्या या अलिशान बसेसचे भाडे मात्र अन्य वातानुकूलित बसेसप्रमाणेच २२५ रुपये असेल, अशी माहिती सहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकूंद धस यांनी दिली. सध्या हायटेक मर्सिडिज बेंझ, व्होल्वो आणि किंगलॉंग बसेसच्या मदतीने दादर-पुणे मार्गावर (औंध-परिहार चौकमार्गे) दररोज ५६ फेऱ्या चालविण्यात येतात. ८५ लाख रुपये किंमत असलेल्या मर्सिडिझच्या या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याआधी केवळ व्होल्वो आणि किंगलाँगच्या बसेस होत्या. या दोन्ही कंपन्यांच्या बसेसची किंमत ७० लाखांहून कमी होती.

‘आयसीएसई, सीबीएसईची मुसंडी रोखण्यासाठी ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ हाच पर्याय’
मुंबई, २० मे / प्रतिनिधी

आज जाहीर झालेल्या आयसीएसईच्या परीक्षेत मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांनी घसघशीत गुण मिळविल्याने हे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशामध्ये एसएससीच्या विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर आता एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठीही सर्वाधिक गुण असलेले कोणतेही पाच विषय गृहीत धरण्याचे (बेस्ट ऑफ फाईव्ह) सूत्र लागू करणार असल्याचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सीबीएसई व आयसीएसईच्या निकालात विद्यार्थ्यांच्या पाच विषयांचे गुण गृहीत धरण्यात येतात. त्यामुळे अकरावीचे प्रवेश देताना एसएससीच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण असलेल्या पाच विषयांचे गुण गृहीत धरण्याचा तत्त्वत: निर्णय घेण्यात आला आहे. तिन्ही बोर्डातील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये समानता आणण्यासाठी समानीकरणाचे सूत्र लागू करण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. परंतु, कायेशीर पेच निर्माण होऊ नये, यासाठी समानीकरणाचा निर्णय यंदा लागू होण्याची शक्यता नाही. त्यासाठीच यंदाच्या अकरावी प्रवेशात ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’चे सूत्र लागू केले जाईल, असे ते म्हणाले.